गणपती या आबालवृद्धांना आवडणाऱ्या देवतेवर प्रेम नसलेला माणूस तसा विरळाच. अगदी स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या अनेकांनाही गणपतीच्या या रूपाकाराचा मोह आवरता येत नाही.  अर्थात ते त्याकडे कलाकृती म्हणूनच पाहतात. आपल्याकडे सर्वाधिक संशोधन या गणपतीवरच व्हायला हवे होते, पण दुर्दैवाने वस्तुस्थिती मात्र तशी नाही. गणपतीवरचे सर्वात महत्त्वाचे संशोधन केले आहे ते पॉल मार्टिन दुबोस या जन्माने फ्रेंच असलेल्या संशोधकाने. त्यांच्या संशोधनावर प्रकाशझोत टाकणारा अंक गेल्या वर्षी ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केला. त्याच वेळेस हेही लक्षात आले की, दुबोस यांनी घेतलेल्या गणेश मूर्ती- चित्र- शिल्प यांच्याही पलीकडे खूप गोष्टी अद्याप संशोधनाच्या कक्षेत येणे बाकी आहेत. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की, संशोधन तर दूरच, आपण अद्याप गणपतीशी संबंधित गोष्टींचे धड दस्तावेजीकरणही केलेले नाही. बहुधा आपण या गणपतीला गृहीतच धरलेले दिसते. एखादी गोष्ट गृहीत धरली की, तिचे महत्त्वही अनेकदा नजरेआड होते. तसेच झाले असावे गणपतीच्याही बाबतीत. उत्सवाच्या धांगडधिंग्यात मश्गूल असलेल्यांना तर याचे सोयरसुतकही नाही. म्हणूनच या गणेश विशेषांक – भाग दुसऱ्याच्या निमित्ताने शक्य असेल तेवढे दस्तावेजीकरण करावे, ही ‘लोकप्रभा’ची यामागची भूमिका आहे. गेल्या वर्षी आम्ही देशाबाहेर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे दस्तावेजीकरण केले होते. यंदा आम्ही आपल्याच राज्यातील शंभर वर्षे पार केलेल्या गणेश मंदिरांचे दस्तावेजीकरण केले आहे. अर्थात अद्याप खूप काम बाकी आहे. ‘लोकप्रभा’चा हा विशेषांक या व अशा अनेक उपक्रमांसाठी निमित्त ठरावा.

यानिमित्ताने लक्षात आलेल्या काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत. अनेक मंदिरांचे जुने अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे इंग्रजांनी दिलेली सनद. इंग्रजांनी मात्र येथील मठ-मंदिरांचे व्यवस्थित दस्तावेजीकरण केले. अर्थात ते अध्र्या जगावर राज्य करू शकले याचे श्रेयही त्यांच्या या शिस्तीला व दस्तावेजीकरणालाच जाते. मात्र आपण त्यातून काहीच शिकलो नाही.

दस्तावेजीकरणच नसल्याने आपल्याकडे काय आहे, त्याचे महत्त्व काय, याचीही जाण समाजाला नाही. पुण्यातील त्रिशुण्ड गणपतीच्या मंदिराच्या बांधकामात तत्कालीन राजकीय परिस्थितीचे पडसाद शिल्पित झालेले पाहायला मिळतात. मात्र आज अनेक पुणेकरांनाही त्याची माहिती नाही, तिथे उर्वरित महाराष्ट्राचे ते काय? शिलाहारांच्या काळातील गणपतीचे सोन्याचे नाणे कुठे आहे? कागदाच्या लगद्यापासून केलेली गणपतीची जुनी मूर्ती आज कोणत्या बँकेमध्ये आहे? या प्रश्नांची उत्तरे हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असणार आहेत.

पुण्यातील मोरेश्वर कुंटे यांनी एके काळी एमफिफ्टीवरून पूर्ण महाराष्ट्र पालथा घालून मंदिरांचे दस्तावेजीकरण केले. हे वगळता आपल्याकडे इतर दस्तावेज उपलब्ध नाहीत. गणपतीच्या दस्तावेजीकरणातून तत्कालीन समाजाच्या परंपरांचा ऐतिहासिक वेध घेणेही शक्य आहे. मध्ययुगामध्ये मारुतीप्रमाणेच गणपती हाही वेशीवरचाच एक देव होता, याची माहिती हे दस्तावेजीकरण करताना हाती लागते. मग तो गावातला देव केव्हा झाला याचा घेतलेला शोध देवतेच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासाचे टप्पेही उलगडत जातो. त्यामुळेच गणपतीला, ‘हा काय आपला नेहमीचाच देव’, असे म्हणून गृहीत न धरता त्याचा संशोधनात्मक पद्धतीने शोध घेण्याची गरज आहे.  अर्थात दस्तावेजीकरण ही संशोधनाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी असणार आहे. यात प्रसंगी धार्मिकता आणि भावनाही बाजूला ठेवाव्या लागतील. तरच त्याला संदर्भमूल्य आणि संशोधनमूल्य प्राप्त होते. हे साध्य केले तरच गणपतीला विद्येची देवता म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त होईल. त्यासाठी लवकरच आपल्याला दस्तावेजीकरणाचाच गणपती बसवावा लागेल. तशी बुद्धी आपल्याला होवो, यासाठीच बुद्धीम् आह्वयामि!

vinayak-signature

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com