विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
गुरुवार, ३ जानेवारी आणि शुक्रवार, ११ जानेवारी हे दोन्ही दिवस फक्त चीनच्याच नव्हे तर जगाच्याही दृष्टीने महत्त्वाचे होते. ३ जानेवारी रोजी चीनचे चँगे-४ हे अवकाशयान चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या मागच्या बाजूस असलेल्या एका खोल विवरामध्ये यशस्वीरीत्या उतरले. कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या त्या मागच्या बाजूस उतरणारे हे पहिलेच अवकाशयान ठरले. तर चंद्रावर उतरलेल्या रोव्हरने चंद्राच्या मागच्या बाजूस असलेल्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र शुक्रवारी, ११ जानेवारी रोजी पृथ्वीवर पाठविले. या दोन्ही तशा ऐतिहासिक अशाच घटना म्हणायला हव्यात. चंद्र आणि पृथ्वी यांचे एक अनोखे असे नाते आहे. चंद्राला स्वतभोवती प्रदक्षिणा करत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २८ दिवसांचा कालावधी लागतो. हे पृथ्वीच्या वेगाशी एवढे मिळतेजुळते आहे की, त्यामुळे चंद्राचा एक भाग आपल्याला कधीच दिसत नाही. हा न दिसणारा चंद्राचा भाग गेली अनेक वर्षे संशोधकांना खुणावत होता. त्या भागात असलेले वातावरण हे पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीपासून तसेच असेल असे संशोधकांना वाटते आहे. त्यामुळे पृथ्वी किंवा चंद्राच्या जन्माची नेमकी उकल होईल, असे काही संशोधकांना वाटते तर काहींना वाटते की, चंद्रापलीकडे जाणाऱ्या भविष्यातील मोहिमांच्या प्रक्षेपणासाठी चांद्रभूमीचा वापर करायला हवा. त्यातही या कधीच न दिसणाऱ्या चंद्राच्या भागाचा. शिवाय चंद्राचा नेहमी दिसणारा भाग हा अधिक उष्ण असतो. तुलनेने नेहमीच सूर्याला पाठ करून असणारा हा भाग थंड असला तरी सुसहय़ ठरू शकतो. त्यामुळे या मागच्या बाजूविषयी संशोधकांना खूप आकर्षण होते. भारताचे चांद्रयान दोनदेखील याच बाजूस उतरवण्याचा भारतीय संशोधकांचा मानस आहे.

आजवर अनेकांच्या डोक्यात आले खरे की, चंद्राच्या मागच्या बाजूस यान उतरवावे. मात्र ती कर्मकठीण अशी गोष्ट होती. कारण यानाच्या चालनासाठी लागणारे संदेश हे उपग्रहामार्फत पृथ्वीवरून पाठविले जातात. चंद्राच्या मागच्या बाजूस गेले की, उपग्रहाची संदेशवहन यंत्रणा काम करेनाशी होते. त्यामुळे मागच्या बाजूस संदेशच पोहोचले नाहीत तर रोव्हर आणि बाकीच्या यंत्रणा काम कसे करणार, माहिती कशी पाठवणार असा प्रश्न होता. म्हणून आजवर गेल्या अनेक दशकांमध्ये हा प्रश्न तसाच राहिला. मात्र चीनने त्यावर तोडगा शोधून काढला. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी क्वेकिओ नावाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आणि तो अशा प्रकारे चंद्राच्या कक्षेशी संलग्न केला की, मागच्या बाजूस करावयाच्या संदेशासाठी मध्यस्थ म्हणून त्याचा वापर करता येईल. त्याचाच वापर करून त्यांनी आता रोव्हर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरवला आणि त्याने टिपलेले छायाचित्र व इतर माहिती त्यांनी पृथ्वीवर परत पाठविलीदेखील. म्हणून चंद्राच्या मागच्या बाजूस टिपलेल्या आणि पृथ्वीवर यशस्वीरीत्या आलेल्या त्या छायाचित्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण ही तंत्रज्ञानाने घेतलेली मोठीच झेप आहे. चंद्राच्या मागच्या बाजूचे छायाचित्र पाठविणारी चँगे-४ ही काही पहिलीच मोहीम नाही. यापूर्वी लुना-३ या रशियन यानाने १९५९ साली चंद्राच्या मागच्या भूपृष्ठाची छायाचित्रे तब्बल ६० हजार किमी. अंतरावरून घेतली होती. मात्र ती काहीशी धूसर अशी होती. आताची छायाचित्रे ही थेट चांद्रभूमीवरूनच टिपलेली असून तिथूनच थेट पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत.

चँगे-४च्या संदर्भातील आणखी महत्त्वाची घटना म्हणजे या यानातून पाठविण्यात आलेला रोव्हर चंद्राच्या मागच्या बाजूस असलेल्या विवरामध्ये उतरला आहे. या मागच्या बाजूस असलेले पर्यावरण आणि इतर गोष्टी चंद्राच्या जन्मापासून आहेत तशाच राहिलेल्या आहेत, त्यामुळे चंद्र आणि पृथ्वीच्या जन्माच्या वेळच्या स्थितीचा नेमका अंदाज संशोधकांना येईल. त्यातही हे विवर अधिक खोल असल्याने पृथ्वी-चंद्राच्या जन्माचे थेट पुरावेच सापडतील आणि बऱ्याच गोष्टी ताडून पाहता येतील व त्यामुळे अनेक गोष्टींची उकल होण्याची शक्यता आहे. म्हणून ही मोहीम विशेष महत्त्वाची आहे. हे सारे झाले या मोहिमेचे वैज्ञानिक महत्त्व.

