विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com
वातावरणातील उष्मा अचानक वाढू लागतो.. उन्हाळा असल्याने उकाडा वाढणार हे तसे ठरलेलेच असते. पण आताशा वातावरणात झालेले बदल काही वेगळेच संकेत देत असतात. अचानक उष्म्यामुळे येणारा घाम वाढू लागतो. हवेमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याचे ते लक्षण असते. आभाळही भरून आलेले, बरेचसे काळवंडलेले.. कदाचित सृष्टीला नवरूप देणारा तो उंबरठय़ावरच येऊन ठेपलाय जणू..

याची पहिली चाहूल लागते ती वन्यजीव आणि त्यातही सर्वात आधी कीटकविश्वाला! एरवी निसर्गाकडेही पाहायला फारसा वेळ नसलेल्या माणसालाही हे बदल जाणवतातच. हाच काळ असतो सृष्टीतील सजीव विश्वामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर घडामोडी होण्याचा. सर्व जण त्याच्या आगमनासाठी सज्ज होण्याच्या बेतात असतात. संशोधक- वैज्ञानिकांसाठीही हीच घडी असते, ज्याची वाट ते आतुरतेने पाहात असतात कारण त्यांना कीटकविश्वाच्या नोंदी ठेवायच्या असतात. अगदी साधा वाळवीसारखा दिसणारा सूक्ष्म जीवही अधिक वेगात काम करताना दिसतो. मुंग्या तर त्याहीआधी कामाला लागलेल्या असतात.

How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
Loksatta samorchya bakavarun IT CBI ED Polling stations EVM election
समोरच्या बाकावरून: थोडे थांबा.. धीर धरा ‘अच्छे दिन’ येतच आहेत..

वाळवीच्या त्या वारुळामध्ये गेल्या वर्षभरात जन्माला आलेली एक मोठ्ठी जमात प्रतीक्षेत असते पावसाच्या. त्याचे पहिले थेंब पडले की त्यानंतर हे सारे पंख असलेले जीव एकाच वेळेस थव्याने बाहेर पडतात नव्या आसऱ्याच्या, वस्तीच्या शोधात. त्यांच्या नवीन वस्त्या ते तयार करतात. समागमानंतर नवीन वस्त्या मोठय़ा प्रमाणावर तयार होतात, थेट जमिनीखाली. मग ते वारूळ हळूहळू वाढू लागते आणि आकाशाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते.

वाळवीकडे आपण फारच नकारात्मक पद्धतीने पाहतो. कारण वाळवी लागली की, ती सारे काही खाऊन टाकते, असा एक समज माणसाच्या मनात दृढ झालेला असतो. प्रत्यक्षात माणसाने त्याचे आर्थिक फटके सहन केलेले असतात. पण ज्यात जीव नाही ते नष्ट करणे हेच तर तिचे काम आहे. पण माणसाच्या मनातील भीतीचा परिणाम असा की, त्यामुळे त्या भीतीचेच एक वारूळ त्याच्या मनातही तयार होते. मग एखाद्या वृक्षाच्या बाह्य़भागावर वाळवी दिसली की, तो म्हणतो बापरे म्हणजे आता हे झाडही वाळवी खाऊन टाकणार! पण वस्तुस्थिती अशी असते की, जीव असलेली कोणतीच गोष्ट वाळवी खात नाही. वृक्षावर वाळलेली साल तेवढीच फक्त ती गिळंकृत करते. जंगलासाठी, पर्यावरणासाठी वाळवी खूपच महत्त्वाची आहे. जंगलामधील पालापाचोळा वाळलेले सारे काही नष्ट- फस्त करण्याचे काम ती विनासायास करते. ती नसती तर अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या असत्या. परिणामी आपल्याला म्हणजे माणसालाच कदाचित नव्या विकारांना बळी पडावे लागले असते. पण हे सारे आपण लक्षातच घेत नाही. म्हणून तर निसर्गतज्ज्ञ म्हणतात की, एखाद्या जंगलातील वाळवीच पूर्णपणे नष्ट झाली तर त्यानंतर दोन वर्षांत संपूर्ण जंगलच नष्ट होण्याची भीती निर्माण होते. पण वाळवीविषयी एक अनाम भीती माणसाच्या मनात घर करून आहे. त्यामुळेच तर नुकसान सांगण्यासाठी ‘वाळवी लागली’ असा शब्दप्रयोगही माणसाने वापरण्यास सुरुवात केली.

