विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
लोकसभा निवडणुकांसाठी एक एक करत प्रत्येक टप्प्यातील मतदान पार पडत असताना देशभरामध्ये केवळ एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे, मोदी की आणखी कुणी? दर खेपेस निवडणुकांमध्ये असे लक्षात येते की, आताशा म्हणजे गेल्या २० वर्षांमध्ये निवडणुका अधिकाधिक संभ्रमित करणाऱ्या ठरत आहेत. माध्यमांचे अंदाज अनेकदा चुकतात. २०१४ मध्येही असेच घडले. गेल्या दोन वर्षांत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांचे निकालही बरेचसे भाजपाच्या निरंकुश सत्तेला आव्हान देणारेच होते. सुरुवात मोदी-शहांचे राज्य असलेल्या गुजरातपासूनच झाली. तरीही आजवरचा अनुभव असे सांगतो की, लोकसभा निवडणुकांमध्ये गणिते बदलतात. त्यामुळेच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे मोदी की आणखी कुणी?

मोदींच्या कारकीर्दीचे परीक्षण आपल्याला मनमोहन सिंग यांच्या यूपीए-दोनच्या कालखंडाच्या पाश्र्वभूमीवर करावे लागते. धोरणलकवा आणि भ्रष्टाचाराच्या अनेकानेक प्रकरणांनी त्यांची दुसरी इनिंग विशेष गाजली. त्या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधातील लढाई तीव्र करणार असे आश्वासन देत मोदी सत्तारूढ झाले. मोदींना तुफान जनमत लाभले, त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून अपेक्षाही भरपूर होत्या. आश्वासनं तर त्यांनी भरपूर दिली, पूर्ती मात्र तुलनेने कमी दिसते.

मोदी सरकारने पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला, उद्योग विश्वासाठी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली. मात्र उद्योगांच्या बाबतीत गुंतवणूक असेल किंवा ‘मेक इन इंडिया’च्या बाबत त्यांना म्हणावे तसे यश लाभले नाही. एक मात्र निश्चित की मोदी सरकारच्या कालखंडात सतत काही ना काही घडत होते. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये धोरणलकवा हाच भाग महत्त्वाचा होता. मोदींनी मात्र सातत्याने अनेकानेक योजना सुरू केल्या, काही नाव बदलून नव्या रूपात आणल्या. अर्थात या योजनांमधील अनेकांच्या समोर अंमलबजावणीचे प्रश्नचिन्ह आहे. सरकारी आकडेवारी मोदी सरकार देते, मात्र त्या आकडेवारीविषयी अनेकांच्या मनात शंकाच अधिक आहेत.

काही भूमिका आणि योजनांबद्दल मात्र जनमानसांत त्यांना चांगले स्थान मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियान हे त्यापैकीच एक. या अभियानाची घोषणा त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात केली. त्याचा फरक बऱ्यापैकी जाणवू लागला आहे. त्याची सांगड त्यांनी खूप खुबीने भ्रष्टाचारविरोधातील मोहिमेशीही घातली आणि ‘तिथेही स्वच्छतेचे काम करणार’ असे जाहीर केले. नीरव मोदी आणि विजय मल्या भारताबाहेर पळून गेल्यानंतर विरोधकांनी त्याच मुद्दय़ावर त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला.

त्यांनी घेतलेल्या दोन निर्णयांची चर्चा सर्वाधिक झाली. त्यातील महत्त्वाचा होता तो निश्चलनीकरणाचा निर्णय. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीतही त्या निर्णयाने फारसा फरक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पडल्याचे सध्या तरी दिसत नाही; किंबहुना सामान्य माणसांची कोंडीच अधिक झाली. अनेकांच्या हातचे काम गेले आणि उद्योगांवरही त्याचा मोठा परिणाम झाला. अर्थात त्याचे परिणाम आज नाही तर आणखी काही काळाने दिसतील असे सांगत भाजपाने आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि वाढलेले करउत्पन्न, वाढलेले डिजिटल व्यवहार यांची आकडेवारी सादर केली आणि त्यातून मोदींची वेगळी प्रतिमा उभी राहिली. त्यामुळेच नंतर झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही भाजपाने बहुमत मिळवले. मोदींच्या कार्यकाळातील त्यांच्या प्रतिमेकडे पाहता लक्षात येते की, मोदी आता ब्रॅण्ड झाले आहेत. लोकांच्या मनात अनेकविध कारणांनी भाजपाविषयी नाराजी आहे. मात्र त्यांच्याविषयीच्या लोकभावना आजही चांगल्याच आहेत. त्याच बळावर आता आपण तरून जाऊ असे भाजपाला वाटते आहे आणि सारी भिस्त ‘ब्रॅण्ड मोदीं’वरच आहे.

