15 December 2017

News Flash

विराट प्रश्नमालिका!

‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका सोमवारी समारंभपूर्वक निवृत्त झाली.

विनायक परब | Updated: March 10, 2017 11:12 AM

तब्बल ५९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेसोबत अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित करत ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका सोमवारी समारंभपूर्वक निवृत्त झाली. जगात सर्वाधिक काळ वापरली गेलेली विमानवाहू युद्धनौका म्हणून ती नेहमीच चर्चेत राहील. पाच लाख ८८ हजार २८७ सागरी मैल म्हणजेच तब्बल १० लाख ९४ हजार २१५ किलोमीटर्सचा प्रवास ‘विराट’ने केला. फ्लाइंग डेकवरून लढाऊ विमानांनी सुमारे २२ हजार ६२२ तासांचे उड्डाण केल्याची ऐतिहासिक नोंदही ‘आयएनएस विराट’च्याच नावावर आहे. १९८७ च्या आधी ब्रिटनच्या शाही नौदलात ‘एचएमएस हर्मिस’ म्हणून कार्यरत या नौकेचे नेतृत्त्व त्यावेळेस १३ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केले होते. तर १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाल्यापासून २२ अधिकाऱ्यांना ‘आयएनएस विराट’चे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. त्यातील पाच अधिकारी नंतर भारतीय नौदलाचे प्रमुखही झाले. एवढे जबरदस्त भाग्य इतर कोणत्याही युद्धनौकेला जगात लाभलेले नाही. निवृत्त होत असताना विक्रमांची एक ‘विराट यादी’च तिच्या नावावर आहे. तशीच तिच्या निवृत्तीनंतर प्राप्त परिस्थितीत एक विराट प्रश्नमालिकाही आता भारतीय नौदलाच्या मागे आहे. यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ‘विराट’ नंतर काय?

भारताला लाभलेल्या मोठय़ा समुद्र किनाऱ्याच्या रक्षणार्थ खरेतर आता तीन विमानवाहू युद्धनौकांची गरज आहे. दोन हजार सालानंतर म्हणजेच एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारतीय उपखंड, आशिया आणि आग्नेय आशियामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जगाचा आकर्षणिबदू पहिल्या महायुद्धात युरोप, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका- रशिया संबंध असे करत सोविएत रशियाच्या विघटनानंतर अमेरिके जवळ होता तो आता भारत- चीन या दोन देशांच्या दिशेने सरकला आहे. भविष्यात किमान ५० वर्षे तो याच देशांच्या आजूबाजूस असणार आहे. या दोन देशांच्या अर्थव्यवस्था जगावर परिणाम करणाऱ्या असतील आणि या दोन देशांमधील ताणतणावाचा परिणाम जगावर होणार आहे, हे आता जगानेही मान्य केले आहे.

इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून रेशीम मार्गाच्या माध्यमातून तत्कालीन जागतिक अर्थव्यवस्थेवर आपली मुद्रा उमटवणारे हे दोन्ही देश आता पुन्हा एकदा त्याच व्यापारी मार्गाचा अवलंब करत २१ व्या शतकामध्ये प्रबळ अर्थसत्ता होऊ पाहात आहेत. त्यासाठी त्यांना गरज असणार आहे ती सागरावर राज्य करण्याची किंवा सागर आपल्या ताब्यात ठेवण्याची. खरे तर ‘आयएनएस विराट’च्या कारकिर्दीतून आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही होते. ‘विराट’चे ब्रीदवाक्य होते, जलमेव यस्य बलमेव तस्य. म्हणजेच ज्याचे सागरावर राज्य तोच खरा बलशाली. २१ व्या शतकातही ते तेवढेच खरे आहे. जलमार्गाने होणारा व्यापार हा कमीतकमी खर्चाचा असतो. म्हणून जगातील प्रबळ देश जलमार्गांचाच सर्वाधिक वापर करतात. त्यासाठी त्यांना सुरक्षित जलमार्ग आवश्यक असतात, ते पुरविण्याचे म्हणजे जलसुरक्षेचे काम त्या त्या देशाच्या नौदलांचे असते.

