गोध्रा दंगलीनंतर कट्टर मुस्लीमविरोधक अशी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा जगभर वापरण्यात आली. अगदी अमेरिकेनेही मोदींना व्हिसा नाकारण्यापर्यंत हे सारे प्रकरण पोहोचले. अर्थात २०१४ मध्ये तुफान बहुमत मिळवून पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेनेही मोदींसाठी पायघडय़ाच घातल्या. पण २००२ नंतर मोदींची प्रतिमा ही ‘मौत का सौदागर’ अशी होती. मुस्लीम मतांच्या बेगमीने गुजरातची निवडणूक जिंकता येईल असे काँग्रेसला त्यानंतर वेळोवेळी वाटत होते. मात्र पलीकडे िहदू मते भाजपाकडे एकवटत गेली आणि त्याचा परिणाम म्हणजे १९९५ पासून तब्बल २२ वर्षे गुजरातमध्ये भाजपा सत्तेत आहे. २००२ नंतरही त्यात फरक पडला नाही. गुजरातच्या या पॅटर्नचा उल्लेख भाजपाच्या बाबतीत ‘िहदुत्वाची प्रयोगशाळा’ असाही झाला. त्याचाच दाखला नंतर अनेक निवडणुकांमध्ये देण्यात आला.. पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. प्रयोगशाळा तीच आहे पण विषयांमध्ये मोठा बदल झाला आहे, त्यामुळे प्रयोग मात्र वेगळे होताहेत, हेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते आहे!

२००२ नंतर मुस्लीमविरोधक म्हणून भाजपाच्या संदर्भात गरळ ओकल्यानंतर त्याचा फायदा िहदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपालाच झाला, असे काँग्रेसला आता ठामपणे वाटते आहे. परिणामी एकूणच गुजरातमधील िहदू जनतेच्या मनात काँग्रेस म्हणजे िहदूविरोधी अशी प्रतिमा तयार झाली असून त्या प्रतिमेला छेद गेल्याशिवाय गुजरातमध्ये यश मिळविणे कठीण असल्याचे काँग्रेसला लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी मुस्लीम समाजाबद्दल बोलणेही यंदाच्या निवडणुकीमध्ये पुरते जाणीवपूर्वक टाळले आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये, प्रचारसभांमधून बेस्ट बेकरी प्रकरण, गुलबर्ग सोसायटी घटना, झहिरा शेख किंवा बिल्किस बानो असे गाजलेले उल्लेख सातत्याने यायचे. २००७ च्या निवडणुकांमध्ये तर सोबहराबुद्दीन प्रकरणाचाही उल्लेख जोरदार झाला.  यातील कोणत्याही गोष्टीचा साधा उल्लेखही आजवर काँग्रेसने यंदाच्या निवडणुकांमध्ये केला नाही. उलटपक्षी हे सर्व उल्लेख कटाक्षाने टाळले. निवडणुकांच्या प्रचाराच्या तोंडावर न्या. ब्रिजगोपाल लोयांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण चच्रेत आले. त्यावरही त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर पुन्हा िहदू मते भाजपाला एकगठ्ठा जाण्याचा धोका काँग्रेसला वाटतो आहे. एवढी ही भीती मनात खोलवर रुतली आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने ‘हाज’ना म्हणजेच हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश यांना हाताशी धरले आहे. त्यांच्या माध्यमातून सत्ताप्राप्तीच्या दिशेने कूच करता येईल आणि भाजपाविरोधातील असंतोषाला आकार देता येईल असे काँग्रेसला वाटते आहे. शिवाय मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे ही प्रतिमा पुसली जावी म्हणून काँग्रेसाध्यक्षपदाचे एकमेव दावेदार असलेल्या राहुल गांधी यांनी या खेपेस मंदिरांना भेटी देण्यास आणि माथी टिळा लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला मुस्लीम समाजातील मंडळी आली तर ती कमी संख्येने येतील आणि मुस्लीम परिवेशात येणार नाहीत याची काळजी घेतली जाते. त्यांच्या सोशल मीडियावरील नोंदींमधूनही याची काळजी घेतलेली दिसते.

उलटपक्षी भाजपाने मात्र त्यांचा मुस्लिमांप्रति असलेला दृष्टिकोन बदललेला दिसतो. त्यांचे अल्पसंख्याक कक्ष या निवडणुकीत प्रचंड सक्रिय झाले आहेत. मोदींच्या आणि भाजपा नेत्यांच्या सभांना मुस्लीम समाजातील मंडळी प्राधान्याने असतील आणि तीही त्यांच्या परिवेशामध्ये हे कटाक्षाने पाहिले जाते. सोशल मीडियावरदेखील अशाच नोंदी प्रामुख्याने केल्या जातात. त्याला इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर कोणताही अपवाद नाही. पंतप्रधान मोदी यांनी भरुच आणि कच्छ या मुस्लीमबहुल भागामध्ये रविवारी घेतलेल्या सभांमध्ये तर हे दोन्ही मुस्लीमबहुल जिल्हे हे विकासाच्या वारूवर आरूढ झालेले जिल्हे आहेत, असे सांगितले. भाजपा मुस्लिमांचा अनुनय करण्याचा प्रयत्न उघडपणे करते आहे. आता मुस्लीम जनता जातीपातींच्या आणि धर्मभेदाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. विकास हाच केवळ एकमेव अजेंडा असेल असे भाजपा नेत्यांच्या भाषणांमध्ये आवर्जून सांगितले जाते. पारडे फिरले आहे, त्याचेच ही वस्तुस्थिती द्योतक आहे. पण मग याचा अर्थ मुस्लीम समाज आता भाजपाच्या बाजूने आहे, असे मानण्याचे कारण नाही. मुस्लीम समाज पुढे यायला घाबरतो आहे, एवढी भीती त्यांच्या मनात असल्याचे काँग्रेस कार्यकत्रे जाहीर नव्हे तर खासगीत सांगतात आणि निवडणुकीतही तो मतदानासाठी कितपत उतरेल याविषयी खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे. गुजरातमध्ये हा समाज १० टक्क्यांच्या आसपास आहे.

