18 October 2018

News Flash

देर आये, दुरुस्त आये!

राजपुत्र राहुल गांधींमध्येही खूप चांगले सकारात्मक बदल घडून आलेले दिसत आहेत.

1) सुंदरबनाच्या त्रिभुज प्रदेशातील वाघ जगातील सर्वाधिक वेगळे असे खार जमिनीवरील वाघ आहेत. 2) आमूर ससाण्याचा सैबेरिया ते दक्षिण आफ्रिका असा थक्क करणारा प्रवास

सध्या सर्वाचेच लक्ष गुजरात निवडणुकांकडे लागून राहिले आहे. राजपुत्र राहुल गांधींमध्येही खूप चांगले सकारात्मक बदल घडून आलेले दिसत आहेत. साहजिकच आहे की, त्यामुळे काँग्रेसमध्ये धुगधुगी नव्हे तर चैतन्याची लहरच आली आहे. ज्या पक्षाध्यक्षाभिषेकासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा झाली ती घटिकाही आता समीप आली आहे. पलीकडे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकूर यांनी भाजपाच्या नाकात दम आणला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या दोघांचेही हे मूळ राज्य असल्याने त्यांनीही कंबर कसली आहे. पूर्वीइतकी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही, ही त्यांना झालेली जाणीवही महत्त्वाची आहे. साहजिकच आहे की, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. अशा अवस्थेत नेपाळ, बांगलादेश आणि भारत हे तिन्ही देश येणाऱ्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या व्याघ्रगणनेमध्ये एकत्र येणार या बातमीकडे लक्ष तरी कसे जाणार? ही बातमी अमित शहांच्या बातमीपेक्षाही महत्त्वाची आहे. कारण गुजरातमध्ये भाजपा हरला काय आणि काँग्रेस जिंकली काय (ज्याची शक्यता कमी दिसते आहे) सामान्य भारतीयांच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. पण वाघ ज्या क्षणी या भूतलावरून नष्ट होईल त्या क्षणी माणसाने आपले अखेरचे दिवस मोजायला सुरुवात करावी लागणार, एवढे वाघाचे अस्तित्व आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. वाघ आहे याचा अर्थ तो ज्या शाकाहारी प्राण्यांना भक्ष्य करतो ते आहेत. शाकाहारी प्राणी आहेत याचा अर्थ ते ज्या झाडपाल्यावर जगतात त्याची स्थिती चांगली आहे. आणि झाडपाला आहे याचा अर्थ त्यासाठी आवश्यक पाण्याची पातळी जमिनीखाली चांगली आहे. एका वाघाचे अस्तित्व आपल्याला या साऱ्या गोष्टी सांगत असते. म्हणून वाघ महत्त्वाचा आहे आणि या छोटेखानी बातमीला नेपाळ, बांगलादेश आणि भारत या तिन्ही देशांमध्ये महत्त्व आहे. खरे तर हे आधीच व्हायला हवे होते.

निसर्गाचे संतुलन हे मानवी आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या निसर्गातील प्रत्येक किडामुंगीचाही आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे, याचे भान माणसाला येईल, तो सुदिन. पक्षी-प्राण्यांच्या बाबतीत आपण आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे त्यांना जाती-धर्म, देश-प्रांत यांच्या सीमारेषा नसतात. याही पूर्वी अनेकदा हा मुद्दा लक्षात आला आहे. २०१४ साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैबेरियामध्ये जंगलात सोडलेला सैबेरियन वाघाचा बछडा काही काळाने चीनच्या हद्दीत सापडला. त्याने मधली नदी ओलांडून चीनमध्ये प्रवेश केला होता. प्राण्यांना प्रांतदेशभेद नसतात, ते माणसांना असतात. ते आणखी  एकदा  खासकरून आमूर ससाण्याच्या संदर्भात २०१२ ते २०१५ या कालखंडामध्ये.