सध्या चीनच्या वाढलेल्या कुरघोडींमुळे हिंदूी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या भारताच्या तिन्ही बाजू सतत डोळ्यात तेल घालून राखाव्या लागणार आहेत. म्हणूनच यापैकी प्रत्येक ठिकाणी एक विमानवाहू युद्धनौका असणे आपल्यासाठी आवश्यक होते. सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आपल्याकडे आणि तिचे बलाबल आजवर म्हणावे तसे जोखलेले नाही. मुळात विमानवाहू युद्धनौका असणे व चालविणे यासाठी विशिष्ट कौशल्याची गरज लागते. ते कौशल्य भारतीय नौदलाकडे आहे. पण कौशल्य असून उपयोग नसतो तर ते सातत्याने परजावेही लागते. ते परजण्यासाठी सध्या आपल्याकडे केवळ एकमेव पर्याय उपलब्ध आहे तो ‘आयएनएस विक्रमादित्य’चा. सोमवारी ‘विराट’च्या निवृत्तीच्या वेळेस विमानवाहू युद्धनौका असलेली नवीन ‘विक्रांत’ नौदलात केव्हा दाखल होणार या प्रश्नाला नौदल प्रमुखांनी केवळ २०१८ किंवा २०१९ असे मोघम उत्तर दिले. त्यांच्या उत्तरातही नेमकेपणा नव्हता. याचाच अर्थ ‘केव्हा’ याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नाही. त्या उलट विमानवाहू युद्धनौका गरजेच्या आहेत, याची जाणीव झाल्यानंतर चीनच्या नौदलाने प्रथम विमानवाहू युद्धनौका बांधण्यास घेतली. तिचे काम वेळेत पूर्णही केले. ती लिओनिंग आता चीनच्या नौदलात दाखलही झाली आहे. दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम वेगात सुरू आहे. तोपर्यंत त्यावर असलेल्या नौसैनिकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी रशियाशी उत्तम संबंध प्रस्थापित करून एक विमानवाहू युद्धनौका भाडय़ावर घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता युद्धनौकांच्या बांधकामात व त्यावर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानातही वेगात बदल होत आहेत. हे बदलही चीनचे नौदल वेगात आत्मसात करते आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या विमानवाहू युद्धनौका या सपाट पृष्ठभाग असलेल्या असणार आहेत. युद्धनौकांच्या डिझाईनमध्ये त्यांनी मोठा बदल घडवून आणला आहे.

पूर्वी विमानवाहू युद्धनौकांवर लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी एक स्की जंप असलेला उंचवटा असायचा. आता नव्या लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान बदलल्याने तो स्की जंपचा भाग बाद झाला आहे. त्यामुळेच सपाट पृष्ठभागावरून विमाने वेगात उड्डाण करतात. यापुढील सर्व विमानवाहू युद्धनौका याच प्रकारातील असतील असे चीनने जाहीरही केले. ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही भारतीय युद्धनौका असली तरी ‘अ‍ॅडमिरल गोश्र्काव्ह’  आपण रशियाकडून घेतली आणि त्यानंतर तिचे नामकरण ‘विक्रमादित्य’ केले. त्यात बदल आपण केलेले असले तरी ती भारतीय बनावटीची नाही. भारतीय बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची चर्चा आपण गेली २० वर्षे करतोय आणि ती नेमकी केव्हा दाखल होणार याचे उत्तर नौदलप्रमुखही देऊ शकत नाहीत ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

पलीकडच्या बाजूस गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदलामध्ये होणाऱ्या दुर्घटनांमध्ये, अपघातांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. ‘आयएनएस बेतवा’ हे त्याचे सर्वात अलीकडचे उदाहरण आहे. ‘बेतवा’ पुन्हा एकदा तरंगण्याच्या स्थितीत आल्यानंतर तिची छायाचित्रे वितरित करून ‘बघा, कशी आम्ही तिला सरळ केली’ अशा आविर्भावात भारतीय नौदलाने प्रसिद्धीपत्रकही जारी करून स्वतचीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला खरा. पण आता तिच्या डागडुजीवर काही कोटी विनाकारण खर्च होणार आहेत. मुळात अपघात सातत्याने होणे ही नामुष्की आहे.