शास्त्रीयदृष्टय़ा पाहायचे तर आजमितीस माणसापेक्षा अधिक पावसाळे या वाळवीने पाहिले आहेत. झुरळाच्या प्रजातीपैकी असलेली वाळवी ही त्या झुरळाइतकीच आजवरच्या भूतलावरील सर्व भौगोलिक- नैसर्गिक अशा घडामोडींना पुरून उरली आहे. तिने ज्वालामुखीही पाहिले आणि प्रलयदेखील. तिने उष्ण कालखंडही पाहिला आणि शीत कालखंडदेखील. अनेक प्राणी- सजीव या अशा पराकोटीच्या प्रसंगांमध्ये नष्ट झाले, ऱ्हास पावले मात्र उत्क्रांतीच्या सर्व टप्प्यांवर ती आपले अस्तित्व केवळ टिकवूनच नव्हे तर वाढवून आणि विस्तारूनही आहे. माणूस तर तिच्यानंतर जन्माला आला आहे. तिचे अस्तित्व हे नेहमीच वेगात वाढणारे असते, ते समजून घ्यायला हवे मात्र माणसाने अद्याप तिला पुरेसाही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

वाळवीची सृष्टी ही पूर्णपणे मातृसत्ताकच म्हणायला हवी. म्हणून तर राणीला महत्त्व असते. बाकी सर्व कष्टकरीच असतात. एका वारुळामध्ये तीन-चार नर आणि तेवढय़ाच संख्येने माद्या असतात. मात्र राणी एकच. वंशसातत्य राखणे हेच तिचे सर्वात महत्त्वाचे काम. त्यासाठी सर्व कष्टकरी वाळवी तिला मदत करीत असतात. तिला पुसून काढणे, तिने घातलेली अंडी व्यवस्थित जागी नेऊन ठेवणे हे सारे काम या कष्टकरी करीत असतात. राणी वाळवी तीन सेकंदाला एक या वेगात अंडी घालत असते. भारतीय संशोधनानुसार एक राणी वाळवी किमान सात ते आठ वर्षे जगते. तर विदेशातील संशोधनानुसार काही राणी वाळवी या १२ ते १५ वर्षे जगणाऱ्याही आहेत. यानुसार गणित केले तर प्रति दिन ३० हजार अंडी याप्रमाणे ३६५ दिवसांमध्ये एक राणी वाळवी एक कोटी नऊ लाख ९५ हजार अंडी घालते. किंबहुना तिच्या जमातीचा पसारा एवढा मोठा असतो म्हणूनच तर महाकाय पृथ्वीवरील सुकलेला मात्र जैविक कचरा हा वेगात नष्ट होतो. अन्यथा प्लास्टिकपेक्षाही भयानक अशी जैविक कचऱ्याची मोठी समस्या या भूतलावर निर्माण झाली असती.

त्यांच्या नवीन वस्त्या तयार होतात, त्या याच पावसाळ्यामध्ये. पहिला पाऊस ही त्यासाठीची नांदी असते. समागमानंतर राणी वाळवीचे पंख गळून पडतात आणि मग तिचा आकार वाढता वाढता वाढे असा वाढतच जातो. तो आकार एवढा वाढतो की, तिला हालचाल करणेही मुश्कील होते. मग तिची हालचाल करण्यासाठी मदत करण्याचे कामही कष्टकरी वाळवी करतात. तिचा हा आकार तिच्या मृत्यूपर्यंत तसाच असतो. तिची क्षमता संपली की, कष्टकरी वाळवी तिचे तुकडे करतात आणि ते अन्न म्हणून साठवून ठेवतात. तिची जागा मग दुसरी मादी घेते आणि ती राणी होते. तिथे असलेल्या नरांपैकी कुणाचा वापर करायचा याचा निर्णय राणी वाळवीच घेते. ज्याचा वापर करण्याचा निर्णय ती घेते त्या नराला मग अधिक खाऊ घालून पोसले जाते. त्याचेही एक चक्र सातत्याने सुरू असते. त्यामुळे इतर नवीन प्रजा पहिल्या पावसात उडून बाहेर गेली तरी हे वारुळातील तीन- नर आणि काही कष्टकरी वाळवी मात्र ते वारूळ सोडून जात नाहीत. ते राणीसोबत तिथेच राहतात. त्या वेळेस त्यांची संख्या तुलनेने कमी होते. असा कालखंड साधारणपणे सात ते आठ वर्षांनी प्रत्येक वारुळामध्ये येतो. यावरूनच राणी वाळवीचे आयुष्यमान सात ते आठ वर्षांचे असावे, असा संशोधकांचा कयास आहे.

