विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

विदेश दौरे करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या भारतीय पर्यटकांना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे तंत्रज्ञानाच्या संदर्भातील आश्चर्यकारक गोष्टी सोडल्या तर समृद्ध इतिहास भारतीयांनाच लाभलेला आहे, याची होणारी जाणीव. मात्र ही जाणीव अभिमानास्पद नाही तर मन कुरतडणारी असते, कारण त्याच वेळेस या भारतीय पर्यटकांना हेही लक्षात येते की, इतिहासाचे म्हणून जे थोडेथोडके तुकडे उपलब्ध आहेत, ते विदेशात त्यांनी प्राणपणाने जपले आहेत. केवळ अभिमानाने जपले एवढेच नव्हे; तर त्यातून व्यावसायिक लाभ होईल, अशा पद्धतीने ते अर्थशास्त्रात बसवलेही आहेत.

अर्थात यासाठी मुळात आपल्याला त्या ऐतिहासिक किंवा वारसा लाभलेल्या गोष्टींचे महत्त्व पटावे लागते आणि दुसरे म्हणजे त्याची जपणूक किंवा मग व्यावसायिक वापर करताना नवोन्मेषणही दाखवावे लागते. हे सारे एकदा अर्थशास्त्राच्या चक्रात बांधले की, त्यानंतर पर्यटकांसोबतच पैशांचाही ओघ सुरू होतो. इतिहास- संस्कृती आणि पारंपरिक वारसा असलेल्या गोष्टी आपल्याकडे मुबलक  उपलब्ध आहेत. मात्र अखंड वानवा आहे ती कल्पनेची आणि नवोन्मेषणाची. त्याचमुळे भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’प्रमाणेच ‘आयएनएस विराट’ या कारगिल युद्धाच्या वेळेस महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचाही प्रवास आता भंगार गोदीच्या दिशेने सुरू झाला आहे. या कल्पनादारिद्रय़ाला काय म्हणावे?

भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘विक्रांत’विषयी भारतीयांच्या मनात अतिशय आदराची भावना होती. तिच्यावर नौदल संग्रहालय व्हावे अशी इच्छा तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही व्यक्त केली होती. त्यांच्याच पुढाकाराने तत्कालीन सेना-भाजपा सरकारने ‘विक्रांत’साठी पैशांची तरतूदही केली. राज्य सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २० वर्षांनंतर तिची रवानगी दारूखान्याच्या भंगार गोदामात करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय भारतीय नौदलाकडे नव्हता.

‘आयएनएस विराट’ ही जगातील सर्वाधिक वापर झालेली विमानवाहू युद्धनौका. कारगिल युद्धाच्या वेळेस बजावलेल्या कामगिरीबरोबरच आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल होईपर्यंत एकहाती भारतीय नौदलाचा किल्ला वयोमान उलटल्यानंतरही तिने लढवून धरला. आता किमान या युद्धनौकेवर तरी संग्रहालय व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यासाठी महाराष्ट्र आणि आंध्र या दोन्ही राज्यांचे प्रस्तावही आले. मात्र युद्धनौकेची पत सांभाळण्याची खात्री निर्विवादपणे कोणतेही राज्य नौदलाला देऊ शकले नाही. परिणामी आता १७ डिसेंबर रोजी ही युद्धनौका भंगारात जाईल.

नौदलाच्या सर्व युद्धनौका या सागरात कार्यरत असल्याने त्या कशा असतात, त्यावर नेमके काम कशा पद्धतीने केले जाते याविषयी सामान्यांच्या मनात प्रचंड आकर्षण आणि कुतूहल असते. ते शमविण्यासाठी युद्धनौकेवरील संग्रहालय हा चांगला पर्याय होता. महाराष्ट्र हे समृद्ध सागरी वारसा सांगणारे राज्य आहे. या राज्याने तरी याबाबत नवोन्मेषण दाखविणे अपेक्षित होते. आपल्याकडील ‘सातारा’ असे नाव असलेली एक प्रवासी बोट अनेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या किनारी सागरतळी गेली. ऑस्ट्रेलियाने तर त्याचेही भांडवल केले आणि आता सागरतळी जाऊन ‘सातारा’ पाहाता येते. याला म्हणतात नवोन्मेषण आणि आपल्याकडे आहे त्याला म्हणतात कल्पनादारिद्रय़!