22 February 2020

News Flash

ओल्या दुष्काळात तेरावा महिना

पाऊस थांबल्यानंतरही साचून राहिलेले पाणी जाता जात नाहीए.

(संग्रहित छायाचित्र)

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
आधी पाऊसपाणी नाही म्हणून ओरड आणि आता चहूबाजूंनी केवळ आणि केवळ पाणीच पाणी आहे म्हणून जीव वाचविण्याची तडफड अशी महाराष्ट्राची कोंडी सध्या झालेली दिसते. मात्र याला सलग तासन्तास कोसळणारा पाऊस कारण नाही; तर कोल्हापूर, सांगली असो किंवा मग कोकण अथवा खान्देश, सर्वत्र आलेला पूर किंवा अनेक ठिकाणी आलेला महापूर याला केवळ आणि केवळ अर्निबध पद्धतीने पर्यावरणावर घातला गेलेला घालाच जबाबदार आहे, असे एकमेव सत्य आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ लक्षात आले आहे. शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नादात आपण केव्हा भकासपणाच्या दिशेने प्रवास सुरू केला हे लक्षातच आले नाही. नाही म्हणायला इशाऱ्याच्या घंटा वाजविण्याचे काम पर्यावरणप्रेमी करत होते. पण तो इशारा ऐकण्यासाठी मदमस्त राजकारण्यांचेच नव्हे तर जनसामान्यांचेही कान तयार नव्हते.

राज्यातील परिस्थिती सध्या खरोखरच भीषण आहे. राज्यातील अडीचशेहून अधिक रस्ते, शंभरहून अधिक पूल, १० जिल्ह्य़ांतील ७० तालुके आणि सुमारे १४०० गावे यंदाच्या पावसात कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि खान्देशामध्ये पाण्याखाली गेली. कधी नव्हे ते मुंबई-पुणे रेल्वेमार्गही गेले १० दिवस बंद आहे. सांगली-कोल्हापूरला जोडणारे मार्ग-महामार्ग सारे काही पाण्याखालीच आहे. एरवीही यातील बहुसंख्य गावांनी १९८९ आणि त्यानंतर २००५ साली तुफान पाऊस आणि त्याचबरोबर महापूरदेखील अनुभवला होता. पण यंदाचा फरक असा की, पाऊस थांबल्यानंतरही साचून राहिलेले पाणी जाता जात नाहीए. कारण ते जाण्याच्या मार्गात मानवनिर्मित अनंत अडथळे आहेत. पाण्याचा निचरा होण्याचे मार्गही आपण बंद करून ठेवले आहेत. २००५च्या महापुरामध्ये पावसाचा वेग कमी झाल्यानंतर आलेल्या पाण्याचा निचरा वेगात झाला होता. मात्र यंदा सर्वच ठिकाणी पाऊस थांबल्यानंतरही महापुराच्या पाण्याचा निचरा होण्यात अनंत अडचणी आहेत. परिणामी रोगराई मोठय़ा वेगात पसरण्याची भीती आहे.

दुसरीकडे या महापुरासाठी अनेक कारणे सांगितली आणि शोधलीही जात आहेत, त्यातील काही राजकीयही आहेत. मग कुणी अलमट्टी धरणातून मोठय़ा प्रमाणावर न केलेल्या विसर्गाचे कारण पुढे करतो आहे तर कुणी इतर कारणे देत आहे. मात्र एका गोष्टीकडे जवळपास सर्वानीच दुर्लक्ष केले आहे, ते म्हणजे यंदा घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने २५ जुलैच्या सुमारासच व्यक्त केली होती. त्याच सुमारास तुफान पावसाला सुरुवातही झाली होती. मात्र तो इशारा फारसा कुणी गांभीर्याने घेतला नाही. अन्यथा सांगली-कोल्हापूर परिसर जलमय होण्याची वेळ आलीच नसती. घाटमाथ्यावर पाऊस जोरदार झाला की, तिथे उगम पावणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहतात हे सांगण्यासाठी क्रमिक पुस्तकांचीही गरज नाही. मात्र ते शासनदरबारी लक्षात येण्यास ३ ऑगस्ट उजाडावा लागला हे वास्तव महापुराचे मुख्य कारण अधोरेखित करण्यास पुरेसे आहे. वेळोवेळी मिळालेल्या इशाऱ्यांकडे शासकीय पातळीवर झालेले दुर्लक्ष हे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा एवढे गंभीर आहे. यात खूप मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागले आहे. एरवी आपण जीवितहानी म्हणतो त्या वेळेस केवळ मृतांमध्ये माणसांचीच संख्या गृहीत धरली जाते. यंदा पाळीव प्राण्यांची संख्याही खूप मोठी आहे. दुभती जनावरे सोडून देण्याची व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एकुणात काय तर आधीच मराठवाडय़ात दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था होती, त्यात आता उर्वरित महाराष्ट्रातही ओल्या दुष्काळात तेरावा महिना अशी भर पडली आहे!

First Published on August 16, 2019 1:08 am

Web Title: maharashtra flood 2019 worst situation
Next Stories
1 आव्हान
2 कोंडलेला श्वास!
3 भयसूचक