विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com
पाकिस्तानचे गृहमंत्री अहसान इक्बाल रविवारी नरोवाल या त्यांच्या गावी जाहीर सभेसाठी गेलेले असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त येऊन थडकले आणि त्याची दखल सर्व वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांनी यथायोग्य घेतली. त्या निमित्ताने भारतीयांच्या हेही लक्षात आले की, सध्या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या धामधुमीस सुरुवात झाली आहे. सीमेवर गोळीबार सुरू झाला की, आपल्याकडे देशप्रेमी भारतीय जागा होतो. एरवी पाकिस्तानात एकूण राज्य किती आहेत, त्यांच्या राजधान्या कोणत्या यांचीही नेमकी माहिती आपल्याला नसते. केवळ सर्व शक्तीनिशी पाकिस्तानवर तोंडसुख घ्यायचे एवढेच आपल्याला ठाऊक असते. खरे तर पाकिस्तानमध्येही होणाऱ्या लहान-मोठय़ा सर्वच घटनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर होत असतो. मात्र आपल्याला दिसतो तो केवळ सीमेवर होणारा गोळीबार. कधी तरी त्यापलीकडे जाऊन एक सुजाण नागरिक म्हणून आपण पाकिस्तान समजून घ्यायला हवा. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर झालेला गोळीबार हा म्हणूनच महत्त्वाची घटना ठरतो. आजवर वारंवार असे लक्षात आले आहे की, पाकिस्तानमध्ये ज्या ज्या वेळेस लोकशाहीची पुनस्र्थापना करण्याचा प्रयत्न होतो, त्या त्या वेळेस पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या त्यांच्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून लोकशाहीचा डाव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान कोण आहे, याला फार महत्त्व नसते कारण तिथे लष्करच सर्वेसर्वा असते, हा आजवरचा इतिहास आहे. ज्या ज्या पंतप्रधानांनी लष्करी सत्ता नाकारण्याचा प्रयत्न केला, त्यांची कारकीर्द कधीच पूर्ण होऊ शकलेली नाही किंवा लष्कराने पूर्ण होऊ दिलेली नाही, हा आजवरचा इतिहास आहे.

पाकिस्तानचा आजवरचा बराचसा प्रवास हा हुकूमशहांच्या अमलाखाली राहिला आहे, त्यांनी आजवर चार हुकूमशहा किंवा लष्करशहा पाहिले. जनरल परवेझ मुशर्रफ हे त्यांचे अखेरचे लष्करशहा. त्यांना जाऊनही आता दहा वर्षांचा कालावधी लोटेल. अद्याप पाकिस्तानने पूर्ण लोकशाही पाहिलेली नाही. लोकशाही अडचणीची वाटते त्या त्या वेळेस लष्कराने हस्तक्षेप केलेला आहे. शेजारचे राष्ट्र असलेल्या या देशात लोकशाही मार्गाने सरकार येणे आणि त्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करणे, लष्कराचा तेथील हस्तक्षेप कमी होणे ही भारतासाठी महत्त्वाची बाब असणार आहे. म्हणूनच येत्या जुल महिन्यात येऊ घातलेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. या पाश्र्वभूमीवर थेट देशाच्या गृहमंत्र्यांवरच हल्ला चढविण्याची घटना म्हणून महत्त्वाची ठरते. आजही तालिबान्यांची संघटना व इतर दहशतवादी संघटना पाकिस्तानात प्रभावी आहेत, त्यांना लोकशाही नकोच आहे.

मोहम्मद अली जिना यांच्यापासूनच पाकिस्तानच्या या प्रवासाला सुरुवात झाली. मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे, अशी मागणी जिना यांनी रेटून धरली, ब्रिटिशांचे त्या मागणीला पाठबळ होतेच. फाळणीची भळभळती जखम ठेवून ब्रिटिश निघून गेले. बॅरिस्टर असलेल्या जिना यांना स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा धोका नंतर लक्षात आला मात्र तेव्हा वेळ निघून गेली होती. अखेरच्या काळात त्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा धोशा लावला, त्या वेळेस मुस्लीम लीगलाही ते अडचणीचे वाटू लागले. मात्र त्यांच्या निधनाने प्रश्न सुटला आणि पाकिस्तान हे लोकशाहीवर नव्हे तर अल्लावर श्रद्धा असलेले मुस्लीम राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. मलिक गुलाम मोहम्मद यांनी या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानातील राजकीय सूत्रे आपल्या हाती राखली होती. ते सनदी अधिकारी होते. जीपगाडय़ा आयात करण्याच्या व्यवसायात उतरण्यासाठी त्यांनी सनदी नोकरीला सोडचिठ्ठी दिली आणि मोहम्मद अ‍ॅण्ड मिहद्रा ही कंपनी अस्तित्वात आली. नंतर याच कंपनीतील मोहम्मद जाऊन त्याची जागाही मिहद्रने घेतली आणि आज या कंपनीला आपण मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र म्हणून ओळखतो. याच मोहम्मद यांच्या सांगण्यावरून जनरल अयूब खान यांनी १९५८ साली देश ताब्यात घेतला. त्यांच्या हुकूमशाहीची सांगता १९६९ साली झाली. अयूब खान लष्करशहा राहिलेले असले तरी त्यांच्या कालखंडात प्रथमच पाकिस्तानने विकासाला सुरुवात झालेली पाहिली. हा तोच कालखंड आहे, ज्या वेळेस पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा अधिक होता. भारत-पाकिस्तान संबंधही सुरुवातीस बऱ्यापकी राहिले होते. सिंधू नदी जलवाटप करारही याच कालखंडात झाला. मात्र लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान असताना पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो यांच्या सांगण्यावरून काश्मीर मुक्तीसाठी सेना सीमेपार पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि भारतीय सन्याकडून पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला. भुत्तो यांनी हीच संधी साधली आणि अयूब खान यांच्यामुळे युद्धात हरल्याची आवई उठवून राजीनामा दिला. युद्धाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. अखेरीस अयूब खान पायउतार झाले. याह्या खान यांनी अयूब खान यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

