दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीही गेले
अन् आता गौरी लंकेशही
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

नोटाबंदीने (काळा?)बाजार उठला
बेकारांचा लोंढा लोटला
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

ट्रम्प आले
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र सुटले
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

दुष्काळाचा फेरा सुटला
महापुराचे पाणी लोटले
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

गोरक्षणाच्या नावाखाली
निर्मम हत्या सुरूच आहेत
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

रोजच्या वादळात फडफडते आहे
जनसामान्यांची कोंडी सुरूच आहे
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे

राजकीय झगमगाट
फ्लॅशचा चमचमाट
क्षणभराचीच बात आहे
अखेरीस मंद दिव्याचीच साथ आहे
…मंद दिव्याची वात आजही तेवते आहे!
सर्वसामान्यांसाठी खरा आधार ठरलेल्या
‘पण’ लावून जळणाऱ्या ‘ती’च्या साक्षीनेच
दीपोत्सवाच्या शुभेच्छा!

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab