X

स्वानंदगणेश!

१० व्या शतकाच्या आसपास विनायकाला गणपती असे रूप लाभले.

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

देव देवदेवतांच्या बाबतीत त्यांच्या गुण व पराक्रमाचे वर्णन करणारी पुराणेही असतात आणि कथाही. या कथा कलाप्रकारांमध्ये परावíतत झालेल्या दिसतात. शंकर किंवा विष्णूने असुराचा केलेला वध चित्रशिल्पांमध्ये पाहायला मिळतो. हे सारे देवीच्या बाबतीतही तेवढेच लागू आहे. गणपतीच्या बाबतीतही त्याच्या पराक्रमाच्या कथा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. ‘गणेशप्रताप’ तर त्याचे सामथ्र्य वर्णन करणाराच आहे. असे असले तरी गणपतीने केलेल्या असुरवधाचे चित्रण भारतात फारसे पाहायला मिळत नाही. असे का व्हावे? आणि मग गणपती ही सर्वाधिक लोकप्रिय देवता ठरण्यामागे त्याच्या देवत्वाचा हा दृक् प्रवास कारणीभूत आहे का?

गणपतीच्या सुरुवातीच्या सर्व प्रतिमा या विनायक किंवा महाविनायक या नावाने अफगाणिस्तानात सापडलेल्या आहेत. त्या इसवी सनपूर्व शतकातील असून त्याचे प्राचीनत्व तिथे राज्य करणाऱ्या हस्तिनायनांपर्यंत पोहोचते. ते  त्यांचे राजचिन्ह होते. राजाही हत्तीचा मुकुट परिधान करणारा होता. त्यानंतर थेट हा विनायक किंवा गणपती यक्ष म्हणून अनेक ठिकाणी येतो. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकामध्ये त्याचा समावेश शिव-पार्वतीच्या कुटुंबामध्ये होतो. या कुटुंबातील सर्व देवता कोपल्या तर महाकठीण आणि प्रसन्न झाल्या तर काहीही देणाऱ्या अशाच आहेत.

१० व्या शतकाच्या आसपास विनायकाला गणपती असे रूप लाभले. विघ्नकर्ता असलेला तो विघ्नहर्ता झाला. त्याचे हे रूप लोकमनाला भावले, त्याची स्वत:ची आगम परंपरा सुरू झाली. पुराण अस्तित्वात आले. हा तोच कालखंड आहे की ज्या वेळेस शैव, शाक्त आणि वैष्णव संप्रदायांची काहीशी उतरंड सुरू झालेली होती. त्या काळात गाणपत्य संप्रदायाने मूळ धरले. १२ व्या शतकाच्या सुमारास तर ही परंपरा प्रचंड वेगात फोफावली. याच कालखंडात स्वानंदगणेश ही संकल्पना व तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड्रिपूंवर विजय मिळविणारा तो गणपती म्हणून प्रसिद्ध पावला. त्याने वध केलेले असुर हे या षड्रिपूंचे असुर होते आणि त्या विजयानंतरचा आनंद म्हणून तो दु:खहरण करणारा स्वानंदगणेश ठरला. ही स्वानंदगणेश संकल्पना लोकमनाला भावली. हा असुरवध स्वत:च्याच विकारांचा नाश असल्यानेच त्याच्या प्रतिमा चित्रशिल्पित झालेल्या नसाव्यात. त्याचप्रमाणे त्याची स्वानंदगणेश हीच प्रतिमा अधिक उजवी ठरल्याने लहान मुलासारखा निरागस चेहरा आणि तुंदिलतनू असले तरी ओबडधोबड न वाटणारे, आत्मीयता वाटेल असे त्याचे लोभसवाणे रूप अधिक लोकप्रिय ठरल्याने तेच चित्रित-शिल्पित झाले.

त्याच वेळेस त्याचे नेतृत्वगुण आणि युद्धातील बुद्धिचातुर्यकथाही लोकप्रिय ठरल्या. प्रसंगी देवदेवतांनाही मार्गदर्शन करणारा राजनीतिज्ञ असे त्याचे रूप लोकमनावर ठसले, हा तोच १४ व्या शतकापासून १६-१७व्या शतकांपर्यंतचा मुस्लीम आक्रमणाचा कालखंड आहे. मुस्लीम आक्रमणांनी दख्खनचा परिसर पोळला होता. अशा वेळेस हे युद्धशास्त्रनिपुण स्वानंदगणेशाचे रूप जनमनास भावणे तेवढेच स्वाभाविक होते! एवढय़ावर हे थांबते तरच नवल! प्रत्यक्ष युद्धात बळी गेलेल्या त्याच्या भक्त असलेल्या लढवय्या वीरांच्या स्मारकावरही म्हणजे वीरगळांवरही त्याचे प्रतिमांकन होऊ लागले. पुण्यातील शेखसल्ला दर्गा, बाळोबा मुंजा देवस्थान, पाषाणच्या सोमेश्वरवाडीतील देवळात असे वीरगळ आजही पाहायला मिळतात. गणपतीच्या लोकप्रियतेचीच ते साक्ष आहेत.

जाती व वर्णभेद नसलेल्या साईबाबांसारख्या देवता तुफान लोकप्रिय होतात हे तर आजही पाहायला मिळते. गणपती हादेखील असाच जातिभेदविरहित आहे. म्हणून तर लालबागच्या राजाच्या पूजनाला भेंडीबाजारात मध्यरात्रीही मुस्लीम बांधवांची गर्दी असते आणि त्याच्या भक्तांमध्ये पारशी आणि ख्रिस्ती बांधवही पाहायला मिळतात.

..अशा या आगळ्या देवतेच्या,

स्वानंद गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

First Published on: September 7, 2018 1:09 am