विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

स्वातंत्र्याला तब्बल ७२ वर्षे होत आली तरीही या देशात मलमूत्राची टाकी स्वच्छ करताना चार जणांचे बळी जात असतील तर ती समस्त देशवासीयांसाठी केवळ आणि केवळ लज्जास्पद अशीच बाब आहे. ही घटना गुजरातमध्ये बडोद्याशेजारी असलेल्या दभोई येथे घडलेली असली तरी घटना कुठे घडली याला महत्त्व नाही तर ती आपल्या देशात घडली हे महत्त्वाचे आहे. एरवीही अशा घटना घडत असतात. भारतातील प्रगत शहर मानल्या गेलेल्या मुंबईमध्येही अशा घटना सातत्याने घडतात. मानवी प्राणांचे आणि श्रमांचे मूल्यच राहिले नाही की काय अशी शंका यावी, अशा या दुर्घटना आहेत. स्वच्छता राखावी यासाठी देशाच्या पंतप्रधानांना थेट देशाला उद्देशून भाषण करण्याची वेळ येते, यातच खूप काही आले. त्यांनी अशी मोहीम हाती घेऊन देशातील महत्त्वाच्या समस्येकडे जनतेचे लक्ष वेधले आणि समस्येला प्राधान्य दिले हे महत्त्वाचे असले तरी अशी वेळ देशाच्या पंतप्रधानांवर यावी ही देखील नामुष्कीच होती.

दभोईमधील घटना बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी सहज लक्षात येतात. विदेशी कंपन्या भारतात येऊन काम करून घेतात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथे श्रमांचे मूल्य तुलनेने कमी द्यावे लागते. व्यवसायामध्ये सगळीकडेच असा विचार होतो. दभोई येथील हॉटेलच्या मालकानेही असाच विचार केला. त्याला वाटले की, त्या स्वच्छतेसाठी यंत्र बोलावले तर जेवढे पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा माणसे या सांडपाण्याच्या मलमूत्राच्या टाकीत उतरवली तर १५०० रुपये कमी द्यावे लागतील. त्यामुळे त्याने गावातून माणसे बोलावून स्वस्तातील सौदा पक्का केला. मुळात अशाप्रकारे मलमूत्राच्या हाताळणीसाठी माणसे उतरवणे कायद्याने प्रतिबंधित आहे. मात्र गावापासून शहरापर्यंत अनेक ठिकाणी हे प्रकार सर्रास होताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे एरवी उठसूट भूमिका घेणारी विचारवंत मंडळी या दुर्दैवी घटनांसंदर्भात मात्र मूग गिळून गप्प बसलेली दिसतात. हा मुद्दा कुणालाच लावून धरावासा वाटत नाही. सांडपाण्याच्या गटारांमध्ये उतरणारी ही मंडळी असतात कोण? याचा विचार केला तर लक्षात येईल की, अनेकदा ती तळागाळातील आणि पददलित समाजातील असतात. ती माणसे आहेत, याला प्रथम महत्त्व असले तरी ती कोणत्या समाजातील आहेत यालाही तेवढेच महत्त्व आहे. कारण समाजामध्ये आजही असा एक वर्ग आहे की, ज्याला अशा प्रकारचे काम करावे लागते. किंवा त्याशिवाय इतर संधी फारशा उपलब्ध नाहीत.

मानवी आरोग्याचे मूल्य आपण नेमके जाणण्यामध्ये कमी पडलो हेच सध्या देशभरात सुरू असलेल्या पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेमध्ये अधोरेखित झाले. त्याचीही गत अशी की, केवळ दिखाव्यामध्येच आपल्याला अधिक रस असतो. सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविलेल्या शहरात पहाटे पाच ते सकाळी ८ या वेळात रेल्वेच्या दुतर्फा पाहिले तरी वास्तव सहज लक्षात यावे.

स्वच्छतेचा आपल्या आरोग्याशी असलेला घनिष्ठ संबंध महत्त्वाचा आहे. एक नागरिक आजारी पडतो आणि त्याच्या हातून काम होत नाही त्यावेळेस तो दुहेरी फटका असतो. देशाच्या उत्पादकतेवर त्याचा थेट परिणाम होतो आणि पलीकडे आरोग्यावरचा खर्चही वाढतो त्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसतो. मात्र या नजरेतून आपण सार्वजनिक आरोग्याकडे आणि या व्यवस्थेकडे कधीच पाहात नाही. महासत्ता व्हायचे तर सार्वजनिक आरोग्याची देशाची बैठक पहिली पक्की असावी लागेल तर पुढे पावले टाकता येतील, याचे भान ठेवायलाच हवे!