27 January 2020

News Flash

मांजराच्या गळ्यात घंटा

ज्ञानाच्या ऐवजी माहितीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मार्क झकरबर्ग

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
गुटेनबर्गने १४३९ साली छपाई यंत्राचा शोध लावला तो जगातील महत्त्वाच्या शोधांपैकी एक गणला जातो. कारण छापील शब्दाचे किंवा ज्ञानाचे लोकशाहीकरण करणारी अशी ती क्रांती होती. ज्ञान एकाच वेळेस अनेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशस्त झाला. युरोपच्या संदर्भात बोलायचे तर त्या वेळेस ज्ञानयुगाला किंवा ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाला सुरुवात झाली असे इतिहासात मानले जाते. आता त्या घटनेला जवळपास साडेपाचशे वर्षे उलटत आली आहेत आणि त्याच्या नेमकी उलट प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्ञानाच्या ऐवजी माहितीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि माहितीच्या, म्हणजे खरे सांगायचे तर खोटय़ा माहितीच्या, आधारे गुन्ह्य़ांना खतपाणी घातले जाते आहे, माणसे मारली जाण्यासाठी ते कारण ठरते आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्वाच्याच खासगी आयुष्यात खूप मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी होऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. गुटेनबर्गने केले ते लोकशाहीकरण होते आणि आता मार्क झकरबर्ग करतो आहे ते माहितीचे गुन्हेगारीकरण आहे, एका वेगळ्या अर्थाने निलरेकशाहीकरणच आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालेटिका या काही महिन्यांपूर्वी जगभरात गाजलेल्या माहिती चोरी आणि घुसखोरी प्रकरणात तर हे पुरतेच उघडकीस आले. अमेरिकेसारख्या बलाढय़ देशाला त्याचा फटका बसला. बाकी अमेरिका कशीही असली तरी तिथल्या कायद्यात बलाढय़ांनाही क्षमा नाही, त्यामुळेच झकरबर्गला थेट अमेरिकेच्या सिनेटसमोर साक्षीला यावे लागले आणि फेसबुकच्या ‘पोलखोल’चा कार्यक्रम जगभर पाहिला गेला. अर्थात फेसबुकचे प्रस्थ आता एवढे वाढले आहे की, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत किंवा वापरकर्त्यांच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही. कारण सध्या तरी फेसबुकला पर्याय नाही, त्यांचीच जगभरात मक्तेदारी आहे. आणि भविष्यातही ती मक्तेदारी कायमच राहील, अशी पूर्ण शक्यता आहे. कारण येत्या एप्रिल महिन्यापासून गुगलने फेसबुकसारखीच देऊ केलेली गुगल प्लस ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ती सेवा ही फेसबुकची प्रमुख स्पर्धक होती. मात्र त्यांच्याकडील संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्याची देखभाल करण्यासंदर्भातील गुगलचे अर्थशास्त्र पुरते कोलमडले आहे. त्यामुळे ही सेवा बंद झाल्यानंतर त्या क्षेत्रातील फेसबुकची मक्तेदारी अधिक बळकटच होईल.

या सर्व गोष्टींची आताच चर्चा करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी फेसबुकच्या जन्माला १५ वर्षे पूर्ण झाली. गेल्या १५ वर्षांत फेसबुकने माहितीक्रांतीच्या माध्यमातून आजवरच्या इतिहासातील जगातील सर्वाधिक  मोठा डेटाबेस तर तयार केलाच पण या भूतलावरील अनेकांचे जीवन व्यापले आहे. फेसबुकशिवाय आयुष्य ही कल्पनाही अनेकांना करवत नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षांत तर फेसबुकची ही वेगवान वाटचाल पाहून ‘द इकनॉमिस्ट’सारख्या जगभरातील विचारवंतांच्या महत्त्वपूर्ण साप्ताहिकाने समाजमाध्यमे ही लोकशाहीसाठी किती व कशी घातक आहेत, यावर थेट कव्हरस्टोरी करून समाजातील विचारवंतांचे आणि सामान्यजनांचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर काही महिन्यांमध्येच हे केम्ब्रिज अ‍ॅनालेटिका प्रकरण उजेडात आले आणि त्यातून फेसबुकवरील वापरकर्त्यांच्या माहितीचा कशा प्रकारे गैरवापर केला जातो याची प्रचीती जगाला आली.. कारण हादरा जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसलेला होता.

