16 February 2019

News Flash

बॉसचा बिग ड्रामा

तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बहुधा कोरियापासूनच होणार की काय असे वाटू लागले होते.

सिंगापूरला झालेल्या बठकीत अमेरिका- उत्तर कोरिया अशी हातमिळवणी झाली

विनायक परब –  @vinayakparab य vinayak.parab@expressindia.com
उत्तर कोरियाने १९९० साली सर्वप्रथम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली, तिथून एक प्रकारे शस्त्रस्पध्रेला सुरुवातच झाली. अर्थात त्या आधी सारे काही आलबेल नव्हतेच. ५२-५३ सालापासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामधून विस्तवही न जाण्यास सुरुवात झालेली होतीच. १९९४ साली मात्र दोन्ही कोरियांमधील भडका शमण्याची एक धूसर शक्यता निर्माण झाली. शस्त्रचाचण्या थांबविण्याची आणि अमेरिकेसोबत करार करण्याचीही तयारी उत्तर कोरियाने दर्शविली. त्यानंतर पुन्हा १९९९ साली त्यांनी अशीच तयारी दर्शविली. पण प्रत्यक्षात दोन्ही वेळेस काहीच झाले नाही.

लगेचच तीन वर्षांत उत्तर कोरियाने संपूर्ण जगालाच एकापाठोपाठ एक धक्के दिले. प्लुटोनियम रिप्रोसेसिंग आणि युरेनियम प्रक्रिया उत्तर कोरियाने सुरू केल्याचे जगाच्या लक्षात आले. हे दोन्ही उद्योग अण्वस्त्रांशी संबंधित होते हे काही वेगळे सांगण्याची गरज नव्हती. २००३ साली नि:शस्त्रीकरणाच्या करारातून उत्तर कोरियाने आपले अंग काढून घेतले आणि लगेचच २००४ साली जमिनीखाली पहिली अणुस्फोट चाचणी केली. त्यानंतर २००९ मध्ये दुसरी चाचणी केली.

उत्तर कोरियाचे विद्यमान अध्यक्ष किम जोंग उन यांनी वडिलांनंतर २०११ साली पदभार स्वीकारला. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वडील आणि ते स्वत: हे दोघेही हुकूमशहाच. वडिलांनी त्यांच्या काळात केवळ १६ शस्त्रचाचण्या घडवून आणल्या होत्या तर किमने तब्बल ८० चाचण्या अवघ्या सहा वर्षांत  अतिशय वेगात घडवून आणल्या. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बहुधा कोरियापासूनच होणार की काय असे वाटू लागले होते. २०१३ साली किम यांनी तिसरी, २०१६ साली चौथी-पाचवी तर २०१७ साली सातवी अणुस्फोट चाचणी घडवून आणली.

या साऱ्याचा राग अमेरिकेला न येता तर नवलच होते. त्यात भरीस भर म्हणून गेल्या वर्षी उत्तर कोरियाने दोन महत्त्वपूर्ण अशी आंतरखंडीय दुतर्फा मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. यातील एका क्षेपणास्त्राचा पल्ला कोरिया ते अलास्का तर दुसऱ्याचा कोरिया ते कॅलिफोíनया असा होता. त्यावर क्रोधावतार धारण करीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशाराच दिला की, जगाने आजवर कधीही पाहिलेली नाही अशी भीषण शस्त्रास्त्रबाजी आता पाहायला मिळेल. त्यावर कोरियाने उत्तर दिले, ‘पाहून घेऊ!’ त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा मल्लिनाथी केली की, किम म्हणजे रॉकेटवर बसून स्वत:च्याच आत्महत्येच्या मोहिमेवर निघालेला माणूस. आता ठिणगी पडणार असे वातावरण होते. त्याच वेळेस रशिया आणि चीन या उत्तर कोरियाच्या दोन्ही मित्रराष्ट्रांनी पुढाकार घेतला आणि दोघांनाही शांततेचे आवाहन केले.

