26 April 2019

News Flash

विकासाचा भकासमार्ग!

सेन्टिनेल बेटावर चोरी-छुप्या पद्धतीने जाऊन पोहोचणे हाच अतिगंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

पर्यटक व्हिसावर आलेल्या चाऊने स्थानिक प्रशासनाला पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. कारण अंदमानातील अनेक परिसर हे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येतात.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अंदमानच्या उत्तर सेन्टिनेल बेटावर जाऊन पोहोचलेल्या जॉन अ‍ॅलन चाऊ या २७ वर्षीय युवकाची बाण मारून हत्या केल्याचा गुन्हा स्थानिक पोलिसांनी सेन्टिनेलच्या आदिम जमातीतील अज्ञात व्यक्तींवर दाखल केला आहे. मुळात तिथे अशा प्रकारे चोरी-छुप्या पद्धतीने जाऊन पोहोचणे हाच अतिगंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. मात्र ते समजण्यासाठी मुळात सेन्टिनेल बेट आणि तिथली आदिम जमात यांचे महत्त्वाच लक्षात यायला हवे. पर्यटक व्हिसावर आलेल्या चाऊने स्थानिक प्रशासनाला पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. कारण अंदमानातील अनेक परिसर हे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येतात. इथे जगातील आदिम अशा जमाती आजही राहतात. त्यांची जपणूक करणे हे ऐतिहासिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्टय़ाही तेवढेच महत्त्वाचे आहे.

आज मनुष्यप्राणी ‘होमो सेपिअन सेपिअन’ या शास्त्रीय प्रजातीच्या नावे ओळखला जातो. आफ्रिकेत जन्म झालेला मानव सुरुवातीस प्राण्यांप्रमाणेच ओणवा चालायचा. मात्र नंतर उत्क्रांतीमध्ये त्याचा पाठीचा कणा ताठ झाला तो होमो इरेक्टस या नावाने ओळखला जातो. हा होमो इरेक्टस आफ्रिकेतून बाहेर पडला आणि जगभर पसरत गेला. आपण त्याचेच वंशज आहोत. मध्यंतरी प्राचीन मानवाचा शोध घेणारी एक जागतिक मोहीम जगभरच्या संशोधकांनी एकत्र येऊन राबविली. त्यात प्राचीन मानवाच्या भारतातील पाऊलखुणा याच अंदमानात सापडल्या. अंदमानमधील या आदिम जमाती आपल्या पूर्वजांच्या अधिक जवळच्या आहेत. त्यांच्या संदर्भातील संशोधन आपल्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. ते आहेत म्हणून आपल्याला उत्क्रांतीमधील बदल नेमके कसे काय, कसे होत गेले याची खूणगाठ पटणार आहे. आपल्या भविष्यातील पिढय़ांसाठी आणि मानवाच्या एकूणच भविष्यातील प्रवासासाठी हे अतिमहत्त्वाचे आहे. म्हणून या वेगाने ऱ्हास होत चाललेल्या या जमातींना जपणे हे आपले आद्यकर्तव्यच आहे. शिवाय अगदी आदिम असले तरी ती माणसेच आहेत. जगाशी कोणताच संपर्क नसल्याने प्रगतीपासून ही सारी मंडळी गेल्या हजारो पिढय़ा दूर राहिली. आजही यातील अनेक जमाती या मानवी प्रगतीच्या दुसऱ्या म्हणजे शिकार करणाऱ्या आणि कंदमुळे- फळे गोळा करणाऱ्या टप्प्यावरच अडकून राहिली आहेत. त्यांना बाहेरचे जगच माहीत नाही. प्रगत माणसाची त्यांना भीती वाटते. आजही धनुष्यबाण हेच शिकारीसाठीचे त्यांचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच चाऊची हत्याही धनुष्यबाणानेच करण्यात आली.

हत्येच्या दोनच दिवस आधीही चाऊने त्या बेटावर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या अंगावर त्याही वेळेस बाणाच्या जखमा होत्या. तरीही त्याने स्थानिक कोळ्यांना सोबत घेतले आणि बेटावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याने ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी हा धोका पत्करल्याचेही म्हटले जाते. मात्र त्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. काहीही कारण असले तरी त्याचे तिथे पोहोचणे हे तेवढेच धोकादायक आहे.

