विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
नवीन वर्ष सुरू झाले किंवा होणार असे लक्षात आले की, अनेकदा आपल्याला संकल्पांची आठवण होते. गत वर्षांचे राहून गेलेले संकल्प आठवतात. आणि मग माणूस नव्याने कामाला लागतो. अर्थात नववर्ष सुरू होत असतानाचा उत्साह हा काही वेगळाच असतो. अनेकांच्या त्या राहून गेलेल्या संकल्पांमध्ये एक संकल्प नक्कीच असतो तो म्हणजे व्यायाम नियमित करण्याचा किंवा फिटनेसचा. जानेवारीच्या सुरुवातीस छान गारवाही असतो. त्यामुळे या काळात व्यायाम करावासा वाटणे तसे साहजिक असते. फक्त अनेकदा काहींच्या बाबतीत थंडीमुळे संकल्प अंथरुणातच राहतात. एकूणच भारतीय समाज आणि आपली मानसिकता ही काही फारशी व्यायामाच्या वाटेला जाणारी नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मॅरेथॉन स्पर्धामध्ये वाढ झालेली दिसते आहे आणि त्याच वेळेस त्या स्पर्धामध्ये धावणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालेली दिसते आहे. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्र त्याच वेळेस हेही लक्षात ठेवायला हवे की, धावणे, फिटनेस राखणे ही चांगली गोष्ट असली तरी धावताना वैज्ञानिक पद्धतीचा वापर करायला हवा. स्वतचे शरीर आधी समजून घ्यायला हवे म्हणजे संभाव्य इजा किंवा दुखापत टाळता येऊ शकेल. आता धावणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि नंतर पाच वर्षांनी इजा किंवा दुखापत झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे नको व्हायला.

त्यामुळे धावताना काही मूलभूत गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात. अनेक जण सांगतात फिटनेससाठी धावायला सुरुवात केली. मुळात हे चुकीचे आहे. आधी फिटनेस येतो. कारण धावण्यासाठीही फिटनेस लागतो असे विज्ञान सांगते. क्रिकेट खेळून किंवा फुटबॉल अथवा हॉकी खेळून कुणी फिट होत नाही. ते फिट आहेत म्हणून या क्रीडा प्रकारांचा आनंद लुटू शकतात.

शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा फिटनेस वेगळा असतो. त्याचा थेट संबंध आपल्या थेट शरीराशी, शरीररचनाशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्राशीही आहे. शैलेश परुळेकर यांच्यासारख्या वैज्ञानिक बैठक पक्की असलेल्या तज्ज्ञांना विचारले तर ते आपल्याला ही प्रक्रिया समजावून सांगतात. उसेन बोल्ट हा वेगवान धावपटू असेल तर तो मॅरेथॉन धावण्याच्या फंदात पडत नाही. कारण वेगवान धावपटूला लागणारी ऊर्जाशक्ती, त्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारा फिटनेस पूर्णपणे वेगळा असतो आणि मॅरेथॉनसाठी लागणारा फिटनेस किंवा स्नायूंची क्षमता ही वेगळी असते. एवढेच काय तर चालण्यासाठी लागणारा व धावण्यासाठी लागणारा फिटनेस यामध्येही भेद आहेच.

कोण किती आणि कसे धावू शकते याची क्षमता माणसाच्या शरीररचना आणि शरीरक्रियाशास्त्रावर ठरत असते. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागतिक स्पर्धामध्ये आफ्रिकन मंडळीच धावण्यात अग्रेसर का असतात? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे आहे. त्यांच्या शरीराची घडण व उत्तम धावपटू होण्यासाठी लागणारी अतिरिक्त क्षमता.

अर्थात सामान्य माणसाला काही कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरायचे नसते किंवा पहिलेही यायचे नसते. फिटनेस हेच प्राथमिक उद्दिष्ट असेल तर मग हाही प्रश्न येत नाही. शिवाय चालणे व काळजीपूर्वक धावणे हाही चांगला व्यायाम आहेच. त्यातही तज्ज्ञ सांगतात की, वेगात धावणे हा व्यायाम नाही तर जॉिगग हा व्यायाम आहे.

शैलेश परुळेकर नेहमी म्हणतात काळजी घेतली म्हणजे ती करावी लागत नाही. काळजी घेऊन कोणताही व्यायाम करण्यास हरकत नाही. साधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर धावताय की, डांबरी सडकेवर. डांबरी सडक किंवा माती हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि विज्ञान असे सांगते की, सिमेंटच्या रस्त्यावर धावत असाल तर येणाऱ्या काळात दुखापत हमखास होणारच. डांबरालाही श्वास घेण्यास जागा असते. सिमेंट काँक्रीट हे अतिशय कडक असते. जगातील सर्वोत्तम रस्ते हे काँक्रीटचे कधीच नसतात ते डांबराचेच असतात. काँक्रीटवर पळताना किंवा धावताना होणारा पायावरचा आघात भविष्यातील दुखापतीची सुरुवात ठरतो. म्हणूनच जगातील एकही खेळ सिमेंट काँक्रीटवर खेळवला जात नाही, तर ते सर्वच्या सर्व खेळ माती किंवा मॅट अथवा तुलनेने नाजूक असलेल्या लाकडी पृष्ठभागावर  किंवा मग कृत्रिम हिरवळीवर होतात. खेळणाऱ्यास दुखापत होऊ नये असे खेळाचे प्राथमिक तत्त्व इथे आधी पाळले जाते. क्रीडा प्रकारासाठीचा पृष्ठभाग टणक असून चालत नाही.

