29 January 2020

News Flash

अॅमेझॉन ते आरे

अॅमेझॉनच्या पर्जन्यवनाला लागलेली आग हा गेल्या आठवडय़ाभराहून अधिक काळ संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला.

नऊ देशांमध्ये हे पर्जन्यवन विभागलेले असले तरी त्याचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलमध्ये येतो.

विनायक परब – twitter – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनाला लागलेली आग हा गेल्या आठवडय़ाभराहून अधिक काळ संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला. जी ७ राष्ट्रांच्या परिषदेमध्येही त्यावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. नऊ देशांमध्ये हे पर्जन्यवन विभागलेले असले तरी त्याचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलमध्ये येतो. सध्या तिथे विराजमान असलेले राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो हे विकासाच्या मागे आहेत. किंबहुना विकासकामे आणि गरज भासल्यास जंगले कापून जागा निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठीच आगी लावल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून होतो आहे. बेकायदा जंगले कापण्याचा व्यवसायही अ‍ॅमेझॉनमध्ये तेवढाच मोठा आहे. अ‍ॅमेझॉन हे जगाचे फुप्फुस आहे. जगातील २० टक्केऑक्सिजननिर्मिती या जंगलाकडून होते आणि तेवढेच कार्बनउत्सर्जन शोषले जाते.

अ‍ॅमेझॉनचे जंगल हे खरेतर सदाहरित आणि आजूबाजूला भरपूर पाणी असलेले. त्यामुळे वणव्याची शक्यता कमी. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लाकडासाठी मोठय़ा प्रमाणावर जंगल कापण्याचे शिवाय खणकामांचे आणि शेतीसाठी किंवा विकासकामांसाठी जंगल नष्ट करण्याचे प्रकार वाढले आहेत. जगातील २० टक्क्यांहून अधिक ऑक्सिजननिर्मिती करणारे जंगलच नष्ट झाले तर त्याचे परिणाम केवळ नऊ देशांना नव्हे, तर जगाला भोगावे लागतील. शिवाय या जंगलांमध्ये असलेली वृक्षसंपदा, कीटक-प्राणी यांच्या लक्षलक्ष प्रजाती नष्ट होतील ते वेगळेच. आज अनेक वर्षांच्या संशोधनानंतरही आपल्याला येथील सर्व प्रजातींचे दस्तावेजीकरण करता आलेले नाही एवढे जंगल मोठे आहे.

या निमित्ताने महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये उचल खाल्ली आहे ती, आरेच्या मुद्दय़ाने. आरे हे जंगल नाहीच असे सरकार म्हणत असले तरी पर्यावरणवादी त्यावर ठाम आहेत. त्यांनी तर ४ लाख ८० हजार झाडे, १३ प्रकारचे उभयचर प्राणी, कोळ्यांच्या ९० तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४६ प्रजाती, ७७ प्रकारचे पक्षी आणि ३४ वन्यफुलांच्या प्रजाती असलेले आणि किमान १० बिबळ्यांचा अधिवास असलेले आरे हे जंगल का नाही, असा सवाल सरकारला केला आहे.

जे अ‍ॅमेझॉनच्या बाबतीत तेच आरेच्याही बाबतीत लागू आहे. आरे आणि त्याला संलग्न असलेले राष्ट्रीय उद्यानाचे जंगल हे मुंबईचे फुप्फुस आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुंबईतील पहिले नागरीकरण अस्तित्वात आले ते आरेच्या दोन्ही बाजूंना म्हणजे मरोळ आणि दुसऱ्या टोकाला कान्हेरीच्या लेणींमध्ये. या दोन्हींमध्ये आरेचे व राष्ट्रीय उद्यानाचे जंगल नसते तर मुंबईतील इसवीसनपूर्व शतकातील व नंतर मध्ययुगातील हे नागरीकरण अस्तित्वातच आले नसते. आरेने त्या नागरीकरणाचा पाया घातला याचा विसर पडला तर पायावर कुऱ्हाड मारण्याऐवजी कुऱ्हाडीवरच आपण जाणीवपूर्वक पाय मारून घेतल्यासारखे होईल!

First Published on September 6, 2019 1:04 am

Web Title: amazon rain forest fire to arya metro work
Next Stories
1 सकल मति प्रकाशु!
2 मनोधैर्याची कसोटी
3 ओल्या दुष्काळात तेरावा महिना
Just Now!
X