29 January 2020

News Flash

चांगुलपणाची शेती!

चांगुलपणा म्हणजे काय? तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे! पण आता तोच दुर्मीळ होत चालला आहे.

जगभरातील सर्व धर्म हे चांगल्याच गोष्टींची शिकवण देतात. मात्र तरीही जगात दुर्मीळ ठरला आहे तो चांगुलपणाच! सकाळीच सकाळी वर्तमानपत्र उघडलं की, जगाला जणू काही आगच लागली आहे, असं वाटतं ही जनसामान्यांची प्रतिक्रियाही तशी नेहमीचीच झाली आहे. याही अवस्थेत माणूसपणाची आणि चांगुलपणाची काही प्रकाशमान बेटं याच समाजात प्रत्ययाला येतात. निवडणुकांच्या या धामधुमीमध्ये अगदी केसानं गळा कापणारेही दिसतील, सापडतील.. अशा घटना तर अनेकदा घडतात की, माणुसकीवरच्या विश्वासालाच तडा जावा. पण म्हणूनच ‘लोकप्रभा’ने ४६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चांगुलपणा दृढ करण्याचा निर्णय घेतला. आमचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या वाचकांनाच त्यासाठी आवाहन केले आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला. अपघात आणि प्रवासादरम्यान आलेले अनुभव यांची संख्या यात सर्वाधिक होती. या अनुभवांचा विशेष असा की, यामध्ये चांगुलपणा दाखविणारी व्यक्ती अपरिचित असते. चांगुलपणामध्ये कमी-अधिक असे मोल करताच येत नाही. तरीही परिचितांनी दाखविलेल्या चांगुलपणामागे इतरही काही गोष्टी असू शकतात. मात्र सर्वस्वी अपरिचित व्यक्ती आपल्याला काहीच संबंध नसतानाही चांगुलपणा दाखवते तेव्हा तो बिनचेहऱ्याचा चांगुलपणा केवळ निव्र्याज आणि निरपेक्ष असा असतो. तो अनमोल ठरतो!

या अनुभवांमध्ये जातीय दंगलींच्या वेळचे दोन महत्त्वाचे अनुभव आहेत, अंगावर काटा आणणारे; अखेरीस चांगुलपणाचाच धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे अधोरेखित करणारे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शालेय क्रमिक पुस्तकामध्ये दिलेल्या देशाच्या प्रतिज्ञेतील ओळी ‘‘सारे देशवासीय माझे बांधव आहेत’’ मुस्लीम बांधव प्रत्यक्षात जगले, त्यांना सलाम!

आधुनिक युगातही दिलेला शब्द पाळणारी आणि ३४ वर्षांनंतरही दागिने परत नेऊन देणारी आजी आपला या चांगुलपणावरचा विश्वास दृढ करते; एवढेच नाही तर आपल्याला चांगुलपणाचे बळही देऊन जाते. सायकलवरून विश्वप्रदक्षिणा करणाऱ्या वेदांगी कुलकर्णीला तिचा निर्धार पाहून मदत करणारा दरोडेखोरही याच समाजाची दुसरी बाजू दाखवून जातो.

चांगुलपणा म्हणजे काय? तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे! पण आता तोच दुर्मीळ होत चालला आहे. म्हणून तर माणूस माणसासारखे वागला तरी त्याचे कौतुक करण्याची वेळ आपल्या पिढीवर आली आहे. गरज आहे हा चांगुलपणा वाढण्याची, विस्तारण्याची!

तर चला चांगुलपणाची शेती करू या!

गुढीपाडवा आणि ‘लोकप्रभा वर्धापन दिना’च्या अनेकानेक शुभेच्छा!

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on March 29, 2019 1:01 am

Web Title: editorial on the occasion of the 46th anniversary of lokprabha
Next Stories
1 सत्त्वनिष्ठ मनोहर पर्रिकर
2 नापाक चीन
3 धुळवड
Just Now!
X