‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोडय़ाशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठय़ा आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय.’’ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये मद्रास इलाखा शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनच्या जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते. शेकडो वर्षे शोषण म्हणजेच जीवन ठरलेल्या समाजासाठी हे विचार दिशादर्शक होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या उंबरठय़ावर देश उभा होता, अनेकांना खुणावणारे स्वातंत्र्य आणि बाबासाहेबांना दिसणारे स्वातंत्र्य यात महद्ंतर होते. त्यांना समताधिष्ठित समाजरचनेसाठी शोषितांनाही तयार करायचे होते. त्यांच्यामध्ये प्राण फुंकायचे होते आणि ते करण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे बाबासाहेब. त्यांनी ते तसे केलेही, म्हणून तर आज एकविसाव्या शतकात समताधिष्ठित राज्यघटनेची फळे तुम्हा-आम्हांला चाखायला मिळताहेत. धर्माचे अधिष्ठान बाजूला ठेवून समताधिष्ठित लोकशाहीचा केलेला जाणीवपूर्वक स्वीकार आणि त्याला दिलेले राज्यघटनेचे अधिष्ठान यामुळेच आज देशाची मान जगात उंचावलेली दिसते.  बाबासाहेबांनी दलितोद्धाराचे केलेले महत्कार्य आणि त्यांचे राजकारण याबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसते. मात्र त्यांनी धम्माच्या संदर्भात केलेल्या कार्याचा विचार फारशा बारकाईने होताना दिसत नाही. ज्या समाजाच्या संदर्भात बाबासाहेबांनी हे महत्कार्य करून ठेवले त्या समाजातील नेत्यांनाही आताच्या जमान्यात त्याचे फारसे मोल राहिलेले दिसत नाही.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Dr. Babasaheb Ambedkar, London School of Economics
रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता. तत्त्वज्ञानाचा पाया पक्का असेल तर आपल्याला प्रगतीची मोठी उडी घेता येते, हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. त्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे घेतली, सर्व धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग जाणीवपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो करण्यापूर्वी त्यांनी महाबोधी जर्नलमध्ये १९५० साली मे महिन्याच्या वैशाख अंकात लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा विश्लेषणात्मक लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यातून बाबासाहेबांचा दृष्टिकोन पुरता स्पष्ट होतो. या लेखातून बाबासाहेब आणि त्यांची भूमिका एकूण पाच टप्प्यांत अभ्यासकांना समजून घेता येते. सर्व धर्मसंस्थापकांसोबत बुद्धाची केलेली तुलना, हिंदू व बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या पुनरुज्जीवनावर बाबासाहेबांचा असलेला गाढ विश्वास, इतर धर्माशी केलेली बौद्ध धर्माची तुलना आणि बौद्ध धर्माच्या प्रगतीचे संभाव्य तीन टप्पे असे हे पाच विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. यातूनच नंतर बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक आकारास आले. यामध्ये बाबासाहेब सर्व धर्मसंस्थापकांबरोबर बुद्धाची तुलना करतात आणि त्याने सांगितलेले तत्त्व हे समानता आणि नैतिकतेवर आधारलेले असल्याने का स्वीकारार्ह आहे, ते सांगतात. त्यावर अधिक विचार करून बाबासाहेबांनी दिलेला हा पाया समजून घेऊन आपण पुढे जाणे आवश्यक होते. पण देवत्व नाकारणाऱ्या गौतम बुद्धांना ज्याप्रमाणे आपण देवत्व बहाल केले त्याचप्रमाणे बाबासाहेबांनाही आपण बोधिसत्त्व करून जबाबदारीतून आपण स्वत:ची मुक्तता करून घेतली. एकदा का देवत्व बहाल केले की मग आपण विचार करण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतो.

दु:खमुक्तीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने नंतरच्या टप्प्यात सामान्य माणसाला दोन महत्त्वाच्या गोष्टी बहाल केल्या, त्या म्हणजे सत्याचे दोन प्रकार, पारमार्थिक व प्रापंचिक. प्रत्यक्ष प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो हे सामान्य माणसाला पटवून दिले. याची सुरुवात प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुनापासून होते. या तत्त्वज्ञानाला नंतर ज्ञानशास्त्राचे अधिष्ठान देण्याचे काम दिङ्नाग आणि धर्मकीर्ती यांनी केले. बाबासाहेबांचे कार्यही काहीसे याच मार्गाने समांतर जाणारे आहे. एका बाजूला ते सामान्य शोषित माणसाला कळेल असा संदेश नव्हे, तर प्रगतीचा मंत्र देतात- ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा मंत्र देताना बाबासाहेब एकदम प्रॅक्टिकल असतात, तर या साऱ्याला नैतिकतेचे अधिष्ठान असू द्या हा संदेश ते धम्माच्या विश्लेषणातून देतात. एकाच वेळेस ते प्रॅक्टिकल उपाय सांगतात त्या वेळेस ते प्रपंचच सांगत असतात आणि धम्म आचरणाच्या मार्गातून ते परमार्थही सांगतात. पण नेमके हेच समजून घेण्यात आपण सारे कमी पडलोय, असे आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटते. बाबासाहेबांचे काम हे तत्त्वज्ञासारखेच आहे. ज्ञानदेवांनी ज्याप्रमाणे गीतेचे सार सामान्य माणसासाठी मराठीत आणले त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी सामान्य माणसाला कळेल अशा शब्दांत एकाच वेळेस प्रपंच आणि परमार्थही सांगितला. त्यांचे स्वत:चे आयुष्य हेदेखील त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा लोकांसमोर ठेवलेला नेमका आदर्शच होते. त्यांनीही सारे काही झगडून आणि संघर्षांच्याच मार्गाने मिळवले. शिक्षणाचे हत्यार वापरले. जे लोकांना सांगितले ते त्यांनी आधी करूनही दाखवले. म्हणूनच तर बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवरील धर्मातराच्या वेळेस लाखोंच्या संख्येने अनुयायी लोटले होते. कारण केवळ प्रगतीचे तत्त्वज्ञान सांगणारा नव्हे तर ते आचरणात आणणारा एक उंच आदर्श समाजासमोर उभा होता.

