विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

फारशी गंगाजळी नसलेल्या एका व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या मुलाने त्या व्यक्तीच्या मित्रांचा पाणउतारा केला आणि सांगितले की, तुमच्यासारखे ज्ञानी मित्र असतानाही माझ्या बापाला हे कळले नाही की, पैसे महत्त्वाचे असतात. माझा बाप असाच मेला, काहीही मागे न ठेवता. त्या वेळेस एक मित्र म्हणाला की, अरे, तुझ्या बापाने धडधाकट शरीर दिले, ते धडधाकट राहील याची काळजी घेतली. अवयव विकलेस तर लाखो मिळतील; पण लाख खर्च करूनही जे मिळत नाही ते धडधाकट शरीर असते. ते असे आहे की, त्याच्या बळावर जिद्द ठेवून जगात काहीही करण्याची क्षमता राखतोस. शरीर तंदुरुस्त असेल तरच सर्व गोष्टी करता येतात आणि सर्व बाबींचा उपभोगही घेता येतो. बापाने ते धडधाकट राहील याची काळजी घेतली हे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.. या संवादाने त्या मुलाचे डोळे उघडले; पण तंदुरुस्तीचे महत्त्व फारसे नसलेली पिढी कदाचित सध्या आपल्या आजूबाजूलाच वावरते आहे. हे अशक्त वास्तव दोनच दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेल्या कुटुंब सर्वेक्षण अहवालाने अधोरेखित केले आहे. यातील सर्वात गंभीर बाब आहे ती पंडुरोग, अर्थात अ‍ॅनिमियाबद्दलची.

तीसेक वर्षांपूर्वी महिलांमधील पंडुरोगाबद्दल खूप चर्चा झाली आणि त्यानंतर त्या संदर्भातील जाणीवजागृती करणाऱ्या मोहिमाही झाल्या. १०-१५ वर्षांपूर्वी लहान मुलांमधील पंडुरोगाकडे लक्ष वेधण्यात आले. आता यंदाच्या अहवालात तर पुरुषांमधील पंडुरोग वाढतो आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. हे प्रमाण शहर व ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी वाढते आहे. आता तर संपूर्ण कुटुंबच पंडुरोगग्रस्त असण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येते आहे, हे महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्यासाठी चिंताजनक असेच आहे.

७०-८० च्या दशकातील अ‍ॅनिमियाचे चित्र तरीही समजण्यासारखे होते. गरिबी हे देशांचे व्यवच्छेदक लक्षण होते. मात्र जागतिकीकरणानंतर सुबत्ता आली. हरितक्रांतीने धनधान्यही विपुल झाले. पैसेही हाती खुळखुळू लागले. असे असतानाही कुटुंबच पंडुरोगग्रस्त होत असेल तर मुळातूनच काही तरी चुकते आहे. पैशाला अधिक महत्त्व देताना आपण पोषणमूल्ये असलेल्या अन्नाचे महत्त्व विसरत चाललो आहोत. एक वास्तव जंकफूडचेही आहेच. त्याचे प्रमाण खूप मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. जंकफूडची सांगड सुबत्तेशी, स्टेटस सिम्बॉलशी घालणे हे मुळात चुकीचे आहे. बर्गर म्हणजे आधुनिक आणि भाकरी म्हणजे गरिबी किंवा गावंढळ ही मानसिकताही बदलायला हवी. आपण आपल्या मूळ अन्नापासून दूर जातो आहोत. प्रख्यात वैद्य प. य. वैद्य खडीवाले म्हणायचे की, ज्वारी-बाजरी हे आपले मूळ अन्न. ते कायम राखले असते तर महाराष्ट्रातील विकारग्रस्तांची संख्या कमी झाली असती.

गरिबीने अद्याप अनेकांची पाठ सोडलेली नसली तरी हेही लक्षात घ्यायला हवे की, कमी पैशांतही गूळ-पोह्य़ासारखे पोषक अन्न उपलब्ध होते. मात्र त्यासाठी पोषक अन्नाचे महत्त्व आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. पोषक अन्न पोटात गेले तर परिणामी औषधे कमी घ्यावी लागतील. पूर्वी शहरात जंकफूडचे प्रमाण अधिक होते आणि ग्रामीण भागांत पोषक आहार; पण यंदाच्या अहवालाचा पहिला भाग सांगतो की, ग्रामीण भागातील पंडुरोगाचे प्रमाण शहरांपेक्षा वाढते आहे. हे तर बहुतांश देशवासी ग्रामीण असलेल्या भारतासाठी निश्चितच चांगले नाही.

आधुनिक मानसशास्त्र असे सांगते की, सक्षम मन हे सुदृढ शरीरामध्ये असते आणि आपल्या यशात आपल्या निरोगी मानसिकतेचा मोठा वाटा असतो. महासत्तेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या आपल्याला पंडुरोगग्रस्त वास्तव निश्चितच परवडणारे नाही. त्यामुळे फाइव्हजीकडे लक्ष देताना पोषणमूल्यांचा पारंपरिक वारसाही जपावाच लागेल.