ब्रिटिशांनी अंदमान ताब्यात घेतल्यानंतर राबविलेल्या राज्यकारणात अनेक आदिम जमाती नष्टही झाल्या. मात्र या बेटावर फारसे व्यावसायिक मूल्य असलेले काही नसल्याने त्यांनी हा भाग सोडून दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात इथे झालेल्या जनगणनेमध्ये १९०१ साली सेन्टिनेल या आदिम जमातीचे २१ जण असल्याची नोंद सापडते. नंतर संख्या वाढून त्यांनी शंभरी पार केलेली दिसते. १९३१ साली ५० जणांची नोंद आहे. तर १९९१ साली २३ आणि २००१ साली ३९ जणांची नोंद करण्यात प्रशासनाला यश आले. या परिसरामध्ये फिरून नोंद करणे अशक्यच आहे. कारण प्रगत माणसाला पाहिले की ते भीतीने हल्ला करतात. त्यामुळे यासाठी हवाईचित्रणाचा वापर करण्यात आला. असे असले तरी इथे शंभरच्या आसपास संख्या असावी असा अंदाज आहे. आजवर मानववंशशास्त्रज्ञांनी वेळोवेळी इथे भेटी देऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यात मोजकेच यश आले आहे. कारण हल्ला होण्याच्या घटनाच अधिक आहेत. मध्यंतरी या बेटावर सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याचे विश्लेषण केल्यानंतर या ठिकाणी सुमारे दोन हजार वर्षांपासून मानवी वावर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तर हा वावर केवळ एवढाच नव्हे तर सुमारे ३० हजार वर्षे जुना असावा असाही कयास आहे.

पूर्वी असे मानले जात होते की, आफ्रिकेतून निघालेला माणसाचा पूर्वज युरोप आणि मध्य आशियामार्गे भारतात आला आणि मग खाली आग्नेय आशियात गेला. मात्र अलीकडे भारतात अतिरमपक्कम येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननानंतर हे जगासमोर आले की, आफ्रिकेतील त्या मानवाच्या पूर्वजाने शीतकालखंडात गोठलेल्या बर्फावरून थेट भारत गाठला, तो आग्नेय आशियापर्यंत खाली गेला आणि नंतर युरोपात गेला. हे आजवरच्या गृहीतकांना छेद देणारे महत्त्वाचे जागतिक संशोधन ठरले. त्याच पूर्वजांच्या आपल्या आधीच्या टप्प्यातील वंशज आजही आपल्याकडे या आदिम जमातींच्या रूपात अंदमानात नांदत आहेत, हे महत्त्वाचे.

