26 November 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०२० : ‘पण’ती!

काळ तर मोठा कठीण आला.. गेले आठ महिने सर्वाच्या मनात याच भावना दाटून आल्या आहेत.

..तोवर साथ आहे या ‘पण’ लावून जळत प्रकाशवाटेवर नेणाऱ्या पण‘ती’चीच! दीपोत्सवाच्या अनंत शुभेच्छा!

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
लोकप्रभा दिवाळी २०२०

काळ तर मोठा कठीण आला..

गेले आठ महिने सर्वाच्या मनात याच भावना दाटून आल्या आहेत.

दाटून एवढय़ाचसाठी कारण सर्वत्र कोविडकहर सुरू आहे. मृत्यूच्या भयाची टांगती तलवार

सर्वाच्याच डोक्यावर आहे.. अनिश्चिततेचे मळभ दाटून आले आहे, खग्रास सूर्यग्रहणाच्या

काळात ऐन दुपारी रात्र व्हावी तशीच ही अवस्था..

आता वैज्ञानिक प्रगतीमुळे ग्रहणकाळ नक्की केव्हा संपणार हेही आपल्याला ठाऊक

असते. ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे हेही कळून चुकले आहे.

पण कोविडच्या बाबतीत मात्र या वैज्ञानिक प्रगतीनंतरही त्याचा अंत; त्या विषाणूचे थैमान नेमके

केव्हा संपणार हे कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही, अशी अवस्था आहे. लस आलीच तर ती

सर्वांपर्यंत केव्हा पोहोचणार हेही माहीत नाही.

या संपूर्ण काळात मिट्ट काळोख असलेल्या आणि अंत न सापडलेल्या अंधाऱ्या बोगद्यात

अडकल्यासारखी सर्वाचीच अवस्था झाली आहे.

या अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर जग बदललेले असेल याची खात्री तर एव्हाना

अनेकांना पटली आहे.

रोजगार असणार-नसणार इथपासून महागाईपर्यंत सगळे प्रश्न आ वासून समोर असतील..

अशा या काळात या साऱ्याशी लढा देण्याची प्रखर इच्छाशक्ती कुठून आणणार?

येणारा दीपोत्सव हा आपल्याला अंधाराशी लढण्याची ऊर्जा आणि प्रेरणा दोन्ही देईल!

दीपोत्सव म्हटला की, फटाक्यांच्या आतषबाजीआधीही नजरेसमोर येते ती पणती!

यंदा त्या पणतीकडून प्रेरणा घेऊ!

अंधार कितीही मिट्ट असला तरी तिच्या जिवात जीव असेपर्यंत ती पूर्णाशाने प्रकाश देण्याचे

नित्यकार्य करत राहाते! ‘काळोख तर खूपच आहे, मी एवढी लहान पणती कशी काय

पुरी पडणार या काळोखाला?’ अशी कोणतीही तक्रार नसते तिची!

विनातक्रार प्रकाश पाझरत असतो!

कविवर्य ग्रेस एकदा दिवाळीच्या सुमारास गप्पांमध्ये म्हणाले होते, घासूनपुसून लख्ख केली जाते ती समई; आणि पण लावून जळते.. ती पणती!

तर यंदाच्या दीपोत्सवात तुमच्या-माझ्या ‘पण’ लावून जळणाऱ्या अगणित पणत्याच, आपल्या सर्वाना कोविडकहरातही प्रकाशवाटेवर नेतील!

पलीकडच्या बाजूस नववर्षांचा सूर्य आपली वाट पाहतो आहे.

..तोवर साथ आहे या ‘पण’ लावून जळत प्रकाशवाटेवर नेणाऱ्या पण‘ती’चीच!

तिच्याचकडून प्रेरणा, ऊर्जा व प्रखर इच्छाशक्तीचा प्रकाश घेऊ या!

दीपोत्सवाच्या अनंत शुभेच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 7:21 am

Web Title: coronvirus pandemic lockdown diwali celebration panti mathitartha lokprabha diwali issue 2020 dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 क्वाड ते ऑक्टा
2 तुकडेचित्र!
3 अनर्गळ!
Just Now!
X