विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

अभ्यासात फारशी प्रगती नसलेला एक मुलगा दहावीनंतर कॉलेज जमणार नाही म्हणून नाक्यावरच बसलेला असायचा. दिवसभर रिकामटेकडा असलेल्या त्याला मग त्या बैठय़ा वस्तीमधली मंडळी कामं सांगू लागली. आजच्या सारखी अ‍ॅप्सवर बिले भरण्याची सोय त्या काळी नव्हती. टेलिफोनचे बिल असेल किंवा मग वीजबिल त्यासाठी काही तास रांगेत उभे राहण्याची वेळ अनेकांवर यायची. मग त्याला कामाला लावायचे आणि हातखर्चाला पाच-दहा रुपये द्यायचे. त्यातूनच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने लोकांची अशा प्रकारे सर्व प्रकारची बिले भरण्याचा लहानसा उद्योग सुरू केला. सातत्याने बिलाच्या काऊंटरवर जात असल्याने तिकडच्या अधिकाऱ्याशीही ओळख झाली होती. मग सगळी बिले एकत्र करून भरण्यास त्याने सुरुवात केली. त्यातून त्याचा उद्योग उभा राहिला. त्यातून सुरू झालेल्या उद्योगाने नंतर मोठे रूप धारण केले.  कालांतरना अ‍ॅप्स संस्कृतीमुळे बिले भरणे सोपे झाल्याने आता त्याच्याकडे बिल भरण्यासाठी कुणी जात नाही. पण तोही तिथे थांबलेला नाही. येणाऱ्या काळात तंत्रज्ञान हाच परवलीचा शब्द असेल याची जाण आलेल्या त्याने तोवर मोबाइल खरेदी-विक्री आणि दुरुस्तीला सुरुवात केली होती. ते करता करता मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण वर्गही सुरू केले. याच दरम्यान, त्याला असे लक्षात आले की, मोठय़ा मोबाइल कंपन्यांनाही सर्वत्र त्यांचे दुरुस्तीचे जाळे उभे करणे शक्य नसते. त्याने या मोठय़ा कंपन्यांना गाठले. तोवर स्वतलाही व्यवसायाची बोलणी करण्यात पटाईत करण्यासाठी त्याने आवश्यक ती सर्व मेहनत घेतली होती. सध्या दोन मोबाइल कंपन्यांची फ्रँचायजी त्याच्याकडे आहे. काळाची पावले त्याने वेळीच ओळखली.

ही यशोगाथा दोन कारणांसाठी महत्त्वाची आहे. काळाची पावले ओळखणे, वेगळी कल्पना लढवणे (नवोन्मेषण) या दोन महत्त्वाच्या बाबी यामध्ये आहेत. त्या गुणांमुळेच ती व्यक्ती यशस्वितेच्या शिखरावर पोहोचू शकली. सध्याच्या जमान्यातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे तंत्रज्ञानामुळे आजूबाजूच्या यंत्रणा आणि पद्धतींमुळे प्रथम विस्कळीतता येणार आहे, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि कामांवर गंडांतर येईल. सध्या तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे. त्याच वेगात बदल होत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे तर तंत्रज्ञानातील बदलांसोबत जुळवून घ्यावे लागेल आणि आपल्याकडे असलेली कौशल्ये परजून घ्यावी लागतील सतत. म्हणजेच कौशल्यांच्या बाबतीत सातत्याने स्वतला काळानुरूप अपग्रेड करावे लागेल तरच भविष्यात आपला टिकाव लागणार आहे, हे ध्यानात असू द्यावे!

करिअरचा विषय निघाला की, विद्यार्थी असो अथवा पालक; सर्वाचाच पहिला प्रश्न असतो निवड करावयाच्या विषयामध्ये स्कोप किती आहे? म्हणजे सध्याच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचे तर काय ‘इन’ आहे आणि काय ‘आऊट’ अशी विचारणा केली जाते. पण जगभरातील यशस्वी व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले तर सहज लक्षात येईल की, त्यांचा स्कोप त्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे आपले शिक्षण आणि कौशल्ये यांच्या बळावर स्वतचा मार्ग स्वतच प्रशस्त करण्याची धमक मनगटात असू द्या!

शुभास्ते पन्थान सन्तु!