ruchkar-logoआयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट घडली की, प्रत्येकाच्या तोंडी शब्द असतात, ‘पार्टी तो बनती है, यार!’ याचाच अर्थ आपल्या सर्व चांगल्या भावनांचा एक धागा हा अन्नापर्यंत येऊन पोहोचतो. सण, समारंभ त्यातील साजरे करण्याचा भाग हा अशा प्रकारे थेट अन्नाशीच जोडलेला आहे. आमंत्रण घेऊन येणारी व्यक्ती खूपच जवळची असेल तर ‘मेन्यू काय आहे’, हा प्रश्नही तेवढाच सहज असतो. एकुणात काय तर अन्न हा केवळ शरीरासाठी आवश्यक नित्यकर्माचा भाग नाही तर तो पोटातून थेट हृदयापर्यंत जोडले जाण्याचा मार्ग आहे!

अनेकदा जिभेचे चोचले एवढे वाढतात की, त्यात मूळ उद्देश असलेला पोषणमूल्यांचा भाग अत्यल्प होतो आहे, याचेही भान आपल्याला राहत नाही. शहरात राहणाऱ्यांना तर धकाधकीच्या जीवनात या मुद्दय़ाकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. ग्रामीण भाग शहराचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. असे होत असताना जीवनशैली बदलत जाते. त्याचे चांगले-वाईट परिणामही सोबत येतातच. काळ तर बदलणारच; पण मग चांगल्या गोष्टी टिकवून त्यात काळानुरूप बदल कसे करणार किंवा हे बदल अन्नाच्या संदर्भात कसे होतात, ते या खेपेसच्या दिवाळीपूर्व- ‘रुचकर विशेषांक – लोकप्रभा’मध्ये अनुभवता येईल.

सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य प. य. खडीवाले यांनी ‘पदार्थाच्या नव्या-जुन्या पद्धती’ अशा प्रकारे लेखाची रचना केली आहे. शिवाय खास दिवाळीसाठी त्यांनी सिद्ध केलेल्या रेसिपीजही दिल्या आहेत. वाचक त्याचा आस्वाद घेतीलच. त्यांच्या जोडीलाच ‘लोकप्रभा’च्या नियमित लेखिका वैदेही भावे यांनीही आधुनिक जोड देऊन सादर केलेल्या रेसिपींचा आस्वाद घेता येईल.

स्वयंपाकघरात आता आधुनिक उपकरणांचा शिरकाव झाला आहे. तरुण पिढी मायक्रोवेव्हचा वापर अधिक करते. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘मायक्रोवेव्ह रेसिपीज’ही ‘लोकप्रभा’ने सादर केल्या आहेत. पंचतारांकित शेफनी केलेल्या रेसिपीजचेही सर्वाना आकर्षण असते. पण त्या आपल्याला घरी करता येतील का, असा प्रश्न मनात असतो. यंदाच्या दिवाळीसाठी खास घरी करता येतील, अशा विवेक ताम्हणे आणि नीलेश लिमये या पंचातारांकित शेफच्या रेसिपीजही आपल्याला सादर केल्या आहेत.

‘पेरीले तैसे उगवते’ हा या जगाचा न्याय आहे. त्यामुळे चांगले व पोषणमूल्य असलेले तेच खा, असा संदेश हल्ली वारंवार द्यावा लागतो. युरोप-अमेरिकेत काही वर्षांपूर्वी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळे आणि भाज्यांच्या संदर्भातील एक लाट आली. त्याचाही सर्व बाजूंनी विचार करणारा एक लेख या अंकात आहे. अलीकडेच पोटातील एका उपकारक जीवाणूचाही शोध वैज्ञानिकांना लागला, त्या संदर्भातील महत्त्वाच्या लेखाचाही या विशेषांकात समावेश आहे. अशी ही रुचकर थाळी पूर्णान्नाने भरलेली असेल तर..

पार्टी तो बनती है!
01vinayak-signature
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
twitter @vinayakparab