२०१८ च्या सुरुवातीला मात्र वातावरणात अचानक मोठा बदल झाला. उत्तर कोरियातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धाचे निमित्त झाले, उत्तर कोरियाने शस्त्रे खाली ठेवण्याची तयारी दर्शविली. मार्चमध्ये प्रथमच दक्षिण कोरियाशी संवादही साधला. दक्षिण कोरियाचे अधिकारी उत्तरेत दाखल झाले. दोन्ही अध्यक्षांशी भेट होणार असे ठरलेही आणि त्या भेटीच्या एक आठवडा आधी किम यांनी २१ एप्रिल रोजी अण्वस्त्रमुक्ती जाहीर केली. जगासाठी हा सुखद धक्काच होता. ‘ट्रथ इज स्ट्रेंज दॅन द फिक्शन’ या वाक्प्रचाराचा अनुभव जगाला आला. त्याच वेळेस उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबतची ठरलेली भेट रद्द केल्याचे अमेरिकन अध्यक्षांनी जाहीर केले. पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. नंतर मात्र अमेरिकन अध्यक्षांनी परत कोलांटउडी घेतली (ज्यात ते माहीर आहेत) आणि गेल्याच आठवडय़ात ही भेट सिंगापुरी घडून आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूर येथील एअरबेसवर उतरल्या उतरल्या आता सारे काही चांगले होण्याची आशा ठेवण्यास हरकत नाही, या आशयाचे ट्वीट केले. त्याला भरपूर लाइक्स मिळाले. गेली कित्येक वष्रे संघर्षांचा पराकोटीचा सूर आळवणारे हे दोन्ही देश अशा प्रकारच्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपले म्हणून साऱ्या जगाचे लक्ष याकडे लागून राहिलेले होते. कुणी आगळीक करण्याचा प्रयत्न केलाच तर दुसऱ्याला संपविण्याची जाहीर भाषाही या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी गेल्या काही वर्षांत वेळोवेळी करून झाली होती. या पाश्र्वभूमीवर सिंगापूरला झालेल्या बठकीत अमेरिका- उत्तर कोरिया अशी हातमिळवणी झाली, प्रसारमाध्यमांमध्ये दोन्ही राष्ट्राध्यक्षांची छबी जगभर झळकली आणि ट्रम्प यांनी ‘ग्रेट’ या शब्दात या बठकीचे वर्णन केले.

मात्र जगाच्या दृष्टीने या भेटीत हाती काय लागले या प्रश्नावर उत्तर म्हटले तर ‘काहीच नाही’ असे  आहे. केवळ देखावाच होता तो, बिग बॉससारखा.  उत्तर कोरियाने आम्ही अण्वस्त्रमुक्ती करू एवढेच म्हटले आहे. ती कशी करणार, त्यासाठीची अंतिम मुदत काय यावर काहीच म्हटलेले नाही. त्या संदर्भातील कोणत्याही अधिक नोंदींचा समावेश दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी स्वाक्षरी केलेल्या दीड पानी कागदनोदींत नाही.

या विषयात रुची असणारे, अभ्यासक आणि परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित अधिकारी यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे उत्तर कोरियाच्या या म्हणण्यावर विश्वास कसा ठेवायचा? कारण यापूर्वी दिलेली कोणतीही आश्वासने त्यांनी पाळलेली नाहीत. १९९४ आणि त्यानंतर २००५ साली अंधूकशी आशा निर्माणही झाली होती; पण तीही तेव्हा निर्थकच ठरली. उत्तर कोरियाची अण्वस्त्रमुक्ती आजवर प्रत्यक्षात कधीच आलेली नाही. शिवाय या बठकीपूर्वी अमेरिकेने स्पष्ट केले होते की, अण्वस्त्रबंदी संपूर्ण, खातरजमा करता येण्याजोगी आणि त्यात नष्ट केलेल्या गोष्टींचा परत वापर केला जाणार नाही याची खात्री देणारी असली पाहिजे. तर आणि तरच अमेरिकेला ते मान्य असेल. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही पण तरीही अमेरिकेने र्निबध मागे घेणे वगळता खूप गोष्टी मान्य केल्या, हा धक्काच होता.

