भाजपाचा दणदणीत पराभव करीत बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात पाचव्यांदा शपथ घेतली. या सोहळ्यामध्ये शपथविधीपेक्षाही आकर्षण आणि सर्वाचेच लक्ष लागून राहिलेले होते ते भाजपाविरोधात एकवटलेल्या राजकारण्यांकडे! मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार शपथ घेणार हे जेवढे ठरलेले तेवढेच लालूपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदी हेही ठरलेलेच, इतर मंत्री कोण होणार यात स्थानिक बिहारी जनतेला रस असेलही, पण देशभरातील जनतेला त्यात फारसे स्वारस्य नव्हते, पण या सोहळ्यात कोणकोणते मोदी-भाजपाविरोधक उपस्थिती लावतात, याकडे विरोधकांचे बारकाईने लक्ष होते. त्यातही या सोहळ्यात विरोधकांची देहबोली काय सांगून जाते, याकडे राजकीय धुरीण आणि विश्लेषक लक्ष ठेवून होते. मोदी-भाजपाविरोधाला या सोहळ्यात भरते आले होते. आता हीच लाट पुढे वेग घेईल, मोठी होईल आणि त्यात भाजपा भुईसपाट होईल, असे दिवास्वप्न पाहायला मोदीविरोधकांनी सुरुवातही केली आहे; पण राजकारणातील जाणकार या दिवास्वप्नाला भुलणार नाहीत किंवा खुद्द या विरोधकांमध्ये असलेले अनुभवी नेतेही ‘आता भाजपा भुईसपाटच होईल’, असे विधान करू धजावणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वीसारखी स्थिती आता राहिलेली नाही म्हणजेच राजकीय पक्षांनी सांगावे किंवा नेत्यांनी सांगावे आणि जनतेने ऐकावे अशी परिस्थिती नाही. जनताही सुज्ञ झाली आहे आणि ती मतपेटीतून आपले सामथ्र्य दाखवते. कधी मस्तवाल होत चाललेल्याला जाग्यावर आणते, तर कधी वर्षांनुवर्षांचा इतिहास एका निवडणुकीत पुसूनही टाकते. मोदींना लोकसभेत मिळालेले स्पष्ट बहुमत, मात्र नवी दिल्लीत खावी लागलेली जबरदस्त आपटी आणि त्याचीच बिहारमध्ये झालेली पुनरावृत्ती हे सारे भारतीय जनता सुज्ञ झाल्याचेच लक्षण मानायला हवे.

बिहारमधील तुफान यशानंतर भाजपाविरोधकांना हत्तीचे बळ मिळाल्यासारखी अवस्था झाली आणि मग एरवी भारतीयांच्या विस्मृतीत गेलेले माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदी चेहरेही पुन्हा दिसू लागले. नितीशकुमार यांच्या शपथविधीला लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजितसिंह, द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्वर्यू करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे सर्व जण एकत्र होते. गेला बाजार भाजपाचे सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना व शिरोमणी अकाली दलाचे नेतेही या वेळी उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले यातील अनेक नेते भाजपाविरोधात बहुमताने निवडून आलेल्या बिहार सरकारच्या शपथविधीला एकमेकांच्या शेजारी बसले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी एकाच व्यासपीठावर होते. त्याचप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांनी ज्यांचा दणकून पराभव केला त्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित एकाच व्यासपीठावर होते. काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी यांनी तर लालूप्रसाद यादवांना कडकडून मिठीही मारली ती छायाचित्रकारांसाठी पर्वणी ठरली; पण याचा अर्थ हे सारे जण खरोखरच एकवटले आहेत आणि आता भविष्यात भाजपाला पळता भुई थोडी होईल, असे नाही. विरोधकांची एकी किती खरी याचा प्रत्यय तर येत्या हिवाळी अधिवेशनातच येईल, निवडणुका तर अजून थोडय़ा दूर आहेत. संसदेच्या अधिवेशनातही अनेकदा विरोधकांची एकी दिसणे मुश्कील असते, याचा अनुभव आता भाजपा सरकारच्याही गाठीशी आहे.

