17 October 2019

News Flash

करिअर विशेष : आऊट ऑफ द बॉक्स

विद्यार्थ्यांच्या बाबतीत करिअरचा निर्णय घेताना गरज आहे ती आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची.

भविष्यवेधी करिअर्स ही पठडीबाहेरची असणार आहेत.

विनायक परब – @vinayakparab, response.lokprabha@expressindia.com
हात न उचलता सर्व बिंदू जोडून दाखवा, असे सांगणारी व समोर एका आभासी चौकोनात नऊ बिंदू असलेली आकृती अनेकदा कोडे म्हणून समोर येते. यामध्ये मेख एकच असते ती म्हणजे हात न उचलता सर्व बिंदू जोडताना आपणच आपल्या मनाला काही मर्यादा घालून घेतलेल्या असतात. त्यामुळे ज्यांना ते जोडकाम हात न उचलता करण्याचे तंत्र माहीत नाही ते त्या मानसिक मर्यादांमध्ये अडकून राहतात. अखेरीस मग जाणकार माणूस त्याची उकल करतो त्या वेळेस समोरच्यास लक्षात येते की, अरेच्या! हा पठ्ठय़ा तर ते बिंदू  जोडत सरळ पुढे त्या आभासी चौकोनाबाहेर निघून गेला आणि मग त्याला ते सर्व बिंदू  हात न उचलता जोडणे सोपे गेले. एखादा अहंकार दुखावलेला आणि हुज्जत घालणारा असतो तो मग युक्तिवाद करू लागतो.. आम्हाला काय माहीत त्या चौकोनाबाहेर जायची परवानगी होती. तर काही जण म्हणतात, बाहेर जाण्याची परवानगी आहे हे सांगितलेले नव्हते;. पण सांगणाऱ्याने तर केवळ एवढेच सांगितले होते की, हात न उचलता सर्वच्या सर्व बिंदू जोडायचे आहेत. त्याने हा चौकोन आहे. चौकोनाच्या बाहेर जाऊ नका, असे काहीच सांगितलेले नव्हते, पण मग असे का घडले?

याचे कारण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, ते सर्व बिंदू हे एका चौकोनात आहेत आणि तीच मर्यादा आहे असे आपल्या मनाला उगीचच वाटते. कारण आपण सामान्य पद्धतीने विचार करतो. हीच नेमकी आपली अडचण आहे. हे कोडे किंवा त्याचे उदाहरण आऊट ऑफ द बॉक्स गेल्यास प्रश्न सुटू शकतो हेच दाखवून देते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत करिअरचा निर्णय घेताना गरज आहे ती अशी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची. भविष्यवेधी करिअर्स ही पठडीबाहेरची असणार आहेत. कदाचित त्यासाठीची शिकवणी कुठेही मिळणार नाही, आपले आपल्यालाच एखादी गोष्ट पाहून, हाताळून किंवा निरीक्षणांती शिकावे लागेल. हे लक्षात येण्यासाठीच आम्ही चार महत्त्वाची आऊट ऑफ द बॉक्स करिअर्सची निवड केली असून त्याची माहिती या अंकात एका विशेष विभागात दिली आहे. त्यात स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेण्ड स्पॉटर, यूटय़ूबर, व्लॉगर अशा नव्या व अनोख्या करिअरची माहिती दिली आहे.

वेगळ्या विषयांची निवड करून त्यात यशस्वी झालेल्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. पालक आपल्या पाल्याच्या संदर्भातच निर्णय घेताना अनेकदा आपल्या वेळेस काय होते याचा विचार करून त्याप्रमाणे पाल्यांना काही सुचवायचा प्रयत्न करतात. आता बराच काळ निघून गेला आहे. जग बदलले आहे, याचे भान पालकांनी ठेवणे अपेक्षित आहे. जिनोमिक्समधील विख्यात संशोधक डॉ. श्रीकांत माने म्हणतात की, आईवडिलांच्या इच्छेविरोधात हे करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. ती नाराजी १९७५ ते २००५ अशी तब्बल ३० वर्षे कायम होती. मात्र २००५ साली जागतिक प्रसिद्धी मिळाली त्या वेळेस तो निर्णय त्यांना पटला. डॉ. माने यांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले तिथे आपली काय कथा? याचा विचार पालक व विद्यार्थी दोघांनीही अवश्य करावा. करिअरच्या बाबतीत अनेकदा असेही होते की, शाळेत मागच्या बाकावर बसणारी मुले अधिक यशस्वी झालेली दिसतात. त्या वेळेस त्यांनी धैर्य दाखवून पत्करलेला वेगळा मार्ग व स्वत:ला जोखून मर्यादा ओळखून घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरलेला दिसतो. आभासी चौकोनाची मानसिकता त्यांनी यशस्वी भेदलेली असते.

हा आऊट ऑफ द बॉक्स विचार केवळ करिअरमध्येच उपयुक्त ठरत नाही, तर तो आयुष्यात प्रत्येक वळणावर महत्त्वाचा ठरतो. सो, ऑल द व्हेरी बेस्ट, आऊट ऑफ द बॉक्स प्रयत्नांसाठी!

First Published on June 8, 2018 1:24 am

Web Title: career special issue students career think out of the box