हजारो वर्षांच्या प्रवासातील उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवी आयुष्याशी जोडल्या गेलेल्या सांस्कृतिक स्मृतींचे जतन थेट वैज्ञानिक मार्गाने आपल्या डीएनएमध्ये होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरूच आहे. त्यामुळेच माणूस म्हणून या भूतलावर आपण येतो, त्याच वेळेस ते सारे संचित आपल्या डीएनएमध्ये घेऊनच आपला जन्म होतो, मग तो या भूतलावरील कोणत्याही खंडातील असो. सण, उत्सव आणि परंपरा हे त्याच डीएनएमधील संचित होय.

मानववंशशास्त्र असे सांगते की, उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यात माणूस शेती करू लागला त्या वेळेस दोन महत्त्वाच्या घटकांमुळे सण-उत्सवांना सुरुवात होऊन त्याची परंपरा विकसित झाली. शेतीच्या शोधामुळे त्याला अन्नाची शाश्वती लाभली आणि प्रथमत: वेळ मिळाला. पण त्याच वेळेस शेतीमध्ये सुरुवातीच्या काळात शब्दश: ढोर मेहनतही होती. मग अन्नधान्याचे उत्पादन वाढणे किंवा कमी होणे याचा अनुक्रमे आनंद किंवा दु:ख असे होणारे परिणामही लक्षात आले आणि या आनंद-दु:खाच्या चक्रामध्येच त्याला सण-उत्सव गवसले. त्याचे कारण मानसशास्त्राशी संबंधित आहे. माणूस हा मूलत: निराशावादी नव्हे तर आनंदी प्राणी आहे. हा आनंद त्याला निराशेला हसत सामोरे जाण्याचे बळ प्राप्त करून देतो, हे त्याला जाणवले. त्यातूनच साजरे करण्याची परंपरा सुरू झाली. म्हणूनच जगातील सर्वच खंडांमध्ये सर्वात प्राचीन सर्वच सण-उत्सव- परंपरा या शेतीशीच निगडित आहेत.

आपल्याकडे श्रावणापासून सुरू होणारे सारे सण अर्थव्यवस्थेचा, पर्यायाने देशाचा प्राण असलेल्या, मान्सूनशी संबंधित आहेत. कारण देशातील शेती प्रामुख्याने त्यावरच अवलंबून आहे. दसरा हा तर उत्पादन घेतल्यानंतरचा सर्वात मोठा सण. आता आपण त्या शेतीच्या शोधापासून हजारो वर्षे पुढे आलोय. पण डीएनएमधील ते सांस्कृतिक संचित कायम आहे आणि आपण दसरा साजरा करतोच आहोत. त्याचे रूप काहीसे बदलते आहे एवढेच.

आजही झेंडूच्या फुलांच्या माळा घराघरांवर लागतातच. पण मग आपण या झेंडूचा शोध केव्हा घेणार? एवढा झेंडू येतो कुठून? त्याचे अर्थशास्त्र नेमके काय आहे? त्याचा शोध केव्हा घेणार? असे प्रश्न ‘लोकप्रभा’ला पडले. नावीन्याच्या शोधात असलेल्या ‘लोकप्रभा’ने म्हणूनच आपल्या सजग वाचकांसाठी यंदा झेंडूचा नजराणा विशेष रिपोर्ताजच्या माध्यमातून सादर केला आहे. गेल्या काही वर्षांत प्लास्टिकच्या झेंडूच्या माळा घरांवर दिसू लागल्या आहेत. हा रिपोर्ताज वाचून त्यांची संख्या कमी झाली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल. शिवाय प्राचीन मंदिरे आणि शिल्पकृतींमधील दागिन्यांवरील विशेष लेखही महत्त्वाचा ठरवा. तरुणाईच्या दागिन्यांच्या आकांक्षांचे वैविध्य टिपणारे लेखही सोबत आहेतच.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली मोठी वाढ ही मात्र हा शेतीप्रधान संस्कृतीतील सण साजरा करताना एक काळी किनार ठरली आहे. त्याची सल मनात निश्चितच आहे. बेरोजगारीही वाढतेय. वातावरण काहीसे निराशेच्या दिशेने असेलही, पण त्याच वेळेस त्या संचितातील आनंदी मानसिकतेचा मूलभूत गुणही लक्षात घेऊ या आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवत पुढे जात.. दसरा हसरा करू या.. कारण तोच निराशेला हसत सामोरे जाण्याचे बळ देणार आहे!!


विनायक परब
@vinayakparab, vinayak.parab@expressindia.com