मात्र या मोहिमेचे महत्त्व काही तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही. या मोहिमेला अनेक राजकीय कोन आहेत. चीन-रशिया, चीन-अमेरिका, चीन-भारत आणि भारत-पाकिस्तान असे अनेक कोन या मोहिमेसोबत जगभरात चर्चिले जात आहेत. आपली चांद्रयान-दोन मोहीमदेखील अशाच प्रकारची आहे. आपले चांद्रयान-एक चंद्राच्या पृष्ठभागावर व्यवस्थित उतरलेले आणि पहिल्याच फटक्यात चंद्राच्या कक्षेत व्यवस्थित शिरलेले पहिलेच यान होते. त्याची चर्चा जगभर होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे चांद्रभूमीवर सापडलेला बर्फाच्या रूपातील पाण्याचा अंश. चंद्रावर पाणी शोधणे हे त्या मोहिमेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. पाण्याचा अंश सापडलेली ती जगातील पहिलीच यशस्वी मोहीम होती. चीन आणि भारत हे शेजारील पारंपरिक शत्रू असून सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्यातही सध्याच्या कालखंडात जगातील या दोन्ही महत्त्वाच्या व प्रगतिशील अशा अर्थव्यवस्था आहेत. त्यामुळे आपल्या संबंधांची रस्सीखेच येणाऱ्या काळात सुरूच असणार. चीनची या संदर्भातील महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांना महासत्ता व्हायचे आहे. चीनचे सैन्य हे जगातील सर्वात मोठे खडे सैन्य आहे. त्यांच्या नौदलाने आता जागतिक समुद्र व्यापण्यास सुरुवात केली आहे आणि आता त्यांना अवकाशातही त्यांचे साम्राज्य स्थापन करायचे आहे. त्यासाठी त्यांचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा वेग एवढा जबरदस्त आहे की, अमेरिकेच्याही छातीत धडकी भरावी. चीनच्या या मोहिमेनंतर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात त्यावर लगेचच दीर्घ चर्चाही झाली. काहींनी चिंता व्यक्त केली तर काहींनी अमेरिकेने यातून धडा घ्यावा, असे जाहीररीत्या सांगितले. सध्या जगभरात असलेली गुगलची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी गुगलशिवाय संपर्कयंत्रणा शाबूत ठेवणारा उपग्रह चीनने महिन्याभरापूर्वीच अवकाशात धाडला आहे. त्यांचा अवकाश कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला आहे. येत्या वर्षभरात चीन स्वतचे अवकाश स्थानक निर्माण करणार आहे. त्या अवकाश स्थानकाला केंद्रस्थानी ठेवून भविष्यातील पुढच्या योजना चीनने आखल्या आहेत. २०२२ सालापर्यंत चांद्रभूमीवर चिनी अंतराळवीर उतरवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. केवळ एवढय़ावरच ते थांबलेले नाहीत तर त्यांनी त्यांचे दोस्तराष्ट्र असलेल्या पाकिस्तानलाही मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच भारतीयांना घेऊन इस्रोचे अंतराळयान अवकाशात झेपावेल त्या वेळेस त्याच्याच आजूबाजूस पाकिस्तानी अंतराळवीरही चीनच्या मदतीने अवकाशात गेलेले असतील.

खरे तर अमेरिका आजही या अवकाश स्पर्धेमध्ये जगाच्या पुढेच आहे. सोविएत रशियाच्या विघटनानंतर तो देश मागे पडला आहे. मात्र या स्पर्धेत चीन अग्रणी असावे असे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम चीनने हाती घेतले आहेत. पलीकडच्या बाजूस अमेरिकेला आता त्यांचे जगभरात पसरलेले हात-पाय आवरते घेण्याची वेळ आली आहे. त्याचवेळेस चीनने ही जोरदार मुसंडी मारली आहे.

चीनच्या तुलनेत भारत खूप मागे असला तरी तो या स्पर्धेत असणार याची जाणीव चीनला आहे. या सर्व घडामोडींमधून भारतानेही शिकण्यासारखे बरेच आहे. नौदलाच्या युद्धनौकांची बांधणी असो, हवाई दलाच्या लढाऊ विमानांची निर्मिती किंवा मग चांद्रझेप; त्यात सरकारी व्यवस्थेचा अडथळा येणार नाही हे काटेकोरपणे पाहिले जाते आणि त्याची अंमलबजावणीही तेवढय़ाच काटेकोरपणे करण्यात येते. महासत्ता असेच होता येत नाही. चीनमधील दडपशाहीच्या नावे आपण बोटे मोडत असलो किंवा अगदी अमेरिकाही बोटे मोडत असली तरी चीनने मारलेली जोरदार मुसंडी, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्याच वेळेस एक धोकाही जगाने लक्षात घ्यायला हवा. चीनने मध्यंतरी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अंतराळात घेतली होती. बळी तो कान पिळी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. यातील बळीला कान पिळण्यासाठी बळ लागते. आधुनिक काळात हे बळ तंत्रज्ञानाच्या बळावर मिळवता येते. अमेरिकेच्याही छातीत धडकी भरण्याचे कारण हेच आहे. चंद्राच्या मागच्या बाजूस उतरण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हे जगात सध्या तरी चीनकडेच आहे, हे चीनने सिद्ध केले आहे. म्हणून तर जे अमेरिकेला शक्य झाले नाही ते आम्ही केले, अशी मल्लिनाथी चिनी संशोधकांनी केली. याचा अन्वयार्थ आपण लक्षात घेऊन पावले पुढे टाकायला हवीत. चांद्रबळ हे असे महत्त्वाचे आहे. कदाचित नव्या जगात नवी म्हण रूढ होईल, ‘चांद्रबळ हाती तो कान पिळी.’