विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

भाजपाला मिळालेल्या दणदणीत यशानंतर निकालाच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून विजयाचे श्रेय देणारे भाषण केले. त्यात ते म्हणाले की, दोन खासदारांपासून भाजपाचा प्रवास सुरू झाला आणि आता तो दोबारापर्यंत पोहोचला आहे. या भाजपाच्या दोबारामध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांची अवस्था तर खरोखर बारा वाजल्यासारखीच झाली आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमधील विजयानंतर काँग्रेसच्या आशेला पालवी फुटली होती. मात्र जन्मापूर्वी गर्भातच घुसमटून मृत्यू व्हावा, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. अर्थात त्याला काँग्रेस संस्कृती जबाबदार आहे. मोदींच्या विजयातील एक महत्त्वाचा मुद्दा होता तो काँग्रेसमधील नेहरू-गांधी घराणेशाही. या घराणेशाहीला मोदींनी सातत्याने टीकेच्या झोतात ठेवले. पलीकडे काँग्रेसजनांना या घराणेशाहीचे मोठेच आकर्षण आहे. कारण त्याच्या आड काँग्रेसमधील क्षत्रप किंवा संस्थानिक त्यांचे त्या त्या भागातील राज्य करण्यास मोकळे असतात. वेळ येते तेव्हाजिंकून आणण्याची जबाबदारी ही गांधी घराण्यातील कुणावर तरी असतेच. काँग्रेस नेत्यांनीही कुरवाळलेल्या या घराणेशाहीवर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी निकालानंतरच्या कार्यकारिणीच्या सभेत शरसंधान साधले खरे, पण हे आधीच व्हायला हवे होते. आता त्यांनी भविष्यातील काँग्रेसाध्यक्ष गांधी वगळता इतर कुणी तरी असावा असे म्हटले आहे. ती काँग्रेसची गरजही आहे. खरेतर नरसिंहराव पंतप्रधान असताना गांधी वगळता इतर कुणी तरी नेतृत्व करू शकते, तेही यशस्वीरित्या हे सिद्ध झाले होते. मात्र तो प्रयोग नंतर मोडीत निघाला आणि पुन्हा काँग्रेस गांधी घराण्याच्या वळचणीला गेली. आता या साऱ्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. मोदींनी ही घराणेशाही आणि त्यावरील टीका झोतात ठेवताना दुसरीकडे या घराण्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोपही चर्चेत ठेवले. आक्रमक हिंदूुत्ववादाचा पत्ताही त्यांनी वापरला आणि त्याचा परिणाम आज समोर आहे, भाजपाचे घवघवीत यश!

या निवडणुकीतील भाजपाच्या यशाचे बव्हंशी श्रेय मोदींकडे जाते आणि त्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या आखणीला. त्यांनी नवमाध्यमांची मोट प्रत्यक्ष स्थानिक पातळीशी कौशल्याने जोडली. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’च्या माध्यमातून त्यांनी एकाच वेळेस कार्यकर्ते आणि सरकारी योजनांचा फायदा मिळालेले नागरिक दोहोंना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले. तसेच नवोन्वेषण त्यांनी ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या योजनेतही साधले. त्यासाठी प्रत्यक्ष एक कुटुंब, तंत्रज्ञान आणि कार्यकर्ता जोडत केलेली निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी विशेषच होती.

प्रस्तुत निवडणुकांचे निकाल समजून घेताना आणखी एका गोष्टीची गल्लत सध्या होते आहे. केवळ नवमाध्यमांचा वापर हे भाजपा किंवा मोदींच्या यशाचे गमक नाही. तर तंत्रज्ञान बदलल्यानंतर अर्थकारण व राजकारणही बदलते हा इतिहासातील धडा त्यांनी घोटून वापरला हे त्यांच्या यशाचे गमक आहे. ते समजून घेण्यात काँग्रेस आणि विरोधी पक्ष कमी पडले. त्यामुळे त्यांचे बारा वाजले. आजवरच्या मानवी इतिहासात उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलांनी क्रांती घडविली आहे. आणि या क्रांतीमध्ये अग्रेसर असतो तो त्या त्या कालखंडातील तरुण वर्ग. यंदाच्या निवडणुकीतही मतदान करणाऱ्या तरुण वर्गाची संख्या अधिक होती. या नवतंत्रज्ञानाने विचार आणि निर्णयप्रक्रिया बदलली आहे, हा या निकालांचा धडा होता. तो घेतला त्यांचे दो से दोबारा झाले आणि धडा न घेणाऱ्यांचे बारा वाजले!