या जमातींचे महत्त्व लक्षात आल्यानंतर तत्कालीन सरकारने १९५६ साली अंदमान व निकोबार बेटे (मूळनिवासी जमातींचे संरक्षण) अधिनियम अस्तित्वात आणला. त्यानुसार या परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात आली तसेच छायाचित्रण आणि या जमातींशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास बंदी घालण्यात आली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले शरीर जसे उत्क्रांत होत गेले तसे या आदिम जमातींबाबत झालेले नाही. आपले शरीर अनेक जीवजंतूंना सरावले आहे, तसे त्यांच्या बाबतीत नाही. त्यामुळे प्रगत मानवाच्या शरीरातील जंतूंच्या संपर्कात आल्यानंतर आदिम जमात मृत्युमुखी पडण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय ते आजही शुद्ध वातावरणात राहतात. आपल्या जाण्यामुळे तिथले वातावरण प्रदूषित होऊन त्यामुळेही मृत्युमुखी पडण्याची वेळ त्या जमातीवर येण्याची शास्त्रीय शक्यता यापूर्वीच व्यक्त झाली आहे.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपणही प्रगतीचे आणि आधुनिकतेचे वारे अंदमानात नेले आहेत, त्यांनी या जमातींच्या अस्तित्वावरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. १५ वर्षांपूर्वी सुमारे ३३३ किमी लांबीचा महामार्ग क्रमांक २२३ आपण बांधला. तो आज अंदमान ट्रंक रोड या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आजवर जगापासून दूर राहिलेली जारवा जमात आधुनिक मानवाच्या संपर्कात आली आणि आता त्यांच्यात वैचित्र्यपूर्ण बदल झाले; ज्यामुळे ते ऱ्हासाच्या उंबरठय़ावर आहेत. या महामार्गावरून जाताना गाडय़ा थांबविणे, त्यांचे फोटो काढणे, त्यांना वेफर्स आदी आधुनिक गोष्टी खायला देणे या सर्व गोष्टींवर बंदी आहे. मात्र पर्यटकांकडून हे सर्रास केले जाते. २१०० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रस्ता पर्यटकांचे आकर्षण ठरलेला असला तरी येथील आदिम जमातींच्या मुळावर आला आहे. आज पर्यटकांच्या निमित्ताने इथून प्रति वर्षी २३ हजार ८०० टन मालवाहतूक होते आणि त्या निमित्ताने प्रदूषणदेखील. या मालासोबत अनेक जिवाणू-विषाणू आता अंदमानात पोहोचले आहेत; जे आपल्यासारख्या आधुनिक मानवासाठी घातक नसले तरी आदिम जमातींसाठी प्राणघातक आहेत. त्यांचे शरीर अद्याप उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यातच असल्याने त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती आपल्याइतकी विकसित झालेली नाही. अंदमानच्या जंगलातही आता प्लास्टिक पाहायला मिळते आणि जारवांच्या हातातही प्लास्टिकच्या पुडय़ा. भारतातून आलेल्या पर्यटकांनी तर त्यांना आता पान आणि तंबाखूचीही सवय लावली आहे, असे मध्यंतरीच्या पाहणीमध्ये लक्षात आले. हे सारे अलीकडे तर जारवांनी लॅपटॉप आणि पर्यटकांच्या बॅगाही अन्नाच्या आमिषाने पळवल्या. ही इशाऱ्याची घंटाच आहे आपल्यासाठी. आपण सर्व नियम धुळीलाच मिळवीत आहोत. आपली ही कृती आज आदिम जमातींच्या जिवावर उठणारी असली तरी भविष्यात त्याचे दान पुन्हा आपल्याच पदरात येणार आहे. न्यूटनचा गतीचा तिसरा नियम सांगतो, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया आणि धर्मशास्त्रातील कर्मसिद्धान्तही सांगतो जसे कर्म तसेच फळ! अलीकडच्या ऑगस्ट महिन्यात तर सरकारने या जमातींच्या मुळावर येईल अशी सुधारणा अधिनियमात केली. येथील ३८ पैकी २९ भाग सरकारने पर्यटकांसाठी खुले केले. त्यामुळेच चाऊ याला या परिसरात जाण्याचा पर्यटक व्हिसा मिळाला. या सुधारणेमुळे आता विदेशी पर्यटकांना हा भाग खुला झाला आहे.

प्रगत मानवाचा इथला वावर या आदिम जमातींच्या ऱ्हासासाठी कारण ठरतो आहे. या महामार्गावरून येणाऱ्या मालासोबत शहरी भागातील अनेक वनस्पती आणि वेली यांनीही या जंगलात प्रवेश केला असून महत्त्वाचे म्हणजे अनेक शहरी कीटक इथे आता पाहायला मिळतात. १९७६ साली या संदर्भात इशारा देणारा अहवाल इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचे सल्लागार डी. एन. मॅकव्हेन यांनी सादर केला होता. अलीकडेच रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या संशोधकांना असे लक्षात आले आहे की, शहरी भारतात सापडणारे डासही आता इथे पोहोचले असून ते या जमातींसाठी प्राणघातक आहेत. शहरी प्रगत मानवी वावरानंतर झालेले जंगलातील प्रदूषणही युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिकट आणि बॉटनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या गेल्या काही अहवालांमध्ये लक्षात आले आहे.

असे असले तरी आजही मानवाच्या या पूर्वजांशी घनिष्ठ नाते असलेल्या आदिम जमातींच्या प्रश्नांकडे आपण फारसे गांभीर्याने पाहिलेलेच नाही. आपण केवळ पर्यटनातून मिळणाऱ्या परकीय चलनाच्या मोठय़ा आकडेवारीकडे पाहतो आहोत. मानवतेचे आणि पर्यावरणाचे भान राखले नाही तर हाच विकासाचा महामार्ग आपल्यासाठी भकासाचा ठरेल, याचे भान ठेवायला हवे!

First Published on November 30, 2018 1:06 am

Web Title: remote tribes in india