दोन क्षेत्रांमध्ये मोदी यांच्या कामाचा ठसा याच काळात उठलेला दिसतो. त्यातील पहिले क्षेत्र हे परराष्ट्र संबंधांचे आहे. शेजारील राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर राष्ट्रांशी असलेले भारताचे संबंध या काळात सुधारलेले दिसतात. परकीय गंगाजळी हा कोणत्याही देशासाठी मोठा महत्त्वाचा भाग असतो. तिथेही मोदी सरकारने उचललेली पावले ही विदेशी गुंतवणूकदारांना यापूर्वीच्या सरकारपेक्षा निश्चितच अधिक दिलासा देणारी होती.

मात्र दुसरीकडे गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक बेकारी असलेली वर्षे म्हणून गेल्या दोन वर्षांतील मोदींच्या कारकीर्दीकडे पाहिले जात आहे. निश्चलनीकरणामुळे रोजगाराला फटका बसलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्या कण्यालाही विकारांनी ग्रासले आहे. कृषी क्षेत्रात असलेला असंतोषही खूप मोठा आहे. अलीकडच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये त्या क्षेत्राकडे लक्ष देण्याचा सरकारचा प्रयत्न लक्षात येत होता. मात्र त्या तरतुदींमुळे असंतोष संपलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. याच कृषीमधील असंतोषाचे फटके भाजपाला तीन राज्ये गमावण्यातून सहन करावे लागले!

मात्र असे असले तरी आपल्याकडे निवडणुका या भावनेवरजिंकल्या जातात, हा आजवरचा इतिहास आहे. या इतिहासाकडे पाहता हा मुद्दा मोदी यांनी नेमका लक्षात घेतलेला दिसतो. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या भाषणातील मुद्दय़ांचे व्यवस्थित विश्लेषण केले की लक्षात येते की, त्यांनी खूप विचारपूर्वक त्यांचे ‘व्हिजन’ हे ‘ब्रॅण्ड’ म्हणून लोकांसमोर ठेवले आहे. २०१९च्या ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या म्हणजेच शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांला सुरुवात होईल. त्यावेळेस भारत स्वच्छ झालेला असेल आणि उघडय़ावर शौच कुणीही करणार नाही, असे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले. त्यांची उद्दिष्टे ‘व्हिजन २०४७’सारखी लांब पल्ल्याची आहेत. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षांत भारत पूर्णपणे स्वयंपूर्ण असलेली महासत्ता असेल असे व्हिजन त्यांनी जनमानसासमोर ठेवले आहे. या सर्व उद्दिष्टांमधून मोदी यांची स्वतची अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. मोदी हे आता ब्रॅण्ड आहेत. त्यामुळे त्या ब्रॅण्डच्या बळावर आपण निवडणुकांचा भवसागर सहज पार करू असे भाजपाला वाटते आहे. याशिवाय सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामानंतरचा प्रतिहल्ला या दोन घटनांनी कर्तव्यकठोर पंतप्रधान असा एक वेगळा एक आयाम त्यांच्या प्रतिमेला मिळाला आहे.

आजवरच्या मानवी इतिहासात असे लक्षात आले आहे की, त्या त्या कालखंडात सर्वोत्तम तंत्रज्ञान हाती असलेला माणूस किंवा समाज राज्य करतो, त्याच्या हाती सत्ता असते. सध्याच्या कालखंडातील तंत्रज्ञानाच्या हाताळणीत भाजपा आघाडीवर दिसते आहे. त्या माध्यमातूनच हे प्रतिमेचे युद्ध लढले जात आहे. कुणाचे तंत्रज्ञान उत्तम आणि प्रतिमा मोठी याचे उत्तर येत्या २३ मे रोजी मिळेल.