बाबासाहेबांच्या बाबतीत शिक्षण म्हणजे काही एकच विषय नाही. त्यांनी अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राजकारण, इतिहास अशा अनेकानेक विषयांत प्रावीण्य संपादन केले होते. आताच्या भाषेत बोलायचे तर बाबासाहेबांची शैक्षणिक कारकीर्द ही आंतरशाखीय पद्धतीची होती. किंबहुना म्हणूनच ते वेगवेगळ्या विषयांचा विचार आणि विश्लेषण इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करू शकले. जे शिक्षणाच्याच बाबतीत तेच संघर्षांच्याही बाबतीत. संघर्षही कुणाशी केला तर स्वातंत्र्यलढय़ात संपूर्ण देशासाठी पूजनीय ठरलेल्या गांधीजींशी. तोही एकदा नव्हे तर अनेकदा. संपूर्ण देशभरात सवर्णाच्या रोषाला सामोरे जावे लागले तेही अनेकदा. त्या काळी गांधीजींच्या विरोधात बोलणे सोपे तर नक्कीच नव्हते. अखेरीस ऐतिहासिक पुणे करारावरच्या स्वाक्षरीने बाबासाहेबांना दलितांचे नेतृत्व अधिकृतरीत्या मिळाले. मग महायुद्धाच्या वेळेसही मतभेद झाले. गांधीजी सांगत होते की, कोणत्याही एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्यांना गुलामीत ठेवण्याचा अधिकार नाही. त्या वेळेस बाबासाहेब सांगत होते, त्याचप्रमाणे कोणत्याही एका जातीला दुसऱ्या जातीला हीन लेखण्याचा आणि त्यांच्यावर आपली मते लादण्याचा अधिकार दुसऱ्या जातीला नाही. बाबासाहेबांनी जे सांगितले ते स्वत:च्या आयुष्यात करूनही दाखवले.

जे बुद्धतत्त्व त्यांनी आदर्श म्हणून स्वीकारले त्याची प्राणपणाने जपणूकही केली.  आपल्यासाठी वेगळा आणि इतरांसाठी वेगळा नियम त्यांनी होऊ  दिला नाही. म्हणूनच राज्यघटनेच्या ३६८ व्या अनुच्छेदाद्वारे त्यांनी त्यात काळानुरूप बदल करण्याची तरतूदही करू दिली. त्याच वेळेस धर्मनिरपेक्षता व समाजवादी असा शब्दप्रयोग राज्यघटनेत करण्याविषयीही चर्चा झाली. त्याही वेळेस बाबासाहेब म्हणाले होते की, प्रजासत्ताकाला विशेषणे लावणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्यासारखेच आहे. भविष्यात एकाच मतप्रणालीचे लोक सत्तेवर येतील असे नाही. तेव्हा त्यांचा अधिकार मर्यादित करणारी विशेषणे कशासाठी वापरायची.  बाबासाहेबांनी व्यक्त केलेल्या या मतातून ते किती उदारमतवादी होते हेच दिसते. हे उदारमतवादी धोरण आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञानातून आलेले दिसते. स्वत: गौतम बुद्ध सांगतात की, माझे तत्त्वज्ञान मी सांगितले म्हणून स्वीकारू नका, पटले तरच स्वीकारा. पटले तरच स्वीकारा असे सांगताना ते नाकारण्याचा आपला माणूस म्हणून असलेला हक्क गौतम बुद्ध अबाधित ठेवतात. विरोधकांनाच संपवा, हिच इच्छा प्रबळ असलेल्या सध्याच्या काळात हा उदारमतवाद किंवा ही सहिष्णुता खूपच महत्त्वाची ठरावी. बाबासाहेबांकडे आलेल्या त्या उदारमतवादाचे मूळ या बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. बाबासाहेब शोषणासाठी कारणीभूत राहिलेल्या हिंदू धर्मावर कडक ताशेरे ओढतात, पण हिंदूंना संपवून टाका, असे ते कधीही म्हणत नाहीत.  पण दुर्दैवाने आपण बाबासाहेबांचा हा उदारमतवादही समजून घेण्यात कमी पडलो! बाबासाहेबांच्या आता साजऱ्या होत असलेल्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने तरी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करू यात, तेही नसे थोडके!
vinayak-signature
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com