12 December 2018

News Flash

जाणीवेची जाणीव!

सुमारे सहा महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुद्दय़ावरून फेसबुक अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडले.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुद्दय़ावरून फेसबुक अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडले. टेस्लाचे सीईओ इलोन मस्क आणि फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांच्यामध्ये त्यावरून वादाच्या नौबतीही झडल्या. दोन बाजूंमध्ये एखादा वाद किंवा तडजोडीची चर्चा होते तेव्हा त्यात भाषेचा भाग हा किती महत्त्वाचा असतो, ते समजून घेण्यासाठी फेसबुकने एक प्रयोग केला. यामध्ये दोन चॅटबोट्सचा वापर करण्यात आला. त्या वेळेस संशोधकांच्या असे लक्षात आले की, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या चॅटबोट्सनी त्यांच्या संवादासाठी इंग्रजी वगळता एक वेगळीच स्वत:ची स्वतंत्र भाषा तयार केली असून त्या भाषेमध्ये त्यांचा संवाद सुरू होता. ही भाषा तयार करण्यात माणसाचा कोणताही सहभाग नव्हता. आपणच म्हणजे माणसाने निर्माण केलेले चॅटबोट्स एकमेकांशी काय संवाद साधत आहेत, ते कळत नव्हते. कारण त्यांचा संवाद अगदीच अनाकलनीय होता. अखेरीस फेसबुकने तो प्रयोग बंद केला. अनाकलनीय अशी स्वतची वेगळी संवादभाषा यंत्रांनी विकसित केल्याने आता हे समस्त मानवजातीसाठी आव्हानच आहे, अशी आवई त्यावर जगभरात उमटली. टेस्लाच्या सीईओंनीदेखील त्यासाठी मार्क झकरबर्गचे या विषयातील ज्ञान तोकडे आहे, अशी टीका केली. यातील वादात न पडता विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येईल की, त्या वेळेपासून जगभरात एका नव्या मुद्दय़ाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे कधी काळी अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झालेली यंत्रे माणसावर राज्य करतील का? किंवा यंत्रांनी माणसालाच आपले गुलाम करण्याची शक्यता किती आहे?

कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रांना प्राप्त होईल तेव्हा पाहू, असा विचार सामान्य माणसे करतात पण सजग वाचक नाही. म्हणूनच नववर्षांच्या सुरुवातीसच हा महत्त्वपूर्ण विषय ‘लोकप्रभा’च्या सजग वाचकांनी समजून घ्यावा म्हणून यावरच कव्हरस्टोरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढचा टप्पा आहे. त्या टप्प्याचा प्रवासही आता परिपक्वतेच्या दिशेने सुरू आहे. स्वयंप्रज्ञा म्हणजे कॉग्निशन. त्याला आपण सामान्य भाषेत जाणीव असा जवळ जाणारा शब्द वापरू शकतो. आता संगणकशास्त्रातील क्रांतीकारी बदलांमुळे मानवी भावभावनांपासून सारे काही यंत्रणांना ओळखता येते. पंचेंद्रियांनी होणारे ज्ञानही त्यांना प्राप्त होईल. पण जाणिवेचे काय? शिवाय ज्ञानशास्त्राच्या परिभाषेत विचार करता, ज्ञान म्हणजे नेमके काय? ते प्राप्त होते म्हणजे नेमके काय होते? हेही आपण समजून घेतले पाहिजे. नवजात अर्भक त्याच्या जन्मानंतर डोळे उघडल्यावर प्रथम पाहते तेव्हा तो त्याच्या ज्ञानाचा-जाणिवेचा पहिला क्षण असतो. आपण काही तरी पाहिलेय किंवा आपल्याला दिसले आहे एवढेच त्याला त्या क्षणाला कळते, ती जाणीव असते. पण काय पाहिले आहे ते समजण्यासाठी त्याला द्रव्य, रूप, गुण, जाती आणि क्रिया या पाच गोष्टींची गरज भासते. म्हणजे वस्तू ही चल-अचल, जड की प्रवाही, तिचा आकार आदी बाबींवरून जे पाहिले ते नेमके काय ते त्याला कळते. तेव्हा ज्ञानाची प्रक्रिया पूर्ण होते.

पण, मानवी आयुष्यातील क्रांतिकारी घटनांचे बीजारोपण हे जाणिवेच्या पहिल्या टप्प्यावरच सुरू झाले आहे. माझा जन्म नेमका कशासाठी? मी कोण? याचाच विचार तर हजारो वर्षे माणूस करतो आहे. त्यातूनच एखाद्याला बोधी प्राप्त होते आणि गौतमाचा गौतम बुद्ध होतो. बद्ध ते बुद्ध असा हा जाणिवेचा प्रवास आहे. यंत्राला विरक्ती आली आहे आणि त्याने संन्यास स्वीकारला आहे, हे होणे नाही! कारण त्याला जाणीवच नाही. ते स्मार्ट असू शकते, हुशार असू शकते पण शहाणे नाही. शहाणपण ही माणसाला लाभलेली जाणिवेची देणगी आहे. या नववर्षांत आपली ही जाणीव अधिक प्रखर होवो!
नववर्षांच्या शुभेच्छा!

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on January 5, 2018 1:08 am

Web Title: artificial intelligence 2