विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

फेसबुकचा सर्वेसर्वा असलेला मार्क झकरबर्ग हा स्वत:च कदाचित २०२० सालानंतर जगाची मध्यवर्ती बँक असेल, या शक्यतेवर सध्या जगभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. केवळ इंटरनेटवर व्यवहार करता येण्याजोगे बिटकॉइनसारखेच लिब्रा हे इलेक्ट्रॉनिक चलन फेसबुक आणणार आहे. गेल्याच आठवडय़ात याची अधिकृतरीत्या घोषणा झाली. त्यामुळेच जगभरात त्याची चर्चा अधिक गांभीर्याने सुरू झाली आहे. फेसबुक हे केवळ लोकप्रियच नव्हे तर २ अब्ज ४० कोटी एवढी सर्वाधिक सदस्यसंख्या असलेले एकमेव नेटवर्क असल्यानेच अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी याचा धसका घेतला आहे. कारण या सदस्य संख्येतील केवळ काही कोटी सदस्यांनी दैनंदिन व्यवहारांसाठी याचा वापर करण्याचा निर्णय घेतला किंवा तशी सुरुवात केली तरी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना नानाविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

वरवर पाहाता लोकांच्या दृष्टीने हे खूप सोयीचे असले म्हणजे हवे तेव्हा त्याचे रूपांतर नेहमीच्या चलनात करण्याची सोय असली आणि त्यामुळे उपयुक्ततेच्या पातळीवर ते सोपे ठरणारे असले तरी देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या दृष्टीने मात्र ही मोठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. हा विषय समजून घ्यावा लागेल असाच आहे. फेसबुकने असे म्हटले आहे की, कंपनीतर्फे हा विषय थेट हाताळला जाणार नाही, त्यासाठी कॅलिब्रा नावाची सहयोगी कंपनी स्थापन केली जाणार आहे, तर लिब्रा असोसिएशनतर्फे त्याचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. यामध्ये अनेक सदस्य असतील. १ कोटी रुपये गुंतवून कुणीही याचा सदस्य होऊ शकतो. या ई-चलनाची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेसबुकने व्हिसा, मास्टरकार्ड यांसारख्या बडय़ा कंपन्यांशी करारही केला असून त्याचबरोबर उबर किंवा वोडाफोनसारख्या प्रसिद्ध सेवाकंपन्यांसोबतही करार केला आहे. याचे स्थिरमूल्य असल्याने त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, शिवाय त्याचे ऑडिटही सातत्याने केले जाणार आहे, असा दावाही फेसबुकने केला आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे चलनाच्या किमतीएवढी ठोक मालमत्ता असावी लागते. बहुतांश ठिकाणी त्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. तेवढे सोने जमा असते. इथे सोने नसले तरी अशाच प्रकारची ठोक जमा असेल, असे फेसबुकने म्हटले आहे. या व्यवहारांसाठी फेसबुकने मूव्ह नावाची नवी संगणकीय भाषाही विकसित केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे चलन बँक खात्याशिवाय वापरता येईल.  इथेच खरा चिंतेचा विषय आहे. लिब्राच्या वापराआधी केवायसी तपासणी केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र ती कशी त्याबाबत काहीच म्हटलेले नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे उत्तम असले तरी अशा प्रकारचे अर्थव्यवहार हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकतात. भारतासारखा देश हा अपवाद नाही. किंबहुना सर्वाधिक फेसबुक वापरकर्ते आपल्याकडेच आहेत. याचा वापर करचुकवेगिरी आणि गैरव्यवहारांसाठी होऊ शकतो, ही मोठीच डोकेदुखी असेल. याशिवाय  महत्त्वाची बाब म्हणजे वापरकर्त्यांच्या खासगीपणाची ऐशी की तैशी करणाऱ्या फेसबुकवर विश्वास कसा ठेवायचा? यापूर्वीचा त्यांचा अनुभव विश्वासाला तडा जाणारा आहे. त्याच वेळेस लिब्राचा वापर करून आणखी मोठा अवाढव्य माहितीचा साठा निर्माण करून तो अविश्वासार्ह असलेल्या फेसबुकहाती देणे म्हणजे कसायाहाती आपले प्राण देण्यासारखे असेल. त्यामुळेच भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने बिटकॉइन्स आणि लिब्रासारख्या ई-चलनांना दोन हात दूर ठेवणेच सावधपणाचे लक्षण असेल!