अवघ्या वयाच्या विशीमध्येच असाध्य मानल्या गेलेल्या मोटर न्युरॉन विकाराने शरीरावरच घाला घातल्यानंतरही धर्य, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खुमासदार विनोदबुद्धी या त्रिगुणांच्या अचाट मिलाफाच्या बळावर स्टीफन हॉकिंग नंतर तब्बल ५६ वर्षे जगले.  मृत्यूसमयी ते ७६ वर्षांचे होते.   हॉकिंग यांना गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राचे विलक्षण आकर्षण होते.  गणितातील प्रगतीमुळे या क्षेत्रामध्ये आमूलाग्र होत असलेले बदल कदाचित मानवी बुद्धिमत्तेलाच आव्हान देणारे ठरतील, असा इशारा त्यांनी दिला होता.  या तंत्रज्ञानामुळे कदाचित यंत्रेच यंत्रांशी वेगळ्या स्वतच्या अशा स्वतंत्र भाषेत बोलू लागतील आणि मग ती नेमका काय संवाद साधत आहेत हे न कळल्याने, त्यावर वेगळे संशोधन करण्याची गरज माणसाला भासेल, असे होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असा इशाराच हॉकिंग यांनी दिला होता. महत्त्वाचे म्हणजे हॉकिंग यांनी दिलेला हा इशारा प्रत्यक्षात येतो आहे की काय अशी शक्यता जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात सुरू असलेल्या काही प्रयोगांमध्ये दिसू लागल्यानंतर काही विख्यात कंपन्यांनी आपली गणिते पुन्हा एकदा तपासून पाहिली. तर काही कंपन्यांनी त्यातील काही प्रयोग थेट बंदच केले. हे सारे गेल्या वर्षी म्हणजे २०१७ साली घडले. (संदर्भ : २०१८ सालचा ‘लोकप्रभा’चा पहिला अंक) त्याचा अंदाज बराच आधी येणे ही हॉकिंग यांच्या दृष्टीची झेप होती.

२००१ साली मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान केंद्राच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्याशी संवाद साधणे हा आजवरचा पूर्णपणे आगळा असा अनुभव होता. आपले प्रश्न आणि त्यावर संगणकाधारित आवाजातून येणारी उत्तरे यामुळे ही नेहमीपेक्षा वेगळी मुलाखत होती. त्याची सुरुवात हॉकिंग यांनीच केली. ते म्हणाले, यात घाबरण्यासारखे काही नाही. आपण गप्पा मारू, थोडय़ा वेळाने सवय होईल. त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करू. भारतातील विज्ञान पत्रकारिता नेमकी काय, कशी हे समजून घेण्यात त्यांना खूप रस होता. वैज्ञानिक प्रश्नांच्या पहिल्या उत्तरातच ते म्हणाले, विज्ञानाची तर्ककठोरता आणि गणित याची कास माणसाने सोडली नाही,  तर घाबरण्यासारखे त्याच्या आयुष्यात काहीच नाही. पण तो धर्म नावाच्या गोष्टीला खूप घाबरतो आणि मग भीतीच्या कोषात गडप होतो.  विज्ञानाचे महत्त्व कळले की, त्याची भीती निघून जाईल.

वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेतच काम करत राहावे असे अनेक वैज्ञानिकांचे म्हणणे असते. म्हणजे समाजाशी त्यांचे काही नाते असलेच पाहिजे असे नाही.  जाणीवजागृती आदी करण्यात त्यांनी वेळ घालवावा, हे त्यांचे काम आहे का, याबाबत समाजात अनेक मतमतांतरे ऐकायला मिळतात. त्यासंदर्भातील प्रश्नावर ते उत्तरले होते, माणसाला समाजापासून वेगळे काढता येत नाही.  आता यात कुणी काय करायचे हा ज्याचात्याचा प्रश्न असू शकतो. मी माझ्यापुरते बोलेन. विश्वाची उत्पत्ती हा सर्वाच्याच कुतूहलाचा विषय आहे.  सर्वानाच पुंज सिद्धान्त कळतोच असे नाही आणि कळलाच पाहिजे असा आग्रहदेखील नाही. पण लोकांना उत्सुकता आहे.  त्यानिमित्ताने मी माझे संशोधन मांडले त्यावर जगभरात चर्चा झाली.  हे सारे सामान्यांना ठाऊक आहे.  अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम विकत घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. (थोडय़ा मिश्कीलपणे)  ते किती जणांनी प्रत्यक्षात वाचले असेल माहीत नाही. पण आता कृष्णविवर नावाची काही वेगळी गोष्ट आहे, हे त्यांना ठाऊक आहे. ते म्हणजे नेमके काय ते माहीत नसेलही.. पण लिखाण केले जाऊ शकते. ते लोकांपर्यंत पोहोचतेही.  अन्यथा कृष्णविवराचा सिद्धांत मांडणारा माझ्यासारखा वैज्ञानिक लोकांमध्ये एवढा परिचित नसता.