याचा अर्थ भाजपासाठी विजय थेट आहे, असे नाही. कारण हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश या त्रयीने त्यांच्या नाकात दम आणला आहे. हे तिघेही तरुण आहेत. हार्दिकच्या आंदोलनात पाटीदार समाज पूर्णपणे त्याच्या बरोबर होता. या समाजाने त्यालाच साथ द्यायची ठरवली तर भाजपाची पंचाईत होणार आहे. पण ज्येष्ठ पाटीदार हे आपल्यासोबत आहेत आणि केवळ थोडेथोडके तरुण हार्दिकसोबत आहेत, असे भाजपाला वाटते आहे. शिवाय हार्दिक काँग्रेससोबत गेल्यामुळे ओबीसी आपल्या पाठीशी उभे राहतील आणि मतांचे ध्रुवीकरण होत विजयाचा मार्ग सुकर होईल, असे अमित शहांसह अनेक भाजपा नेत्यांना वाटते आहे. मात्र आता राजकारण प्रू्वीइतके सरळ राहिलेले नाही. अखेरच्या दिवसांत काय होते यावरही मतदान अवलंबून असते, असे स्वत: भाजपाध्यक्ष अमित  शहा यांना वाटते. सलग २२ वष्रे सत्तेत राहिल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असंतोष तयार होतो, तसा असंतोष गुजरातमध्येही आहे हेही ते मान्य करतात. पण त्याचा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होईल एवढा तो असंतोष प्रभावी नाही, असे त्यांना वाटते. असे असले तरी भाजपा, पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शहा कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. कारण बऱ्याच वर्षांनंतर निवडणुकांच्या निमित्ताने गुजरात ढवळून निघाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. खरे तर गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसने येथील त्यांचा किल्ला गमावल्यात जमा आहे. पण यंदा माहोल वेगळा असल्याने त्यांना थोडी आशा आहे.

शहरी भागांमध्ये जीएसटीमुळे व्यापारी हैराण असले तरी भाजपाला बऱ्यापकी अपेक्षा आहेत. तर ग्रामीण भागामध्ये मात्र त्यांना असंतोषाला बऱ्यापकी सामोरे जावे लागते आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या समस्या आणि सरकारी धोरणांमुळे नाराज आहेत. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर गुजरातमधील शेतीचा प्रवास वेगवेगळ्या कारणांनी खालच्याच दिशेने सुरू आहे. शेंगदाणा उत्पादक शेतकरी तर कमी मिळालेल्या हमीभावामुळे हवालदिल आहेत. त्यात गेल्या चार वर्षांत कधी दुष्काळ, कधी पूर तर कधी परतीच्या पावसाने शेतीला फटका दिला आहे. सरकारने आता निवडणुकांच्या तोंडावर तीन लाखांची सरसकट कर्जमाफी दिली खरी पण त्याने प्रश्न फारसा हलका झालेला नाही. त्यामुळे आव्हान देणाऱ्या त्रिमूर्ती आणि काँग्रेसच्या निमित्ताने हा असंतोष एकाच वेळेस मतपेटीतून बाहेर आला तर काही खरे नाही, याची भाजपाला जाणीव आहे. त्यामुळे सत्ता येणार याची खात्री असली तरी पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधानांचे राज्य असल्याने जागा कमी मिळाल्या तरी नाक कापले जाईल, अशी भीती भाजपामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी कंबर कसली आहे.

या साऱ्या परिस्थितीमध्ये भाजपाची काही बलस्थानेही आहेत. ही बलस्थाने कशी कामे करतात यावर गुजरातमधील भाजपाचे भवितव्य आणि प्रयोगांना मिळणारे यश अवलंबून असणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा हे मतदान केंद्रांनुसार, मतांचे गणित करणारे राजकारणी मानले जातात. या संदर्भातील त्यांची बांधणी पक्की आहे. भाजपाला आव्हान देणारी त्रयी असो किंवा काँग्रेस; ही बांधणी आजमितीस कुणाचकडे नाही. त्यामुळे भाजपाचा विजय नक्की मानला जातो. कारण अखेरीस कुणालाही, कितीही, काहीही वाटले तरी अखेरीस मतदान किती होते व कुणाच्या बाजूने होते ते महत्त्वाचे असेल. ज्याची बांधणी प्रभावी त्याच्या पारडय़ात यश असेल. त्यामध्येही एक वेगळा प्रयोग राबविण्याच्या बेतात भाजपा आहे. आजवर िहदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून पाहिली गेलेली गुजरातची निवडणूक यंदा अशा प्रकारे अनेकविध नव्या प्रयोगांची शाळा ठरणार आहे. या शाळेत उत्तीर्ण कोण व किती टक्क्यांनी यासाठी मात्र

१८ डिसेंबपर्यंत वाट पाहावी लागेल.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab