18 February 2019

News Flash

पालथ्या घडय़ावर…

लोकशाही देशामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो संवाद.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाचा सारा भर होता तो राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती यावरच.

विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com
गेल्या आठवडय़ातील गुरुवारी संध्याकाळी देशभरातील अनेकांचे लक्ष माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाकडे लागून राहिले होते. अर्थात कारणही तसेच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारणे हे संघ आणि भाजपाला विरोध करणाऱ्या अनेकांना खटकले होते एवढेच नव्हे तर अमान्य असणारे होते. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या. मुखर्जीही आता संघ व्यासपीठावर का, असा खोचक प्रश्न विचारला गेला. अर्थात असा प्रश्न विचारणाऱ्यांना मुखर्जी कळलेच नाहीत हे उघड होते. पण या घटनेवर विचारवंतांच्या गटांनी विविध पद्धतीने तीव्रपणे व्यक्त होणे, संघ तसेच काँग्रेस या एरवी तशा विरोधी भूमिका असलेल्यांनीही तेवढय़ाच तीव्रतेने व्यक्त होणे ही देशाच्या राजकारणाची प्रत घसरल्याचेच लक्षण होते. ज्या सहिष्णुतेबद्दल गेली काही वर्षे देशामध्ये तीव्र मतभेद आहेत. ती सहिष्णुता खास करून वैचारिक सहिष्णुता आपण हरवल्याचेच ते द्योतक होते. अर्थात त्यामुळेच हेही तेवढेच साहजिक होते की, दोन्ही बाजूंची मंडळी हाताला काही लागते आहे का, याची चाचपणी करण्यासाठी तय्यार होऊन बसलेली होती. अर्थात गेली ५० हून अधिक वर्षे राजकारणात तेही भारतासारख्या बहुविध अशा देशांत व्यतीत करून राष्ट्रपतिपदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे केलेल्या मुखर्जी यांना या परिस्थितीची नक्कीच कल्पना असणार. त्यामुळेच त्यांचे भाषण हा राजकारण व समाजकारणासाठी एक महत्त्वाचा धडा होता.

मुखर्जी यांनी या भाषणात काय केले? त्यांनी खूप वेगळे असे काही सांगितले का? त्यांनी जे सांगितले ते आपल्याला म्हणजे श्रोत्यांना किंवा संघ परिवारातील मंडळी किंवा मग स्वयंसेवक यांना ठाऊक नव्हते का? तर त्यांनी जे सांगितले त्यात बराचसा भाग हा इतिहासाचाच होता. ज्या इतिहासाचा दाखला संघ परिवारातील मंडळी नेहमीच देत असतात त्या उज्ज्वल इतिहासाची उजळणीच स्वयंसेवकांना आवडेल अशा पद्धतीने त्यांनी केली. त्यामुळे त्याविरोधात कुणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मुखर्जी यांच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी यजमानांवर कुठेही थेट टीका केली नाही. उदाहरणे इतिहासातील तीच दिली जी उजवी विचारसरणी असलेल्यांना आवडतात पण त्यामागची सांगतानाची भूमिका आणि मांडणी मात्र वेगळी होती. भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी आपला रोख स्पष्ट केला होता. ते म्हणाले, राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती या एकमेकांत कशा गुंतलेल्या असतात त्याबद्दलची समज उकलण्याचा हा प्रयत्न आहे. या संकल्पनांची चर्चा स्वतंत्रपणे होऊच शकत नाही, असे सांगत त्यांनी सुरुवातीस राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती या तीन संकल्पनांची व्याख्या सांगितली. खरे तर राष्ट्रभक्ती एकच असली तरी प्रत्येकाची व्याख्या त्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार केली जाते. मुखर्जीचे कौशल्य इथे दिसले. त्यांनी या तिन्ही व्याख्यांमध्ये कोणतीही विचारसरणी डोकावू दिली नाही, शिवाय त्याच वेळेस जी भूमिका स्पष्टपणे मांडायची ती ते मांडून मोकळेही झाले. शिवाय तीही अशा पद्धतीने मांडली की, त्यात संघाने किंवा उजव्या विचारसरणीने नाकारावे, असे काहीही नव्हते.