बऱ्यापैकी शारीरिक हालचाल करावी लागते अशा क्रीडा प्रकारांना हाय इम्पॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटी असे म्हणतात. म्हणून तर खेळाडू मग ती  सायना नेहवाल असो किंवा मग धोनी अथवा तेंडुलकर त्यांना दुखापतींना सामोरे जावेच लागते. धावणे हा प्रकारही हाय इम्पॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटीच आहे. त्यामुळे पृष्ठभाग कोणताही असला तरी त्याचा आचका कमी करण्यासाठी धावताना पायात शूज असणे महत्त्वाचे ठरते. चांगले शूज पायात असल्याशिवाय धावू नका.

धावणे असेल अथवा कोणताही क्रीडाप्रकार, तो सुरू करण्याआधी प्राधान्य त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेसला असायलाच हवे. वॉर्मअप म्हणजे कोणताही व्यायाम किंवा क्रीडा प्रकार खेळण्यास सुरुवात करण्याआधी शरीराला त्याच्याशी संबंधित हालचालींसाठी तयार करणे. यामध्ये मोबिलिटीशी संबंधित व्यायाम प्रकारांचाही समावेश होतो. सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये कंबरेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यात धावण्याचाही समावेश आहेच. मुळात माणूस आणि इतर प्राणी यामध्ये पाठीचा ताठ कणा आणि त्यामुळे दोन पायांवर व्यवस्थित तोल साधत उभे राहणे हाच मानवी उत्क्रांतीमधला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जे उत्क्रांतीमध्ये आपल्याला लाखभर वर्षांपूर्वी मिळाले आहे; ते जपणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचे जपावे लागते ते हृदय. धावण्याच्या हालचालींना कार्डिओ म्हणजेच हृदयाशी संबंधित हालचाली असे म्हणतात. त्यामुळे तुमच्या हृदय आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवावी लागते. फिटनेसबरोबरच ती वाढत जाते. म्हणून फिटनेस हा आधी महत्त्वाचा आहे.

त्यासाठी सुरुवातीस हळूहळू चालणे आणि नंतर चालण्याचा वेग वाढवून भराभर चालणे (ब्रिस्क वॉकिंग) महत्त्वाचे असते. शिवाय कोअर म्हणजे पोटाकडचे आणि पाठीचे स्नायू हे बळकट आणि लवचीक असावे लागतात. त्यावर मेहनत घेतली तर फिटनेस लवकर प्राप्त करता येऊ शकतो आणि प्राप्त केलेला फिटनेस सातत्यपूर्ण व्यायामाने टिकवावाही लागतो. त्यात असलेले सातत्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्याच्याच इतके महत्त्व शरीराची झीज भरून येण्यालादेखील आहे. त्यामुळे शरीराच्या रिकव्हरीलाही तेवढाच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे व्यायामाबरोबरच आहार, निद्रा यांनाही महत्त्व द्यावे लागते.

आपले श्रम कमी करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी मानवाने  अनेक साधने निर्माण केली आहेत. पण त्याने वेळ तर बिलकूल वाचलेला नाही, उलट तो कमीच पडतो. व्यायाम न करण्यासाठी अनेकांचे एक ठरलेले उत्तर असते, ‘वेळच नाही’ तर काय करणार?  सध्या अनेक नव्या उपकरणांच्या मदतीमुळे पूर्वी शरीराची होणारी हालचाल आता खूपच कमी झाली आहे. अगदी शौचाला बसतानाही कमोड असेल तर ऊठबस करताना कमरेची होणारी हालचाल मंदावते. पायऱ्या असल्या तरी लिफ्टचा वापर प्राधान्याने केला जातो. एवढे करून व्यायामाला वेळ नसेल तर काय बोलणार..? बरं, व्यायामाचे फायदे आपल्याला माहीत नाहीत असेही नाही. केवळ चालण्यानेही शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते. पाठदुखीसारखे किंवा पचनसंस्थेचे विकार होत नाहीत. हे सारे माहीत असते.. पण वेळ नसतो.

अर्थात पण म्हणून प्रत्येकाने उठून थेट धावायला सुरुवात करण्याची काहीच गरज नाही. अर्थात व्यायाम करायला किंवा धावायला सुरुवात करायला हरकत काहीच नाही. मात्र ते वैज्ञानिक पद्धतीने करताय ना, याची मात्र पुरेशी काळजी घ्या. एक वेळ त्याचा फायदा नाही झाला तरी चालेल, पण त्याने शरीराचे नुकसान होता कामा नये, हे महत्त्वाचे आहे. कोचावर बसून राहण्यापेक्षा किंवा अंथरुणातच पडून राहण्यापेक्षा व्यायाम करणे केव्हाही चांगले. चांगले धावणे दुखापतीशिवाय शक्य असेल तर उत्तमच पण नसेल जमत तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. चालणे हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. तोही नियमित केला तरी पुरेसे आहे. चालणे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे चल ध्यान (अ‍ॅक्टिव्ह मेडिटेशन) होय. शैलेश परुळेकरांसारखे तज्ज्ञ एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगतात, त्याची खूणगाठ प्रत्येकाने बांधून ठेवायला हवी. ते म्हणतात, शरीराला अ‍ॅक्टिव्हिटी हवी आणि मनाला स्थिरता. पण सध्या जगात त्याच्या अगदी उलट झालेले दिसते. शरीर स्थिर आहे आणि मन सैरावैरा पळते आहे. परुळेकर म्हणतात त्याप्रमाणे मनाला स्थिर ठेवायचे तर शरीराला अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे व्यायाम हवाच हवा. अर्थात त्यासाठी वेगे वेगे धावूच्या ऐवजी हळू हळू धावू आणि पुरेशी काळजी नक्की घेऊ!

नव्या आरोग्यदायी वर्षांसाठी

मनपूर्वक शुभेच्छा!