मोफत भरघोस डेटापॅक देणाऱ्या कंपन्या आणि त्यावर पोसल्या गेलेल्या फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या आपल्या खासगी माहितीवर कशा टपलेल्या आहेत, आपल्या खासगी आयुष्यात कशी घुसखोरी करीत आहेत याचे वास्तव वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न ‘लोकप्रभा’ने सातत्याने केले आहेत, कधी कव्हरस्टोरीच्या माध्यमातून तर कधी ‘मथितार्थ’मधून. गेल्या चार वर्षांत तर आम्ही वारंवार इशारा देण्याचे काम केले आहे. ‘सावध ऐका पुढल्या हाका’, ‘नो फेसबुक-फ्री लंच’, ‘दिसतं तसं नसतं’ या व अशा अनेक ‘मथितार्थ’मधून आम्ही वेळोवळी इशारेही दिले. हे इशारे खरे होते याचा प्रत्यय अमेरिकी प्रतिनिधीगृहासमोर मार्क झकरबर्गच्या साक्षीतून जगाने घेतलाच. फेसबुक आपले व्यवहार आणि वर्तन किती नियंत्रित करते किंवा ‘लाइक्स’ आणि ‘शेअर’च्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्यात शिरकाव करून आपल्या वर्तनात त्यांना हवा तो बदल कसा घडवून आणते आणि त्यावर त्या कंपनीचे अर्थशास्त्र कसे चालते हे सारे त्या साक्षीदरम्यान उघडकीस आले. त्या साक्षीदरम्यान त्याने खासगी आयुष्यातील शिरकावाबद्दल माफीदेखील मागितली.

मात्र माफी मागण्याची ती झकरबर्गची काही आयुष्यातील पहिलीच वेळ नव्हती. हार्वर्डमध्ये असताना त्याने फेसमॅश नावाचे एक अ‍ॅप्लिकेशन तयार केले होते. विद्यार्थ्यांनीच एकमेकांना त्यांच्या आकर्षकतेवरून रेटिंग द्यावे, अशी संकल्पना त्यामध्ये होती. त्यानंतरच्या दोन आठवडय़ांमध्येच हार्वर्डमध्ये हलकल्लोळ उडाला आणि त्या वेळेस १९ वर्षीय असलेल्या झकरबर्गला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले. अनेकांच्या खासगी आयुष्यात नकळत घुसखोरी करणे, कॉपीराइट््स धाब्यावर बसविणे असे अनेक आरोप हार्वर्डच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर ठेवले होते. अखेरीस या प्रकरणात सपशेल माफी मागून त्याने स्वतची सुटका करून घेतली. महत्त्वाचे म्हणजे ही सुटका करताना त्याने असे सांगितले की, असे काही करण्याचा हेतू नव्हता; पण झाले खरे. अशीच भूमिका त्याने अगदी १४ वर्षांनंतरही माफी मागताना अमेरिकन प्रतिनिधीगृहासमोर घेतली की, घुसखोरी करणे किंवा ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर करणे हा काही हेतू नव्हता; पण घडले खरे. अखेरीस तिथेही माफी मागून त्याने आपली मान त्यातून मोकळी करून घेतली.

