20 February 2019

News Flash

विचारांचं सोनं!

गेल्याच आठवडय़ात आदिशक्तीचं रूप असलेल्या महिलांना सक्षम करणारे बलदायी असे निवाडे सर्वोच्च न्यायालयाने दिले.

(संग्रहित छायाचित्र)

विनायक परब –  @vinayakparab , vinayak.parab@expressindia.com

आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे. सालाबादप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दिवशी सोनंही लुटलं जाईल. शिलंगण किंवा सीमोल्लंघन आपण करूही, पण ते नेमकं कशाचं असणार? आपण केवळ एकमेकांना आपटय़ाची पानं देण्यात धन्यता मानणार का? आणि पर्यावरण हा संवेदनशील विषय ठरत असताना शेकडोंच्या संख्येने आपटय़ाची पानं खुडून त्या झाडावरच संक्रांत आणणार का?

सध्या भारतीय समाजामध्ये एकाच वेळेस खूप काही सुरू आहे. गेल्याच आठवडय़ात आदिशक्तीचं रूप असलेल्या महिलांना सक्षम करणारे बलदायी असे निवाडे सर्वोच्च न्यायालयाने दिले. मंदिरांची गर्भगृहे त्यांच्यासाठी खुली केली. व्यभिचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी समसमान अधिकार देऊन समान न्यायतत्त्व लागू केले; पण त्याच आठवडय़ात प्रसिद्ध कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेच्या निमित्ताने वादाचे मोहोळ उभे राहिले. त्यानिमित्ताने भारतीय समाजाच्या विविध स्तरांमध्ये असलेल्या जातपात, सामाजिक-आर्थिक विषमता आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या राजकारणाचे सारे स्तरही उघडे झाले. परिपक्व समाजाच्या दिशेने अद्याप बराच प्रवास बाकी आहे, हेही त्यानिमित्ताने पुरते स्पष्ट झाले.

शब्द असतील किंवा एखादा विचार, त्यालाही दोन बाजू असतात आणि त्या एकाच वेळेस चूक किंवा बरोबरही असू शकतात, याचे आपले भानच आता सुटत चालले आहे किंवा मग आपल्याला ते मान्य नाही. भावना दुखावणे  आणि त्याविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणेही आता नेहमीचे झाले आहे. कधी तरी ही कोंडी फुटायलाच हवी. एम. एफ. हुसेनचे चित्र असो किंवा मग मनवर यांची कविता.. अन्यथा असे वाद होतच राहणार आणि त्यावर राजकारणही तेवढेच टोकाचे होत राहणार. अशा प्रसंगी कधीतरी कुणीतरी जबाबदारी घेऊन समाजाला काही पावले पुढे नेण्याचे काम तरी करायला हवे. प्रत्येक कलावंत किंवा साहित्यिकाचे स्वत:चे असे प्रतिमा किंवा रूपकांचे शास्त्र असते. तो कलावंत ज्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीतून येतो, घडतो त्याच्याशी ते थेट संबंधित असते. एक तर ते कलावंताने समजावून सांगावे लागते किंवा मग विचारी वर्गाने. पूर्वी कलावंत आणि रसिक किंवा सामान्यजनांमध्ये ही भूमिका पार पाडणारा एक विचारी वर्ग होता. विद्यमान सामाजिक-राजकीय संवेदनशील परिस्थितीमध्ये या वर्गाने मूग गिळून गप्प बसणेच पसंत केले आहे. या वर्गाचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे आहे तितकेच या वर्गानेही आपला समाज वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागलेला आहे, त्यामुळे प्रश्न असणारच हेही लक्षात घेतले पाहिजे. या दोघांपैकी कुणीही टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. अन्यथा एक गट आपल्या मूळ संवेदनशील विषयांबाबत बोलत राहणार आणि दुसरा गट कायमच विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करत राहणार.. आणि मग बाविसावे शतक उजाडले तरी आपण आहोत त्याच ठिकाणी राहणार. आपल्या वैचारिक स्थितीमध्ये कोणताही फरक पडलेला नसेल. शरीराने बाविसाव्या शतकात आणि मनाने आदिम किंवा प्रागतिहासिक किंवा इतिहासपूर्व कालखंडात अशी शोचनीय अवस्था असेल. म्हणून किमान काही नाही तर या खेपेस विचारांचं सोनं लुटू या!

दुसऱ्याची मते समजून घेऊ, इतरांच्या मताचा आदर करायला शिकू या आणि नवीन मते, नवविचारही समजावून घेऊ या.

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:16 am

Web Title: lokprabha editorial on thoughts of gold