व्यापारी रेशीम मार्ग तसेच मसाल्याचा जागतिक व्यापार इथपासून ते मेगास्थेनिस, फाहियान, ह्य़ुआन श्वांग, अशी बाहेरून आलेली मंडळी, ओदंतपुरी- तक्षशिला- नालंदा ही विद्यापीठे अशी तत्कालीन उज्ज्वल आणि त्याच वेळेस जागतिक अर्थात आजच्या भाषेत बोलायचे तर ग्लोबल राहिलेल्या भारताची गौरवशाली उदाहरणे दिली. बोलता बोलता ते सहज हेही बोलून गेले की, हिंदूू प्रथा-परंपरांचा प्रभाव घेत बौद्ध धर्म जगभरात पसरला. हे वाक्य किती जणांनी व्यवस्थित ऐकले ठाऊक नाही. पण हे महत्त्वाचे असे ऐतिहासिक विधान आहे. पुरातत्त्व, इतिहास आणि धर्म यांच्या अभ्यासकांना या वाक्याचे महत्त्व विशेष आहे. त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी संपूर्ण भाषणात तीन वेळा अधोरेखित केली ती म्हणजे भारत हा सम्मीलनाचा इतिहास असलेला देश आहे. त्यामुळे अनेक आक्रमक आले आणि सुरुवातीच्या काळात आक्रमक म्हणून आलेले ते इथल्या संस्कृतीमध्ये सम्मीलित झाले. सम्मीलित म्हणजे नेमके काय हे मुखर्जी विस्ताराने सांगत बसले नाहीत. कारण ही काही शाळा नव्हती. मात्र त्यांचे ते विधान ज्या पद्धतीने आले त्यातून त्या विधानाचा तिन्ही वेळेस असलेला रोख पुरता स्पष्ट होणारा होता. त्यांचा रोख गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वाढलेल्या धर्मभेदाकडे होता, हे वेगळे सांगण्याची काहीही गरज नव्हती. कसलेल्या राजकारण्याकडे हे कसब असावेच लागते. काठीचा जराही आवाज न करता किंवा थेट कुणाच्या पाठीवर त्याचा वळ न उठू देताही त्याला आपले म्हणणे जाणवून देणे हा मुखर्जी यांच्या कौशल्याचा भाग होता. वक्ता म्हणून आपण ज्या व्यासपीठावर जातो त्याचा मान राखत त्यांना मर्यादांची जाणीव करून देणे व आपले म्हणणे योग्य पद्धतीने ठामपणे मांडणे हा कसलेल्या वक्त्याचा गुण मुखर्जी यांनी दाखवून दिला.

मुखर्जी यांच्या भाषणाचा सारा भर होता तो राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती यावरच. ते करताना त्यांनी भारतीय राष्ट्र ही संकल्पना कशी युरोपियनांपेक्षा वेगळी आहे तेही स्पष्ट केले आणि सांगितले की, बहुविधता हेच इथले वैशिष्टय़ आहे, त्यामुळे एक देश, एक भाषा, एकच एक समान शत्रू हे युरोपियन तत्त्व इथे लागू होत नाही. शतकानुशतके बहुविधता इथे पोसली गेली आहे. त्याची पाळेमुळे घट्ट रोवलेली आहेत. ती उखडून फेकली जाऊ शकत नाही. ही पाळेमुळे अधिक घट्ट करण्याचेच काम लोकशाहीने आणि भारतीय राज्यघटनेने केले आहे. त्यामुळे या तिन्ही संकल्पनांचे परीक्षण हे राज्यघटनेच्या चौकटीतच करावे लागते. त्या वेळेस बहुविधता हे इथले सामथ्र्य आहे, असे लक्षात येईल अशी आठवण करून द्यायलाही मुखर्जी विसरले नाहीत.

भेरीघोष ते धम्मघोष असा प्रवास असलेला हा देश आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही देशाच्या एकतेला जोडणारी कडी आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता हा महत्त्वाचा भाग आहे, असे विश्लेषण मुखर्जी यांनी केले, ते महत्त्वाचेच होते. त्यामुळे आपला राष्ट्रवाद हा आता आपल्या राज्यघटनेतून येतो हे सांगायला ते विसरले नाहीत. आपला शत्रू कोण आहे यावर आपला परिचय ठरत नाही तर बहुविधतेमधील एकता हे आपल्या राष्ट्रवादाचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले. मुखर्जी यांचे हे पांडित्यपूर्ण भाषण राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरावे. पण ज्या दोन विरोधी टोकांना असलेल्या विचारगटांनी मुखर्जी यांच्या संघ व्यासपीठावर जाण्यालाच आक्षेप घेतला त्यांना व उजवी विचारसरणी असलेल्यांनाही फारसे पटलेले नसावे. कारण या भाषणाआधी आणि नंतर दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर केलेली पतंगबाजी होय. डोके गहाण टाकून केलेली ती पतंगबाजी व शेरेबाजी तसे करणाऱ्यांचीच पायरी दाखवून गेली.

लोकशाही देशामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो संवाद. संघाचे आमंत्रण स्वीकारल्याने काय होणार आहे, प्रतिक्रिया कोणत्या, कशा व कुठे उमटणार आहेत याची जाण तर मुखर्जी यांनाही निश्चितच असावी. म्हणूनच की काय त्यांनी भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात सार्वजनिक व सामाजिक आरोग्यासाठी संवाद कसा व किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. खरे तर टोकाची भूमिका घेणाऱ्या दोन्ही बाजूंवर केलेली ती थेट टिप्पणीच होती. पण केवळ विरोधासाठी एकमेकांना विरोध करणाऱ्यांना ते कसे कळणार? मुखर्जी यांचे भाषण म्हणजे संघ व उजव्या विचारसरणीला दाखविलेला आरसा होता, अशी टीका संघविरोधकांनी केली तर आता कशी जिरवली अशा प्रकारे भाषेचा वापर उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी केला. खरे तर इतिहास तोच होता, त्यातील उदाहरणेही तीच होती सर्वाना माहीत असलेली. मग मुखर्जी यांना ही इतिहासाची उजळणी का करावी लागली? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण इतिहास विसरतो, चुकीच्या म्हणजेच केवळ आपल्या विचारसरणीच्या बाजूने त्याचा विचार करतो. मग या घटनेचा मथितार्थ काय तर मुखर्जी यांच्या संवादानंतरच्या प्रतिक्रिया सांगतात.. दोन्ही बाजूंना पालथ्या घडय़ावर पाणी!

First Published on June 15, 2018 1:10 am

Web Title: pranab mukherjee and mohan bhagwat at rss event