विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

आधी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुका, त्यानंतर आता पाठोपाठ मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील जोरदार धक्का असा अनुभव लोकसभा २०१९ पूर्वी भाजपाला मिळणे यात योगायोग कमी आणि स्वकर्मे, स्वहस्ते ओढवलेलेच अधिक अशी स्थिती आहे. २०१४ साली खूप विश्वासाने देशभरातील मतदारांनी अभूतपूर्व अशा पािठब्यावर मोदी सरकारला निवडून आणले. अर्थात दीर्घकाळ सत्तेत राहिलेली काँग्रेस, एकूणच देशात आलेली मरगळ, धोरणलकवा अशा अनेक गोष्टी त्या वेळेस भाजपाच्या पथ्यावर पडल्या आणि भरघोस बहुमत मिळाले खरे. मात्र ते मिळताना दिलेली आश्वासने मोदी यांनी पाळली नाहीत, त्याचा परिणाम म्हणजे मतदारांचा विश्वास गमावणे. कोणत्याही राजकीय पक्षासाठी निवडणुका गमावणे हा प्रचंड मोठा फटका असतो. कारण राजकारण्यांसाठी तीच अंतिम परीक्षा असते. या पाचपैकी तीन राज्यांमध्ये अंतिम परीक्षेत काँग्रेसने बाजी मारली आहे. आता आमच्यातील अंतर कमी आहे, असा युक्तिवाद भाजपाच्या नेत्यांनी करण्यात काहीच अर्थ नाही. सत्ता कोणाची याचे उत्तर त्यांच्यासाठी तरी केवळ नकारार्थीच आहे!

गुजरात निकालांच्या वेळेस झालेल्या अटीतटीच्या निकालांनंतर भाजपाने सत्ता स्थापन केली तरी त्यांना शंभरीही पार करता आली नाही. त्या वेळेस काँग्रेसने मारलेली मुसंडी ही एकहाती नसली तरी त्याचे बरेचसे श्रेय त्यांचे बदललेले धोरण आणि राहुल गांधींनी घेतलेली मेहनत याला होते. तो पराभव हादेखील काँग्रेसचा नैतिक विजयच असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्या वेळेस भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तर राजकारणाच्या पटावर विजय हा विजय असतो एवढाही राजकीय धडा राहुल गांधी यांना माहीत नाही, अशी टिप्पणी करीत त्यांच्यावर शरसंधान केले होते. मात्र मंगळवारी परिस्थिती नेमकी उलट होती. राहुल गांधी यांच्या जागी भाजपाचे विविध प्रवक्ते होते आणि तिन्ही राज्ये हातातून गेल्यानंतरही दोन्ही पक्षांना मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे  काँग्रेसला वाटत असले की ते जिंकले आहेत तरीही भाजपाने त्यांना कडवे आव्हान देत आपले गड बऱ्यापैकी राखले आहेत, असा युक्तिवाद भाजपाचे प्रवक्ते करीत होते. मात्र हा लटका आणि तोकडा असा युक्तिवाद होता, त्यात काहीच राजकीय दम नव्हता. आपलेच पक्षाध्यक्ष गुजरात निवडणुकांच्या वेळेस काय म्हणाले होते याचा विसर बहुधा या प्रवक्त्यांना पडला असावा.. राजकारणाच्या पटावर विजय हा विजय असतो!