आमूर ससाणा म्हणजे सैबेरिया आणि मंगोलियाच्या आग्नेय भागात मोठय़ा संख्येने राहणारा पक्षी. ऑक्टोबर महिना सुरू होताच ते तिथून निघतात आणि भारतामार्गे दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने रवाना होतात. त्यांचे स्थलांतर हे जगातील सर्वात मोठे स्थलांतर आहे. गेली अनेक वर्षे ते सातत्याने सुरू आहे. हे पक्षी भारतात नागालॅण्ड परिसरामध्ये काही काळ थांबतात. तेथील स्थानिकांना हे लक्षात आल्यानंतर हजारोंच्या संख्येने आलेल्या या पक्ष्यांची शिकार सुरू झाली. प्रति वर्षी १२ हजार ते १४ हजार पक्षी पकडून मांसाहारासाठी त्यांचा वापर केला जातो, हे २०१२ साली एका सर्वेक्षणामध्ये लक्षात आले. या पक्ष्यांना वाचविण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला तर अभ्यास करण्याच्या हेतूने डेहराडूनच्या वन्यजीव संस्थेने संशोधन हाती घेतले. २०१३ साली ऑक्टोबर महिन्यात हे पक्षी नागालॅण्डमध्ये आले त्या वेळेस त्यातील काहींना उपग्रहाद्वारे त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ट्रॅकर लावण्यात आले. नागा, पंक्ती आणि वोखा अशी नावे त्यांना देण्यात आली. त्यानंतरच्या अभ्यासात असे लक्षात आले की, प्रति वर्षी ते एक मार्गी २२ हजार किलोमीटर्स असा एकूण ४४ हजार किलोमीटर्सचा प्रवास सैबेरिया ते दक्षिण आफ्रिका असा करतात. जाताना त्यांचा मार्ग वेगळा असतो. जाताना ते आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बांगलादेश, बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र यामार्गे जातात. परतीच्या मार्गात महाराष्ट्रात आल्यानंतर ते गुजरात, राजस्थान-बारमेर, बिकानेरमार्गे पुढे जातात. भारतात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून अरबी समुद्रावरून उडत जातात. अरबी समुद्र ओलांडण्यासाठी त्यांना सलग साडेतीन दिवसांचा प्रवास करावा लागतो. ते दिवसरात्र न थांबता, न थकता हा प्रवास करतात आणि सोमालियाच्या किनाऱ्यावर उतरतात. नंतर केनियामार्गे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये जातात. हिवाळा तिथेच व्यतीत केल्यानंतर ते एप्रिलमध्ये साधारणपणे तिसऱ्या आठवडय़ात परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. त्यांचे हे जगातील सर्वात मोठे स्थलांतर केवळ थक्क करणारे होते. त्यातून माणसाला काय शिकता येईल याचा विचार आता संशोधक करीत आहेत. असे काय आहे की, त्यामुळे साडेतीन दिवसरात्र न थकता प्रवास करू शकतात, यावरही आता संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. ससाण्यामुळे सरपटणारे प्राणी आणि इतर प्रजातींच्या वाढलेल्या पक्ष्यांच्या संख्येवर सहज नियंत्रण राहते असेही संशोधकांना लक्षात आले आहे. वाघाप्रमाणेच याचेही पर्यावरणसाखळीत तसेच प्राणिपक्ष्यांच्या अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान आहे. नागालॅण्डमधील हजारोंच्या संख्येने होणाऱ्या शिकारीत ते धोक्यात आले होते. सुदैवाने आता जनजागृतीनंतर शिकारीच संरक्षक-संवर्धक झाले आहेत.

हेच नेमके सुंदरबनच्या तसेच हिमालयातील वाघांच्या बाबतीत होणे गरजेचे आहे. म्हणूनच या तिन्ही देशांनी हाती घेतलेली ही संयुक्त मोहीम महत्त्वाची आहे. देशांसाठी तर आहेच पण संपूर्ण मानवजातीसाठीही महत्त्वाची आहे. त्याची जबाबदारी आता भारतातील नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीने घेतली आहे. प्रत्येक देशात प्रगणनेची पद्धत वेगळी असते. मात्र मोठय़ा मोहिमांमध्ये प्रमाणीकरण असावे लागते, या निमित्ताने तेही होईल. शिवाय भारतातील या विषयातील संशोधन हे इतर दोन देशांपेक्षा अधिक प्रगत आहे. या तिन्ही देशांनी सीमारेषा आणि इतर वाद असलेले मुद्दे बाजूला ठेवून एकत्र येणे हे गरजेचे आहे. उशिरा हा होईना पण ते या निमित्ताने घडते आहे हे विशेष. सुंदरबनाच्या त्रिभुज प्रदेशातील जैववैविध्य वेगळे आहे. त्यामुळे तेथील वाघ हेदेखील जगातील इतर ठिकाणच्या वाघांपेक्षा वेगळे आहेत. तेच हिमालयाच्या पर्वतरांगांतील वाघांनाही लागू आहे. या दोन्हींचा अभ्यास झाला तर त्यांच्या संवर्धनासाठीची आखणी करणे शक्य होईल. त्यामुळे उशिराने होत असले तरी हरकत नाही, कारण ‘देर आये, दुरुस्त आये!’

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

First Published on December 1, 2017 1:01 am

Web Title: india nepal and bangladesh will be conducting the 2018 tiger census