मथितार्थ
विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
पाकिस्तानसोबत १९७१ साली झालेल्या युद्धामध्ये कराची बंदरावर भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभव मान्य करावा लागला. त्याच्या स्मृती जागविण्यासाठी प्रति वर्षी ४ डिसेंबर नौदल दिन म्हणून, तर त्या दिवशी संपणारा आठवडा हा नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यंदाही नौदल दिन व सप्ताह मोठय़ा दिमाखात साजरा झाला. त्यानिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेमध्ये किती मोठय़ा प्रमाणावर आता वाढ होते आहे, याचे एक चांगले चित्र पत्रकारांसमोर आणि पर्यायाने नागरिकांसमोर रेखाटले. असे चित्र प्रति वर्षी रेखाटले जाते, मात्र ते वास्तवात येईपर्यंत दीर्घ विलंब होतो हे सांगायला बहुधा ते विसरले असावेत; परंतु नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख असलेले व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी वास्तव समोर आणले हे बरेच झाले.

नौदलप्रमुख लांबा म्हणाले होते, सागरी क्षमता वाढवण्यासाठी ५६ युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा समावेश भारतीय नौदलात केला जाणार आहे. हा केवळ त्यांच्या बांधणीच्या संदर्भातील निर्णय आहे. तो प्रत्यक्षात येण्यास मात्र दीर्घ कालावधी लागतो, असा आजवरचा भारतातील अनुभव आहे. स्कॉर्पिन पाणबुडीच्या संदर्भातील निर्णय होऊन १५ वर्षे उलटून गेली तरी अद्याप प्रकल्प अध्र्यावरदेखील पोहोचलेला नाही हे भीषण वास्तव आहे. असे झाले की मग आपल्याकडची नोकरशाही, राजकारण, यामधील व्यावसायिकांचे लागेबांधे अशी कारणे पुढे केली जातात. कारणे काहीही असतील, आपल्यासारख्या देशामध्ये प्रकल्प तोही सैन्यदलांच्या संदर्भातील प्रत्यक्षात येण्यास दीर्घकाळ लागतोच लागतो हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे रेखाटलेले चित्र हे ५६ इंचाची छाती फुगवणारे असले तरी, वास्तव मात्र त्या फुगलेल्या फुग्यातील हवा काढून घेणारेच आहे.

हे बरे झाले की, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनीच हे वास्तव आपल्यासमोर आणण्याचे काम केले. सिंधुरक्षक पाणबुडीचा स्फोट आणि जलसमाधीनंतर पाणबुडी विभागाच्या मागे नष्टचर्यच लागले. पाणबुडय़ांवर झालेले किंवा त्यांना झालेले अपघात वाढले. त्याच वेळेस ‘लोकसत्ता’ने या संदर्भात एक वृत्तमालिका प्रकाशित करून पाणबुडी विभागाची दयनीय अवस्था समोर आणली होती. जे वास्तव लुथ्रा यांनी आता २०१८ मध्ये सांगितले त्याची नावानिशी असलेली आकडेवारी या वृत्तमालिकेत प्रसिद्ध केली होती. सध्या आपल्याकडे सिंधुघोष वर्गातील नऊ तर शिशूमार वर्गातील चार अशा केवळ १३ पाणबुडय़ा शिल्लक आहेत. साडेसात हजार किलोमीटर्सच्या किनारपट्टीसाठी या पाणबुडय़ा म्हणजे ‘दर्या मे खसखस’ अशीच अवस्था आहे. ही अवस्था एरवी म्हणजे शांततेच्या कालखंडातही दयनीय अशीच आहे.

आता परिस्थिती बदलली आहे. शेजारीच चीन अतिशय आक्रमक होतो आहे. त्यांचा हिंदी महासागरातीलच नव्हे तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वावरही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. शिवाय त्यांनी आता पाकिस्तानला मदत करण्यास सुरुवात केली असून नव्या तीन पाणबुडय़ांचा ताफा त्यांनी पाकिस्तानला बहाल केला असून येत्या तीन वर्षांत आणखी तीन नव्याकोऱ्या पाणबुडय़ा चीनकडून पाकिस्तानला मिळणार आहेत. आजवरचा चीनचा इतिहास असे सांगतो की, आपण त्यांना कितीही नावे ठेवत असलो तरी त्यांचे प्रकल्प काटेकोरपणे वेळेआधीच पूर्ण होतात. भारतीय विमानवाहू युद्धनौका विक्रांत आणि विराटकडे पाहून चीनने धडा घेतला. त्यांना विमानवाहू युद्धनौकांचे महत्त्व कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या बांधणीला प्राधान्य दिले. चीनची लिओिनग ही पहिली युद्धनौका त्यांच्या नौदलात दाखल झाली आहे. दुसरीची बांधणी वेगात पूर्ण होते आहे, तर तिसरीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. सारे काही वेळेत सुरू आहे. आपण मात्र १९९५ पासून तीन विमानवाहू युद्धनौकांच्या गरजेबाबत बोलत होतो तेव्हा विक्रांत निवृत्तीला आली होती. विराटदेखील नंतरच्या १० वर्षांत निवृत्तीच्या वाटेवर असणार याची पूर्ण कल्पना होती. आता केवळ एकच म्हणजे आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका सेवेत आहे. ती आता कुठे गेल्या महिन्यात पूर्णाशाने तयार झाली आहे. तिच्या सागरी चाचण्या सध्या सुरू आहेत. विक्रांत या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे सारे काम पूर्ण होऊन ती दाखल व्हायला २०२१ उजाडणार आहे. आयएनएस विशाल या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेसाठीचा प्रस्ताव तयार आहे. तो वेगात पुढे सरकेल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत अनुभव पाहता ती युद्धनौका सेवेत केव्हा येईल, हे कदाचित संरक्षणमंत्रीही ठामपणे काही सांगू शकणार नाहीत, अशी आपली अवस्था आहे.