२०१४ ला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर अवघ्या साडेचार वर्षांतच भाजपावर ही वेळ का यावी? मध्य प्रदेशात सलग १५ वर्षांच्या सत्तेनंतरही पदच्युत का व्हावे लागावे? छत्तीसगढ हा खऱ्या अर्थाने भाजपाचा गड असतानाही तिथेही ही वेळ का यावी, याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर त्याचे पहिले कारण आपल्याला राहुल गांधी यांनी विजयानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात सापडावे. राहुल गांधी यांचे हा अंहाकाराचा पराभव आहे, हे विधान प्रातिनिधिक म्हणून घ्यावे लागेल. ते राजकारणी आहेत, ते विधान करू शकतात आणि त्यांचे विधान ऐकलेही जाऊ शकते. मतदार विधान करतात ते मतपेटीमधून, त्यांच्या मतांच्या माध्यमातून. ते ऐकायचे किंवा नाही याचा पर्याय कोणत्याच राजकीय पक्षासमोर नसतो. त्या विधानाचा आवाज राजकारणात इतर कोणत्याही आवाजापेक्षा नेहमीच मोठा असतो. तसाच त्याचा फटकाही मोठा असतो! भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांना भोवली ती त्यांची मग्रुरी आणि अहंकार. प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे उतारा आहे आणि आपण म्हणतो तोच केवळ एकमात्र उतारा आहे, असे राजकारणात चालत नाही. लोकांचे अर्थात मतदारांचे आणि प्रसंगी विरोधकांचेही ऐकावे लागते. सध्या बेरोजगारी आणि शेतकीमधील समस्यांमुळे शेतकऱ्यांमधील असंतोष या देशातील सर्वात मोठय़ा दोन समस्या आहेत. त्यावर कोणताच उतारा भाजपाला सापडलेला नाही. खरे तर गुजरातमधील निकालांनी भाजपाला तो इशारा देण्याचे काम केले होते. मात्र तरीही भाजपाने त्याकडे दुर्लक्षच केले.

२०१४ च्या निकालांचा आणि त्यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या निकालाचा अर्थ लावताना अनेक सिद्धान्त राजकारणाच्या क्षेत्रात नव्याने मांडले गेले. देशाचा प्रवास आता शहरीकरणाच्या दिशेने होतो आहे आणि भाजपा हा नवा शहरी पक्ष आहे. देशामध्ये ४७ टक्क्यांहून अधिक शहरीकरण झाले आहे. हा शहरी मतदारांना भावणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे या पुढच्या काळात भाजपालाच भविष्य आणि भवितव्य आहे, असे मांडणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही; देशाची ग्रामीण जनता नव्हे तर आता नागरी जनता ठरविणार की या देशावर कोण राज्य करणार, असे आडाखे बांधण्यात आले. या नागर जनतेचा पक्ष म्हणून भाजपालाच या देशात पसंती आहे असे भासविण्यात आले. त्या नागर जनतेचा चेहरा म्हणून सोशल मीडियाच्या जोरदार परिणामांचे दाखले देण्यात आले. त्याचाच गवगवा एवढा जोरदार झाला की, सोशल मीडियावर ज्यांचे राज्य, ट्रोलचे साम्राज्य, त्यांचेच राज्य या देशावर आणि देशातील राज्यांत, असे ढोल बडविण्यात आले. त्यामुळे ट्रेिण्डगमधून देशाचा कल कळणार असे नवे आडाखे बांधण्यात येऊ लागले. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्याचीच चर्चा जोरदार झाली, अगदी गुजरात निवडणुकांपर्यंत. त्यानंतरही त्याचे ढोल वाजायचे थांबले नाहीत. पण परिस्थिती बदललेली होती. कर्नाटक आणि नंतर आता झालेल्या पाच राज्यांनी नेटवरच्या आभासी वास्तवापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती किती महत्त्वाची असते हे राजकारण्यांना दाखवून देण्याचे काम केले.