प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही तरीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा आविर्भाव बरेच काही हाती लागल्यासारखा होता, तसे त्यांनी भासवलेही. यापूर्वी ज्या ज्या वेळेस उत्तर कोरियाकडून चच्रेचा प्रस्ताव आला होता त्या त्या वेळेस दक्षिण कोरियामध्ये असलेले सन्य मागे घेणार नाही, या मुद्दय़ावर अमेरिका ठाम होती. हा मुद्दा अजेंडय़ावर असूच शकत नाही, अशी आजवर अमेरिकेची स्पष्ट आणि कठोर भूमिका राहिली आहे. हा मुद्दा अजेंडय़ावर येणारच नाही, याची काळजी यापूर्वी अमेरिकेने घेतली होती. सध्या अमेरिकेचे २८ हजार खडे सनिक दक्षिण कोरियाच्या भूमीवर तनात आहेत.  सिंगापूरच्या चच्रेत हाती काहीच आले नाही. तरीही अमेरिकेने आक्रमक असणार नाही असे सांगत उलटपक्षी उत्तर कोरियाच्या संदर्भात सुरक्षेची हमी देण्याचेही मान्य केले. सुरक्षेची हमी म्हणजे नेमके काय याबाबत अमेरिकेनेही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ट्रम्प यांचे सुरक्षेच्या हमीचे विधान हे आजवर त्यांचे पाठीराखे राहिलेल्या दक्षिण कोरिया आणि जपान या दोघांसाठीही तसे धक्कादायकच होते.

दक्षिण कोरियाला आजही असे वाटतेय की ५० किलोग्रॅम्स एवढे प्लुटोनियम उत्तर कोरिया राखून आहे, हा युद्धखेळ संपायला हवा. पूर्ण अण्वस्त्रबंदीची खात्री पटल्याशिवाय अमेरिका उत्तर कोरियावरील र्निबध उठविण्यास तयार नाही. जोपर्यंत हे होत नाही तोवर अमेरिकेने आपले सन्य मागे घेऊ नये असे दक्षिण कोरिया आणि जपान या दोघांनाही वाटते आहे. उत्तर कोरियाची विश्वासार्हता यावर तर मोठेच प्रश्नचिन्ह आहे. किमच्या हुकूमशाही राजवटीला विरोध करणारे सुमारे एक लाख २० हजार राजकीय कैदी किमच्या तुरुंगात आहेत. त्याने विरोधकांचे शिरकाण केले असून त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. आजही तो स्वत:ला अध्यक्ष म्हणवत असला तरी तो हुकूमशहाच आहे. पण मग आता असे काय घडले की, अचानक जगात राजकीय वातावरणबदल घडून आला?

तर किमला स्वत:च्याच देशात मोठय़ा विरोधाला सामोरे जावे लागते आहे. स्वत:चे स्थान बळकट करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याला आता चीन, रशिया पाठोपाठ अमेरिकेकडून राजमान्यता हवी आहे. म्हणूनच त्याच्या राजवटीला मान्यता देण्याची अट या अण्वस्त्रमुक्तीच्या घोषणेमागे आहे. त्याने त्याचे सत्तास्थान स्वदेशात व जगात बळकट होईल. उत्तर कोरिया सध्या चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. येणाऱ्या काळात हे अवलंबित्व त्याला कमी करायचे आहे त्यासाठी अमेरिकेने र्निबध उठविणे ही उत्तर कोरियाची गरज आहे. दक्षिण कोरियाला जोवर उत्तर कोरियाविषयी विश्वास निर्माण होत नाही तोवर अमेरिका सोबत हवी आहे, तशीच अमेरिकेची साथ जपानलाही हवी आहे. चीन हा जपान अमेरिकेचा शत्रू नाही पण थेट प्रतिस्पर्धी आहे. दक्षिण कोरियाला व्यापारउदिमासाठी हा परिसर शांत राहिलेला हवा आहे. चीनलाही अमेरिका दक्षिण कोरियात नको आहे, असे एकमेकांचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत. त्यामुळे सर्वाची गरज म्हणून हे सर्व देश अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या समेटात गुंतलेले आहेत.  हे सारे होत असताना आपले वर्चस्व चीनला याही घडामोडीत कायम राखायचे आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एअर चायनाच्या विमानाने सिंगापूरच्या या बठकीसाठी दाखल होतील हे चीनने पाहिले. पण एवढे सारे होऊन हाती काय आले. तर किम आणि ट्रम्प यांना आपापले महत्त्व वाढवून घेण्यात यश आले, भरपूर जागतिक प्रसिद्धी मिळाली आणि विश्वासार्हतेचा तर दोन्ही नेत्यांचा फारसा काही संबंधच नाही! त्यामुळे हे सारे पूर्वीच बेतून ठेवलेल्या बिग बॉसच्या ड्रामासारखे. खेळ बेतलेला, चाली ठरलेल्या, काय होणार हेही ठरलेलेच. भासवायचे मात्र असे की सारे काही उत्स्फूर्त!

First Published on June 22, 2018 1:06 am

Web Title: north korea kim jong un and america donald trump summit