त्यामुळे नौदलप्रमुखांनी देशाला आश्वस्त करण्यासाठी ५६ युद्धनौका व पाणबुडय़ा लवकरच नौदलात दाखल होतील, असे सांगितलेले असले तरी ‘केव्हा’? या प्रश्नासमोर मात्र उत्तराऐवजी प्रश्नचिन्हेच अधिक आहेत. दुसरीकडे पाणसुरुंगांचा शोध घेणाऱ्या युद्धनौकांचीही वाढती गरज आहे. मात्र त्या बाबतीतही गोष्टी तशाच अडकलेल्या अवस्थेत आहेत. या युद्धनौका ही काळाची गरज आहे. आता पाणसुरुंगांचा शोध घेणाऱ्या केवळ दोनच युद्धनौका शिल्लक आहेत. गरज आहे ती या वर्गातील किमान १६ युद्धनौकांची. त्या संदर्भात झालेल्या करारानुसार गोवा शिपयार्डसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करार व्हायचा होता. मात्र गोष्टी तिथे येऊन दीर्घकाळ अडकलेल्या अवस्थेत आहेत. हा प्रश्नही वेगात सुटणे आवश्यक आहे.

अर्थात असे असले तरी जमेची एक महत्त्वाची बाब म्हणजे तरीही भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय शिष्टाईमध्ये बरीच नवीन पावले उचलली आहेत. गेल्या संपूर्ण वर्षभरात सुमारे ११३ विदेशी बंदरांना भारतीय युद्धनौकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे अनेक देशांशी संबंध दृढ होण्यास मदतच झाली आहे. एकूण १६ युद्धसराव केले असून त्यात नौदलाच्या क्षेत्रातील सर्व प्रमुख रशिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आदी देशांबरोबरच इतर छोटेखानी देशांचाही समावेश आहे. ते करताना आपल्याकडे फारशी उपलब्धता नाही, याचा बाऊ नौदलाने केलेला नाही ही चांगली गोष्ट आहे. याबाबतीत त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

मात्र आता नौदलाला केवळ भारतीय किनारपट्टीवरच नव्हे तर बाहेरही मोक्याच्या असलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. तिथे भारत सरकारची भूमिका महत्त्वाची असेल. हिंदूी महासागरातील सेशल्स येथे भारतीय नौदलाचा तळ असणे खूप महत्त्वाचे होते. त्याला तेथील स्थानिक विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. आता त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. हिंदूी महासागरातील चीनच्या आक्रमकतेला मुरड घालण्यासाठी हा तळ अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये चीनने तेथील बंदर विकासात घेतलेली आघाडी भारताला दुर्लक्ष करून चालणार नाही. अरबी समुद्रातील मालदीवमध्येही मध्यंतरी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांचीही चीनशी असलेली जवळीक वाढलेली होती. मात्र आता तिथे सत्तापालट झाला असून तो भारताच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यामुळे त्याची चिंता काही काळासाठी तरी मिटली आहे.

मात्र पलीकडच्या बाजूला भारतीय नौदलाला एक महत्त्वाची चिंता येणाऱ्या काळात सतावणार आहे. ती नौदलासाठीचीच नव्हे तर भारत सरकारसाठीही महत्त्वाची चिंता असणार आहे, ती म्हणजे जिबुती या सामरिकदृष्टय़ा  अतिमहत्त्वाच्या ठिकाणी उभा राहणारा चीनच्या नौदलाचा तळ. संपूर्ण जगाचा आणि जागतिक सागरी व्यापारी मार्गाचा विचार करता अगदी प्राचीन काळापासून जिबुती हे सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. यापूर्वी तिथे केवळ अमेरिकेच्या नौदलाचा तळ होता. त्यानंतर रशिया आणि चीननेही तिथे आपला तळ स्थापण्यासाठी हालचाली केल्या. आता चीनने त्या क्षेत्रात आक्रमक भूमिका घेतली आहे. तिथे चीनला रोखता येणे सध्या कठीण दिसत असले तरी त्याची काळजी करावीच लागेल अशी स्थिती आहे.

पण हे सारे करताना आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत त्या पाणबुडय़ा. पाणबुडय़ांना सागरातील किंवा सागरतळातील डोळे किंवा नजर असे म्हटले जाते. तिथे मात्र आपण खूपच कमी पडतो आहोत. नौदलप्रमुखांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये २०५० पर्यंत भारतातही चीनच्या तोडीस तोड नौदल असेल असे वक्तव्य केले. अद्याप बराच काळ आहे हे वास्तव आहे. तोपर्यंत चीनही खूप पुढे गेलेले असेल हेही लक्षात ठेवावे लागेल आणि अर्धसत्याने सध्या बचाव होणार असला तरी ते चिंताजनक अर्धसत्यच ठरणार आहे, याचेही भान ठेवावेच लागेल!