सर्वसाधारणपणे अनेक वैज्ञानिक त्यांच्या मुलाखतीत स्वत मांडलेल्या सिद्धांताचेच घोडे पुढे दामटतात. ते तेवढेच साहजिकही असते. पण हॉकिंग यांचे वेगळेपण म्हणजे अनेक प्रश्नांना उत्तरे देताना ते आपल्या सहकारी किंवा अगदी आपल्या सिद्धांताच्या बरोबर उलट दिशेने काम करणाऱ्या वैज्ञानिकांचाही उल्लेख आदराने करायचे.  त्या वैज्ञानिकांचे काम नेमके काय सुरू आहे ते सांगायचे.  ‘लोकसत्ता’च्या मुलाखतीत त्यांनी सहकारी वैज्ञानिक रॉजर पेनरोज यांच्या कामाचा उल्लेख केला. त्याचे महत्त्व समजावून सांगितले. ब्रायन मॅकनाम्रा कृष्णविवराबाबत त्या वेळेस जे संशोधन करत होते, त्याचाही सविस्तर उल्लेख हॉकिंग यांनी केला. विज्ञानामध्ये अनेक सिद्धांत येतात, नंतर त्यावर अधिक काम होते. काही त्रुटी समोर येतात. काही निष्कासित होतात. या प्रवासात विज्ञान प्रवाही असते. म्हणून ते टिकते आणि ते जगाच्या अंतापर्यंत राहणार, या मतावर ते ठाम होते. जे प्रवाही असते ते टिकते. धर्मही प्रवाही राहिला तर टिकतो. पण प्रवाही राहणे ही धर्मासाठी कठीण गोष्ट आहे आणि प्रवाही असणे हा विज्ञानाचा गाभा, म्हणून विज्ञान महत्त्वाचे- इति हॉकिंग.

अनेकदा मग विषय फिरून देवाच्या अस्तित्वाकडे यायचा.  काही मुलाखतींमध्ये त्यांनी ..तर देवाचे मनही आपल्याला वाचता येईल अशी विधाने केली होती. त्याबाबत विचारता ते म्हणाले होते, असे आपण म्हणतो याचा अर्थ आपण देवाचे अस्तित्व मान्य करतो असे होत नाही. तो केवळ एक शब्दप्रयोग आहे.  त्यातील गर्भितार्थच लक्षात घ्यायला हवा.

देवाचे अस्तित्व मानत नाही, मृत्यूलाही घाबरत नाही. करायच्या गोष्टी खूप आहेत.  भावनेपेक्षा विज्ञानाला मानता.  तर्ककठोर विचार करता आणि तसेच वागताही तरीही मग आयुष्यात काही करता येत नाहीए, असे वाटते का कधी?  त्या वेळेस या प्रश्नाच्या उत्तरात ते काही अतिगंभीर तेवढेच तर्ककठोर उत्तर देतील, असे वाटले होते. पण त्यांचे उत्तर अगदीच खुमासदार आणि त्यांच्यातील विनोदबुद्धीची चुणूक देणारे होते.  ते म्हणाले, असं आहे की, वाटतं खरं की आपण गुमनाम होऊन हिंडावं. पण आता जवळपास कुठेही जगभरात गेलो की, सेलिब्रिटींसारखं लोक ओळखतात. त्यामुळे खरं तर काळा गॉगल चढवावा, विग घालावा आणि फिरावं असंही वाटतं.. पण या व्हीलचेअरचं काय करणार?  किंचित थांबत म्हणाले.. आपण विनोदी नसतो तर आयुष्य फारच गंभीर असतं, असं मला नेहमीच वाटतं.  पण खरंच मूळ प्रश्नाला उत्तर द्यायचं तर गेली ५० हून अधिक वर्षे मी मृत्यूच्याच छायेत एका अर्थाने जगतो आहे. पण मृत्यूला मी घाबरत नाही, कारण मला घाईघाईत मरायचेही नाही.

अखेरीस वेळ संपत आल्याचे लक्षात येताच स्वतच म्हणाले,  काही वेळा पूर्वी देवाच्या अस्तित्वाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्धवटच राहिले.  ते पूर्ण करतो,  विश्वउत्पत्तीवर केलेल्या संशोधनानंतर हे स्पष्टच आहे की,  देव अस्तित्वात नाही.  त्यामुळे साहजिकच जवळपास सर्वच धर्माना वाटते तसे स्वर्ग आणि नरकही अस्तित्वात नाहीत. अर्थात पृथ्वीचे स्वर्ग किंवा नरक करायचे किंवा नाही ते मात्र आपल्या म्हणजे माणसाच्या हातात आहे. सद्य:परिस्थितीत पर्यावरणाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा!

ज्याला आपण ‘काळाचे भान’ म्हणतो, ते हेच तर नव्हे, असे मुलाखतीनंतर सहज वाटून गेले.

दुर्दम्य इच्छाशक्ती, धर्य आणि खुमासदार विनोदबुद्धी लाभलेल्या या विश्ववैज्ञानिकास ‘लोकप्रभा’ची आदरांजली!


विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com