पाणबुडय़ांच्या बाबतीत तर भारतीय नौदलाची अवस्था हलाखीची म्हणावी अशीच आहे. कारण सुमारे ७५ टक्के पाणबुडय़ांचे आयुष्यमान संपलेले आहे. साधारणपणे एका पाणबुडीचे आयुष्यमान १५ वर्षांचे असते ते वाढवून आपण त्यांच्या वापर करत आहोत. ‘सिंधुरक्षक’मधील स्फोट व त्यानंतरची जलसमाधी यामुळे झालेली प्रत्यक्ष व जागतिक स्तरावरील आपल्या प्रतिमेची हानी भरून येणारी नाही. त्यानंतरही पाणबुडय़ांवरील अपघात व दुर्घटना थांबलेल्या नाहीत. आता किमान थोडे वेगाने रेटल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या प्रयत्नांनंतर स्कॉर्पिन पाणबुडय़ांपैकी दोघांचे जलावतरण करण्यात आपल्याला यश आले. मात्र ते केवळ जलावतरण आहे. अद्याप त्यावर शस्त्रसंभार बसवून त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्यांतून तावून सुलाखून बाहेर पडण्यास त्यांना किमान दोन वर्षांचा वेळ लागणे अपेक्षित आहे. सागरी युद्धात व पहाऱ्यामध्ये पाणबुडीला अनन्यसाधारण महत्त्व असते. आता एकच विमानवाहू युद्धनौका आणि क्षीण असलेले पाणबुडीदळ अशी भारतीय नौदलाची अवस्था आहे.

आपल्या नौदलातील अधिकाऱ्यांच्या कौशल्याबद्दल मात्र शंका घेण्याचे फारसे कारण नाही. मात्र कौशल्येदेखील सतत परजावी लागतात. ‘विराट’वरील प्रशिक्षित अधिकाऱ्यांची कौशल्ये नवीन ‘विक्रांत’ दाखल होईपर्यंत कायम राखण्याचे आव्हानही असेल. पाणबुडय़ांच्या संदर्भात तर महत्त्वपूर्ण निर्णय वेगाने घेत काम करावे लागणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात काळानुसार बदलण्याचा आपला वेगही राखावा लागणार आहे. युद्धनौका किंवा पाणबुडय़ांच्या बांधणीच्या संदर्भात ठरलेल्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातील हे पाहावेच लागेल. कारण आता पूर्वीसारखी म्हणजे २००० सालापूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही की, केवळ अरबी समुद्रातच लक्ष ठेवावे लागते आहे. आता सर्वत्र सारखीच दक्षता गरजेची आहे. शिवाय जागतिक महासत्ता व्हायचे तर जगभरातील समुद्रामध्ये आपल्याला आपले बल दाखवावे लागेल. त्यासाठी हाती पुरेशा युद्धनौका व पाणबुडय़ा गरजेच्या आहेत. परिस्थिती मात्र तेवढी दिलासादायक नाही. त्यामुळे ‘विराट’च्या निवृत्तीनंतर एक ‘विराट प्रश्नमालिका’ही भारतीय नौदलाला सतावत राहणार आहे. ही प्रश्नमालिका आपण किती वेगात व नेमकेपणाने सोडवतो यावर आपले भविष्य आणि भवितव्य अवलंबून असणार आहे!
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com

First Published on March 10, 2017 1:11 am

Web Title: ins viraat decommissioned