प्रभातफेरीला आलेली कदम आणि आपटे ही दोन्ही आजोबा मंडळी तणावाखाली होती. दोघांच्याही तणावाचे कारण एकच होते. आजवर सर्व व्यवहार सचोटीने केले, मग आयकर खात्याची नोटीस कशी काय आली. सामान्य मध्यमवर्गीय पेन्शनर, त्यातही मराठी त्यामुळे आयकर खात्याची नोटीस पाहून बोबडीच वळायची बाकी होती. उतारवयात आता हे काय लचांड मागे लागले, असे विचार दोघांच्याही मनात होते. त्याबाबत दोघांनीही एकमेकांशी चर्चाही करून झाली. पण पुढे काय हा यक्षप्रश्न दोघांच्याही मनात होता, त्याचवेळेस सीए असलेली अभिरुची त्यांना दिसली आणि जीव भांडय़ात पडला. तिच्यासाठी या प्रश्नात नवीन काहीच नव्हते, कारण अशा अनेक आजोबांनी गेल्या काही महिन्यात तिला भेटण्याचा सपाटाच लावला होता. कारण नोटिसा अनेकांना आल्या होत्या. मग तिने आजोबांना सारे काही समजावून सांगितले. हल्ली सर्व बँका पॅन क्रमांक मागतात, त्यामुळे आपली सर्व खाती जोडली जातात. काही ठेवी आजोबांनी वर्षांनुवर्षे ठेवल्या होत्या पण त्या आजपर्यंत आयकराच्या जाळ्यात कधीच आलेल्या नव्हत्या. आता त्यावर करभरणा करावा लागणार होता. बदललेले नियम त्यांच्यासाठी नवीन होते. अभिरुचीने त्यांचा प्रश्न सोडवलाही पण त्याचवेळेस नातवाला ‘एफडी’ करून ठेव उपयोगी पडतात, असा आजोबांनी दिलेला सल्ला कसा गैरलागू आहे, तेही सांगितले. तेव्हा आजोबांना लक्षात आले की, काळ बदलला आहे. मग दोघांनीही, वेळ काढून अभिरुचीला भेटण्याचा सल्ला नातवंडांना दिला.
नातवंडांपैकी सिद्धार्थ वेळ काढून गेला खरा पण त्याच्या पहिल्या प्रश्नातच गैरसमज ओतप्रोत भरलेले आहेत, हे अभिरुचीला लक्षात आले कारण तो म्हणाला, ‘मी गुंतवणूक नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन करायला आलो आहे. कर नियोजनासाठी गुंतवणूक कशी करायची सांगा?’ अभिरुची म्हणाली, अरे गुंतवणूक नियोजन आणि आर्थिक नियोजन हे दोन वेगळे भाग आहेत. उद्दिष्ट आर्थिक नियोजन हेच असलं पाहिजे आणि कर नियोजन हा त्याचा एक भाग असतो. त्यामुळे मुळातून तू या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेस आणि मग त्यानुसार स्वत विचार करून निर्णय घ्यायला हवा. मित्र सांगतात, एसआयपी कर म्हणून त्यांनी केलेल्या योजनेतच एसआयपी करण्यात शहाणपण नाही. कारण ते अनेकदा शेअर बाजाराशी संबंधित असतं. योजना कशाशी निगडित आहे ते पाहून निर्णय घ्यावा लागतो.
शिवाय आता तरुणपणी वयाच्या २३ व्या वर्षी एकदा नियोजन केले की झाले, असेही होत नाही. त्याचे पुनरावलोकन करावे लागते. कारण दरम्यानच्या काळात कायदे व तरतुदी बदललेल्या असतात. नाहीतर पंचाईत होणार. आयुष्यात येणारे चढ-उतार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वाढत चाललेले वय या साऱ्याचा विचार करून आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यांवर निर्णय घ्यावे लागतात. कारण आजूबाजूची परिस्थितीही बदलत असते. संतवचने केवळ वाचून उपयोग नसतो. ती अमलातही आणायची असतात.. तुकोबा उगाच नाही म्हणत.. जोडोनिया धन उत्तम वेव्हारें, उदास विचारे वेच करी !
vinayak-signature
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com