पण आता माणसाकडून सुरू असलेल्या अनेक कृतींमुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आहे, त्याचा फटका या वाळवीलाही बसला आहे. अनेक ठिकाणी जंगलांमध्ये वाळवीची वारुळे दिसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निसर्गतज्ज्ञांच्या दृष्टीने ही इशाऱ्याची घंटा आहे. ती वेळीच ऐकायला हवी. कारण यापूर्वी काही ठिकाणी जगभरात असे लक्षात आले आहे की, जंगलातील वाळवी नष्ट झाली की, त्या पाठोपाठ जंगल नष्ट होण्यासाठी फार वेळ लागत नाही. शिवाय रोगराईमध्ये त्या परिसरात वेगात वाढ होते आणि रोगराईमुळे पैसे खर्च होऊन अर्थव्यवस्थेला फटका बसतो तो वेगळाच. त्यामुळे वेळीच या वाळवीचा इशारा समजून घेतला पाहिजे.

सध्या पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार देशभरात वीज सर्वत्र पोहोचवण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण देश त्यामुळे उजळून निघेलही पण ते करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अलीकडच्या निरीक्षणांमध्ये असे लक्षात आले की जंगलामधून विजेच्या तारा नेताना त्या खाली येणारा जंगलाचा भाग सुरक्षिततेसाठी मोकळा ठेवला जातो. याचाही फटका वाळवीसारख्या सूक्ष्म जीवांना बसला आहे. शिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालखंडात ज्या वेळेस लाखोंच्या संख्येने पंख असलेली वाळवी वारुळाबाहेर पडते त्या वेळेस ती विजेच्या तारांच्या दिशेने खेचली जाते. त्यामध्ये नष्ट होणाऱ्या वाळवीचे प्रमाणही मोठे आहे. मग भूमिगत वीजतारांचा वापर करण्याचा विचार आपण केव्हा करणार?

याशिवाय आणखीही एक महत्त्वाची बाब शहरानजीक असलेल्या जंगलांमध्ये लक्षात आली आहे. शहरापासून दूर असलेले जंगल हे पर्यावरणीयदृष्टय़ा अधिक स्वच्छ आणि चांगले असणार, असा एक समज आपल्या मनामध्ये रूढ झालेला आहे. मात्र अलीकडे या संदर्भात भारतामध्ये झालेले संशोधन हे अतिशय धक्कादायक आहे. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये विदेशी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी जंगलाच्या कोअर भागामध्ये एक प्रयोग केला. वनस्पतींच्या पानांवर पडलेले दविबदू गोळा करून त्यातील घटकांचे विश्लेषण प्रयोगशाळेत करण्यात आले. त्या वेळेस असे लक्षात आले की, शहरातील प्रदूषणाचे वारे जंगलाच्या कोअर भागापर्यंत पोहोचले आहे. त्या दवबिंदूंमधील विषारी घटकांमध्ये घराघरांत लावल्या जाणाऱ्या मच्छर भगाव द्रावणातील काही विषारी घटक अलगद विसावलेले होते.. यंदाच्या पावसाळ्यात वाळवीसारख्या कपदार्थ वाटणाऱ्या या सूक्ष्म जीवाला समजून घेताना आपण माणूस म्हणून नेमके काय करतो आहोत, त्याचे परिणाम नेमके काय आहेत याचा केवळ विचार केला तरी पावसाळा फळाला येईल आणि ऋतुचक्र अव्याहत सुरू राहील!