त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा गैरसमज या निकालांनी दाखवून दिला की, तो म्हणजे नागर चेहरा महत्त्वाचा. देशातील शहरीकरण वाढलेले असले तरी आजही शेतकऱ्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत हा आजही कृषिप्रधान असाच देश आहे आणि शेतकऱ्यांना आजही तेवढेच महत्त्व आहे. नोटाबंदीचा फटका खूप मोठय़ा प्रमाणावर ग्रामीण भागाला बसला हे वास्तव अभ्यासांती नाकारणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल. तो फटका आता वादातीत सिद्ध झाला आहे, आर्थिक आणि शास्त्रीय कसोटीवर. ग्रामीण भारतात खास करून शेतमालाच्या भावासंदर्भात प्रचंड असंतोष आहे. या शेतकऱ्यांना मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात गृहीत धरण्याचे काम केले. शेतमालाचा हमीभाव वाढविणे हा निश्चितच अंतिम पर्याय नाही. तो पर्याय सुरुवातीच्या तीन वर्षांमध्ये मोदी सरकारने नाकारला आणि उशिरा सुचलेल्या शहाणपणानंतर त्यांनीही त्यापूर्वी काँग्रेसने स्वीकारलेल्या मार्गानेच जाणे पसंत केले आहे. ती सरकारची अगतिकता आहे आणि किमान सध्या तरी शेतकऱ्यांसाठीही पर्याय, जो त्यांना सद्य:स्थितीत आधार आणि जगण्याचे बळ देणारा आहे. मात्र येणाऱ्या काळातच कोणत्याच सरकारला शेतीच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे भीषण वास्तव आहे.

नागरीकरणाच्या प्रेमात असलेल्या आणि नागरी चेहरा असलेल्या भाजपाने एक महत्त्वाची बाब इतिहासातून शिकायला हवी. शहरे कितीही विकसित झाली तरी ती ज्या अन्नधान्यमालावर पोसली जातात तो ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भाग हा शहरीकरणाला पोसण्याचे काम करतो. ग्रामीण भागात अधिकचे उत्पादन होणे ही शहरीकरणाच्या प्रक्रियेची महत्त्वाची पूर्वअट असते. हा अन्नधान्यमाल याच्या उत्पादनात घट होते तेव्हा शहरे आक्रसत जातात हा हडप्पा- मोहेंजोदारोपासून मिळालेला धडा आहे. शहरीकरणाच्या ऱ्हासाचा थेट संबंध हा ग्रामीण भागात घटलेल्या शेतीच्या उत्पादनाशी आहे. जगभरातील मोठमोठी शहरे यामुळे लयाला गेली आहेत. महत्त्वाचे म्हणजे जगातील मोठय़ा शहरांचा ऱ्हास झाला त्या वेळेस ग्रामीण भागातील समृद्धी कमी झाली. मात्र ग्रामीण भाग टिकला, तो संपुष्टात आला नाही किंवा गावांचा ऱ्हासही झाला नाही. ती गावे स्वतला पुरण्याइतके पिकवीत होती. ती तग धरून राहिली.

या निवडणूक निकालांनी दिलेला दुसरा महत्त्वाचा धडा हा मग्रुरी आणि अहंकार राजकारणात कामाचा नसतो. राजकारणात तुम्हाला नम्र राहावेच लागते. भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांसाठी हा महत्त्वाचा धडा आहे. हातातील महत्त्वाची राज्ये जाणे हा त्यांच्या अहंकाराचा पराभव आहे. ज्या राहुल गांधी यांना पाच वर्षांपूर्वी शेलक्या भाषेत हिणवण्याचे काम भाजपा नेत्यांनी केले त्या राहुल गांधी यांनी मात्र तो धडा घेतलेला दिसतो. कारण विजयानंतर त्यांनी तिन्ही राज्यांच्या पूर्वाश्रमीच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि सरकारचे चांगले कार्यक्रम सुरूच राहतील, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर आम्ही कुणालाही भारतमुक्त करणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. नम्रता काम करते, मग्रुरी पराभवास कारण ठरते! इतिहासातून धडे घ्यायचे असतात. तो केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी शिकायचा नसतो. त्यातून धडा घेत भविष्याचा प्रवास करायचा असतो. धडा शिकणाऱ्यास इतिहास लक्षात ठेवतो आणि पुन्हा चूक करणाऱ्यास इतिहास कधीच माफ करीत नाही!