त्या साक्षीदरम्यान अमेरिकन सिनेटर्सनी त्याला खासगीपणा म्हणजे नेमके काय याची जाणीव मात्र करून दिली. एका सिनेटरने त्याला तो आदल्या रात्री कोणत्या हॉटेलमध्ये राहिला, त्याचे बिल किती झाले, तो कुणा कुणाला गेल्या आठवडय़ात भेटला त्याची माहिती देण्यासाठी सांगितले. त्या वेळेस त्याने माहिती देणे शक्य नाही, असे उत्तर दिले. त्या वेळेस त्या सिनेटरने त्याच्या हे लक्षात आणून दिले की, आम्हाला ती माहिती नकोच आहे. कारण ते तुझे खासगी आयुष्य आहे. मात्र नेमकी हीच माहिती वापरकर्त्यांच्या संदर्भात फेसबुक विविध माध्यमांतून गोळा करते. आणि आपल्याबाबतची अशी माहिती गोळा केली जाते आहे, याची कल्पनाही ग्राहकाला नसते. हे अयोग्य आहे. केवळ माहिती गोळा केली जाते एवढेच नव्हे तर त्या माहितीचा गैरवापरही केला जातो. अशाच प्रकारचा गैरवापर अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांच्या नकळत त्यांच्या सवयी जाणून घेण्यात आल्या आणि त्याचा वापर निवडणुकांच्या जाहिरातींसाठी करण्यात आला. त्यामुळे निवडणूक निकालात ट्रम्प यांना फायदा झाला आणि ते निवडून आले. अमेरिकेसारख्या बलाढय़ देशातील जनमत फिरविण्याची ताकद या गैरवापरामध्ये असेल तर त्याची दखल घेणे क्रमप्राप्तच ठरते.

महत्त्वाचे म्हणजे फेसबुकवर सुरू असलेले उपद्व्याप आणि त्याचा गैरवापर यामुळे संपूर्ण भारतात गेल्या वर्षभरात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा ठपका फेसबुकवर आहे. फेसबुकवरील माहिती त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप फेसबुकवर अधिकृतरीत्या ठेवण्यात आला आहे. झारखंड, आसाम, तमिळनाडू आणि गुजरात इथे घडलेल्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून त्यामागे फेसबुकचीच मालकी असलेले इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप किंवा प्रत्यक्षात फेसबुकवरील चुकीची किंवा खोटी पोस्ट कारणीभूत होती हे लक्षात आले आहे. चुकीची माहिती, फेकन्यूज किंवा फेकव्हिडीओ अथवा खासगीपणामध्ये केलेली घुसखोरी यामुळे अशा प्रकारे लोकांचे प्राण जात असतील किंवा त्यांच्या प्राणांवर बेतत असेल तर ती अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे, त्याची दखल घ्यायलाच हवी. अशा प्रकारे हे सारे उपद्व्याप प्राणघातक ठरत असल्यासंदर्भात फेसबुकवर आरोप करणारा भारत हा काही एकमेव देश नाही. तर या पूर्वी अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फिलिपाइन्स, श्रीलंका, फ्रान्स, अर्जेन्टिना, ब्राझील आदी देशांनीही फेसबुकवर आरोप केले असून त्यांना बजावण्याचेही काम केले आहे. २०१८ म्हणजे गेल्याच वर्षी तर थेट युनायटेड नेशन्सच्या सत्यशोधन समितीनेही त्यांच्या अहवालामध्ये रोिहग्या मुस्लिमांच्या हत्येमागे फेसबुकच्या पोस्टमधील धर्मभेद करणाऱ्या आणि िहसा भडकावणाऱ्या पोस्ट कारणीभूत असल्याचा ठपका त्यांच्या अधिकृत अहवालामध्ये ठेवला होता. आता तर इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकमध्येच समाविष्ट केले जाणार आहे. फेसबुकवर येणाऱ्या बंधनांतून मुक्त होण्यासाठी हा मार्ग वापरला जाणार आहे. हे अतिशय गंभीर आहे, याची दखल घ्यायलाच हवी. अन्यथा हे फेसबुकी मांजर जगभरात हाहाकार माजवेल आणि तेव्हा त्या उपद्व्यापी मांजराने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले असेल. तसे होण्यापूर्वी म्हणजे ते लहान आकाराचे मांजर असतानाच त्याच्या गळ्यात घंटा बांधण्याचे पुण्यकर्म पार पाडायला हवे!

First Published on February 8, 2019 1:05 am

Web Title: facebook social media information technology personal information leak spreading false information importance of information is increasing
Next Stories
1 तिसरा कोन
2 अ‍ॅडव्हान्टेज मोदी
3 अमेरिकेच्या छातीत धडकी भरवणारा चीनी कारनामा
Just Now!
X