१९७० साली पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर प्रथमच निवडणुकांना सामोरा गेला. लष्करी सत्ता जाऊन लोकशाही येणार, अशी आशा निर्माण झाली होती. याह्या खान यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला पूर्व पाकिस्तानातील अवामी लीगकडून पराभव पत्करावा लागला. अवामी लीगकडे सत्ता हस्तांतरण करण्यास याह्या खान यांनी नकार दिला. बंगाली राष्ट्रवादींच्या विरोधात सरकारने मोठी मोहीम हाती घेतली त्याची परिणती बांगलादेशच्या युद्धामध्ये झाली. भारताने यात बजावलेल्या भूमिकेनंतर स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. त्याच वेळेस पलीकडच्या बाजूस झुल्फिकार अली भुत्तो यांचा उदय झाला होता. त्यांनी राबविलेली धोरणे पाकिस्तानचे कंबरडे मोडणारी ठरली. त्याचा सर्वात महत्त्वाचा फटका हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसला. तोपर्यंत पाकिस्तानामध्ये गुजराती व्यापारी तग धरून होते. मात्र भुत्तो यांनी गुजराती व्यापाऱ्यांवर गंडांतर आणले. परिणामी गुजराती व्यापाऱ्यांनी देश सोडणे पसंत केले याचा मोठाच फटका पाकिस्तानला बसला. भुत्तो यांनी लष्करामध्येही इतर प्रमुखांना निष्कासित करून झिया-उल-हक यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुख केले. हे माझेच माकड असून माझ्याच इशाऱ्यावर नाचेल, अशी जाहीर टिप्पणी करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

झिया-उल-हक यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान म्हणजे दिशाहीन जहाजच होते. भुत्तो यांच्यावर हत्येच्या संदर्भात खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आली. सोविएत रशियाने याच कालखंडात अफगाणिस्तानामध्ये आक्रमण केले. याच काळात कंबरडे मोडलेला पाकिस्तान मुस्लीम जगतात मात्र बळकट होत गेला. याच कालखंडात पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय ही प्रबळ झाली. त्यांना रशियाविरोधात अमेरिकेकडून आíथक मदत मिळाली. त्या बळावर त्यांनी या परिसरात सत्ता गाजविण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या हाती मोठय़ा संख्येने बंदुका दिल्या. इस्लामसाठी जिहाद हा परवलीचा शब्द झाला. १९८८ साली एका संशयास्पद विमान अपघातामध्ये झिया-उल-हक यांचा मृत्यू झाला. अमेरिकेनेच हा अपघात घडवून आणल्याची चर्चा त्या वेळेस मोठय़ा प्रमाणावर झाली होती.

याच काळात बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परत आल्या आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. दुसरीकडे नवाझ शरीफ यांचेही नेतृत्व उदयाला आले होते. शरीफ हे लष्कराच्या अधिक जवळचे होते. बेनझीर भुत्तो दोनदा निवडून आल्या. दोन्ही वेळा त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. दरम्यान, दोन वेळा शरीफ यांनीही पदभार सांभाळला. मध्यंतरीचा कालखंड जनरल परवेझ मुशर्रफ यांचा होता. त्यांनी पदभार खाली ठेवताना सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. त्या निवडणुकांच्या प्रचार सभेतच बेनझीर यांची हत्या झाली.

आता गेली कित्येक वष्रे पाकिस्तानातील कोणताही पंतप्रधान हा लष्कराच्या मर्जीशिवाय फार काळ राहू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. पाकिस्तान भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे. शरीफ असो अथवा भुत्तो प्रत्येक पंतप्रधानाने आपली पोतडी व्यवस्थित भरण्याचे काम केले आहे. अखेरच्या काळात सर्वावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. यातून मुशर्रफही सुटलेले नाहीत. सर्वच राजकारण्यांमधला एक समान दुवा म्हणजे आपली सत्ता डळमळीत झाली की, खुर्ची पक्की करण्यासाठी ते भारताबरोबर कुरबुरींना सुरुवात करतात, जुने वाद उकरून काढतात आणि पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करतात. लष्कराच्या विरोधात जाण्याचे धाष्टर्य़ आजवर कुणीही राजकीय नेता दाखवू शकलेला नाही. ते करण्यासाठी त्यांना जनतेच्या पािठब्याची गरज असणार आहे. हा पािठबा केवळ आणि केवळ लोकशाही प्रक्रियेतूनच मिळू शकतो. यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. भारतीय नागरिक गेल्या ७० वर्षांमध्ये अधिक परिपक्व झाले आहेत. ते कुणालाही फारसे प्रबळ होऊ देत नाहीत. ज्या मोदींना ते तुफान बहुमताने निवडून देतात, त्यांनाच ‘गुजराती हिसका’ही दाखवतात. आता गरज आहे ती पाकिस्तानी नागरिकांनी हा ‘भारतीय’ बाणा अंगी बाणवून घेण्याची. तसे झाले तर ते त्यांच्या स्वत:च्या आणि भारताच्याही हिताचे असेल!