विरोधक नेत्यांमधील शरद पवार यांच्याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. ते खरोखरच कुणाबरोबर आहेत हे केवळ तेच सांगू शकतात. शिवसेनेची उपस्थिती ही भाजपाला खिजवण्यासाठीची होती हेही वेगळे सांगायला नको. राहुल गांधी यांची लालूप्रसाद यादवांना मारलेली मिठी म्हणजे आता सारे काही मिटले असा अर्थ त्यातून काढून नये. बिहारमध्ये जे घडले त्याला भाजपाच स्वत: कारणीभूत आहे, त्यांनीच विरोधकांना एकत्र येण्याची संधी दिली. विनाकारण हिंदुत्वाच्या नावावर कधी दादरी प्रकरणात तर कधी गाईचा मुद्दा उचलून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा नाहक प्रयत्न केला, तो त्यांच्या अंगाशी झाला. ध्रुवीकरण झाले, मात्र ते विरुद्ध दिशेला. भाजपामधील वाचाळवीरांनी त्या त्या वेळी त्यात तेल ओतण्याचेच काम केले. पक्षाध्यक्ष अमित शहांनी त्यांना रोखण्याची कोणतीही तसदी त्या वेळेस फारशी घेतली नाही. परिणामी बि‘हार’ला सामोरे जावे लागले.

शपथविधीला एकत्र नेत्यांपैकी सीताराम येचुरी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये पुढील वर्षी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचा सामना रंगणार आहे, त्यामुळे त्यांच्या एकाच व्यासपीठावर असण्याला काहीही अर्थ नाही. जिथे सोयीचे आहे, तिथेच केवळ मोदीविरोधासाठी हे दोघेही एकत्र येऊ शकतात, पण तशी वेळ आता येणे कठीण आहे. कारण पुढील वर्षी दोघांनाही घरच्या अंगणात निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे आपल्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी कोणतीही कृती दोघांकडून होणार नाही. योगेंद्र यादवांना बाहेरचा रस्ता दाखवलेला असला तरी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पक्षात काही सारे आलबेल नाही. शिवाय आता मतदारही प्रश्न विचारू लागले आहेत, याचा प्रत्यय केजरीवाल यांना आला आहे. पहिल्या शपथविधीला सार्वजनिक वाहनांतून येणारे मंत्री आता आलिशान गाडय़ांमधून कसे, असा प्रश्न दिल्लीकर मतदार जाहीरपणे विचारताहेत. शिवाय विरोधाचे शब्द पक्षांतर्गतच ऐकण्याची वेळही केजरीवालांवर आली आहे. त्यामुळे शपथविधीच्या वेळेस जे दिसले त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे.

या सर्वाच्या तुलनेत काँग्रेसमध्ये मात्र अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्याने उत्साह आहे. त्यामुळे आता याच विजयाच्या मुहूर्तावर राहुल गांधींचा काँग्रेसाभिषेक व्हावा, असे कार्यकर्त्यांना वाटते आहे. कारण पराभवाचीच वाट अधिक चालणाऱ्या त्यांच्या पदरात विजय केव्हा पडेल, याची कार्यकर्त्यांनाच खात्री नाही. त्यामुळे भाजपाविरोधातील व्यासपीठावरचे हे एकत्रीकरण फार आशादायी ठरेल, असे दिसत नाही. मात्र त्याने भाजपाला एक चांगलाच धडा शिकविण्याचे काम निश्चितच केले आहे. खरे तर ती एक जबरदस्त चपराक होती. दिल्लीच्या पराभवातून भाजपा फारसे काही शिकलेला नाही, शिवाय वाचाळवीरांचा मस्तवालपणाही कमी झालेला नाही, हे या खेपेस लक्षात आले. भारतीय मतदार आक्रस्ताळे बडबडणाऱ्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही, हे आजवर लक्षात यायला हवे होते.

