17 January 2019

News Flash

प्रजासत्ताकाची शाळा

४२ व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस यामध्ये समाजवादी असा शब्दप्रयोग समाविष्ट करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

खूपच मोठे झालोय असा समज किंवा भ्रम मनात निर्माण होतो त्या त्या वेळेस ज्येष्ठ किंवा शहाणी व्यक्ती बाजूला असेल तर आपल्याला पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा सल्ला मिळतो. हा सल्ला आपल्यासाठी खरे तर खूपच आवश्यक असतो. कारण आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना प्राथमिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टींचा विसर पडतो; कधी काळ- काम- वेगाच्या गणितात तर कधी अनवधानाने. हेच देशाच्या प्रवासात असे घडले तर? तर मग आपल्यासमोरचा पर्याय म्हणजे प्रजासत्ताकाच्या शाळेत जाणे. अर्थात भारतीय राज्यघटनेच्या पूर्वपीठिकेचे पुनर्वाचन करीत राहणे. आजवर ज्या ज्या वेळेस आपल्या समोर घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्या त्या वेळेस या पूर्वपीठिकेनेच आपल्याला मार्गदर्शन केले आहे. ही पूर्वपीठिकाच आपली गीता, बायबल आणि कुराणही आहे याचे भान भारतीयांनी राखणे गरजेचे आहे.

भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष (किंवा सर्वधर्मसमान) असलेले लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्णय भारतीय म्हणून आम्ही सर्व घेत असून त्यामुळेच पुढील बाबी भारतीय नागरिकांना त्यामुळे प्राप्त होतील, अशी हमी ही पूर्वपीठिका देते. यात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, त्याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, शिवाय दर्जात्मक आणि संधींची समानता यांचा समावेश आहे. हे सारे कशासाठी? तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकात्मता व अखंडता यांची जपणूक बंधुभावाच्या माध्यमातून करण्यासाठी, असे ही पूर्वपीठिका सांगते. पण ते करण्यासाठी यातील महत्त्वाच्या शब्दांचा मुळातून विचार व्हायला हवा.

सार्वभौम असे म्हणताना देशांतर्गत राज्यकारणाची पूर्ण क्षमता आणि जागतिक पटलावर कुणाच्याही अमलाखाली किंवा अंकुशाखाली नसणे; स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास पूर्ण सक्षम असा त्याचा अर्थ आहे. ४२ व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस यामध्ये समाजवादी असा शब्दप्रयोग समाविष्ट करण्यात आला. याचा संबंध कोणत्याही राजकीय विचारधारेशी नसून, समाजाच्या भल्याचे निर्णय लोकशाही माध्यमाद्वारे व अिहसेच्या मार्गाने घेणे अपेक्षित आहे. याच घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट केलेल्या सेक्युलर, ज्याचे भाषांतर अनेकदा धर्मनिरपेक्ष किंवा सर्वधर्मसमभाव असे केले जाते; याबाबत आपण वेळोवेळी खूपच गोंधळ घातला. या शब्दाला भोंगळ ठरवले. त्यामागचा खरा अभिप्रेत अर्थ हा सरकार आणि नागरिक यांचे संबंध हे केवळ आणि केवळ राज्यघटना आणि कायदा यावरच अवलंबून असतील असा आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी काडीचाही संबंध नाही, हेच यातून स्पष्ट होते. तुमचा धर्म कोणता यावर संबंध अवलंबून असणार नाहीत, अशी हमी पूर्वपीठिका देते. यानंतर येणाऱ्या लोकशाही या शब्दामध्ये केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक व सामाजिक लोकशाहीची प्रक्रियाही अपेक्षित आहे. प्रजासत्ताक किंवा गणराज्य या शब्दामध्ये राजघराणी किंवा साम्राज्याची परंपरा नाकारली हे अपेक्षित आहे, हे तर ब्रिटनलाही जमलेले नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. न्याय या संकल्पनेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय या त्रयीचा समावेश आहे. स्वातंत्र्य या शब्दामध्ये लोकशाहीसाठी आवश्यक सर्व स्वातंत्र्यांचा समावेश आहे. समानता म्हणताना कोणत्याही समाजाला त्यांच्या विशिष्ट परिचयामुळे (जात-धर्म-वर्ण) विशेषाधिकार किंवा सवलती मिळणार नाहीत व सर्व नागरिकांना समान संधीची हमी अपेक्षित आहे. बंधुतेमध्ये राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला मध्यवर्ती ठेवून प्रांतभेद विसरून भारतीय म्हणून प्रत्येकामध्ये व समाजात असलेला बंधुभाव अपेक्षित आहे.

दिसायला ही पूर्वपीठिका अवघ्या काही ओळींची असली तरी ते भारतीय राज्यघटनेचे सार असून ते खऱ्या अर्थाने प्रात:स्मरणीय आहे. ते मनात जपले आणि हृदयात ठसले तर आपल्याला भारतीय म्हणून आयुष्य जगताना फारशी अडचण येणार नाही.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

First Published on January 26, 2018 1:01 am

Web Title: 69th republic day celebration