आता पुढील वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, पाँडिचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्याच्याही पुढच्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये राजकीयदृष्टय़ा देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील किरकोळ पाँडिचेरी वगळता तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपाला फारशी अपेक्षा ठेवता येणार नाही. मोदी लाटेत या भागांत काही जागा मिळालेल्या असल्या तरी ती केव्हाच ओसरल्याचे संकेत नव्हे तर इशारे मिळाले आहेत. त्यामुळे नव्याने आखणी करावी लागेल. या सर्व भागांमध्ये संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपाचे प्रयत्न असतील. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असेल ती उत्तर प्रदेशातील निवडणूक. संख्याबळाच्या तुलनेतही ही सर्वात महत्त्वाची निवडणूक असेल. इथे मात्र भाजपाचे सारे काही पणाला लागेल. म्हणूनच तिथे काय होते याकडे वर्षभर आधीपासूनच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तिथे भाजपाविरोधक काय करतात किंवा ही एकी तोपर्यंत तरी टिकणार काय, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. नितीशकुमारांच्या शपथविधीला एकत्र आलेल्या विरोधकांचेही आता ‘उत्तर’ जिंकण्याचेच लक्ष्य आहे. त्यासाठी मुलायमसिंहांची समाजवादी पार्टी आणि मायावतींच्या बहुजन समाज पार्टीची एकत्र मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची वार्ता आहे; पण दोन्ही पक्षांचा इतिहास पाहता ती कर्मकठीण गोष्टच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

नाही म्हणायला पूर्वेकडे असलेल्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत थोडीशी मुसंडी मारण्यात भाजपाला यश आले होते, पण आता मोदी लाट राहिलेली नसल्याने परिस्थिती बदललेली असेल. तिथे भाजपाला मिळणाऱ्या मतांचा फायदा इतर दोघांमध्ये कुणाला होतो हे पाहणे अधिक रोचक असेल.

बिहारमधील पराभवानंतर मोदी-शहा जोडगोळीने आणि एकूणच भाजपाने चिंतनाच्या वाटेने जाणे गरजेचेच आहे. कारण त्यांनी केलेली प्रत्येक खेळी इथे त्यांच्यावरच उलटली. हे कमी म्हणून की काय भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हांनीही पक्षनेतृत्त्वावर तोंडसुख घेतले. असहिष्णुतेचा मुद्दा या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर चर्चिला गेला. पुरस्कारवापसीसाठी अनेकांनी रीघ लावली. त्यातील सत्शील असलेल्यांवरही भाजपाने तोंडसुख घेतले, हे जनतेस निश्चितच आवडणारे नव्हते. प्रत्येकाची आपली भूमिका अभिव्यक्त करण्याची एक पद्धती असते; मात्र भाजपातर्फे त्याकडे हेटाळणीच्या रूपात पाहण्यात आले. हा मतदारांना न रुचलेला प्रकार होता, हेही बिहारच्या निवडणुकीत लक्षात आले. प्रत्येक ठिकाणी मोदींचा चेहरा चालणार नाही, स्थानिकांचाही विचार प्राधान्याने व्हायला हवा, हाही धडा बिहारनेच घालून दिला आहे. देशाचे पंतप्रधान असलेल्या मोदींनीही या निवडणुकीत स्वत:ला खालच्या पायरीवर आणून ठेवण्याचेच काम केले. पंतप्रधानपदाची बूज राखली गेली पाहिजे, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे, हेही त्यांनी ध्यानात ठेवावे, हा मतदारांनी या निवडणुकीत दिलेला संदेश होता. अशा अनेक गोष्टींचे वजनदार गाठोडे घेऊन भाजपाला पुढचा प्रवास करावा लागणार आहे. त्यातील बरेचसे यश विरोधकांच्या एकी किंवा बेकीवर अवलंबून असेल!

01vinayak-signature

विनायक परब