13-lp-heartगेल्या तीन महिन्यात आधी सहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून वाद झाला. त्याचे परिणामस्वरूप पुरस्कारवापसीमध्ये पाहायला मिळाले. त्यातून श्वास घेण्याइतका अवधी मिळतो न मिळतो तोच हैदराबादमध्ये रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवरून देशात पुन्हा वाद-चर्चाना जोरदार सुरुवात झाली.  त्याचवेळेस कापू आंदोलन पेटले आणि त्या पाठोपाठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून देशद्रोहाच्या मुद्द्यावर देशभरात चच्रेला सुरुवात झाली.  सर्वच माध्यमांवर सर्वजण व्यक्त होत आहेत. एरवी आपण ज्यांना सामान्य नागरिक म्हणतो, त्यांनाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्यासपीठच खुले झाले आहे;  त्यामुळे तेही तावातावाने बोलताना दिसत आहेत. ज्यांना या सर्व वादांमध्ये फारसे गम्य नाही, त्यांचे सर्व लक्ष शेअर बाजाराकडे लागलेले आहे. जगभरातील शेअर बाजार कोसळतो आहे. जागतिक मंदीसदृश्य वारे वाहू लागले आहेत.. यातील प्रत्येक घटकावर सविस्तर चर्चा होते आहे. ती करण्यासाठी आपल्याकडे वेळही आहे. पण जो विषय तुमच्या- आमच्या जीवनाशी थेट संबंधित आहे, त्यावर कार्यवाही करण्यासाठी तर सोडाच पण विचार करण्यासाठीही आपल्याला वेळ नाही!

भारत सरकारच्या गृहमंत्रालयांतर्गत जनगणना केली जाते. रजिस्ट्रार जनरल व आयुक्त या पदावरील व्यक्ती त्याच्या प्रमुखपदी असते. सातत्याने सुरू असलेल्या या जनगणनेच्या माहितीचा- सांख्यिकीचा वापर करून देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे त्याच्याच आधारे देशातील महत्त्वाचे निर्णयही घेतले जातात, धेय्यधोरणे ठरविली जातात.  म्हणूनच या अंतर्गत जारी झालेल्या माहितीला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. या जनगणना आयुक्तांनी १५ फेब्रुवारी रोजी देशवासीयांसाठी एक माहिती जारी केली.  माहिती दिली असे म्हणण्यापेक्षा त्यांनी समस्त देशवासीयांसाठी धोक्याची एक मोठी घंटाच वाजविली, असे म्हणणे संयुक्तिक ठरावे. पण देशभरात सुरू असलेल्या वादांच्या घोळात या दैनंदिन महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयाकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही.  माध्यमांनीही या अतिमहत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष्यच केलेले दिसते. सरकारनेही सरकारी संकेतस्थळावर त्याची माहिती जारी करून कर्तव्य पार पाडल्याचीच भूमिका घेतल्याचे दिसते. खरे तर ही माहिती आपल्या सर्वाचे डोळे खाडकन उघडणारी आहे. ही माहिती म्हणजे भारतीयांच्या आरोग्याचा अहवालच आहे. त्याला आरोग्याचा अहवाल म्हणण्याऐवजी अनारोग्याचा अहवाल म्हणणे अधिक योग्य ठरावे.

माणसाला होणाऱ्या विकारांचे वर्गीकरण संसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य अशा दोन प्रकारांमध्ये केले जाते.  यात संसर्गजन्य विकारांनी (अनेकदा एखादी रोगाची साथ येऊन) बळी गेलेल्यांची संख्या आजवर नेहमीच अधिक असायची. मात्र आताची आकडेवारी असे सांगते की, २०१० ते २०१३ या कालावधीत मृत्यू झालेल्या भारतीयांमध्ये असंसर्गजन्य विकारांनी बळी गेलेल्या भारतीयांच्या संख्येने पन्नाशी गाठली आहे. म्हणजेच या बळींची संख्या ५० टक्के आहे. त्यातही शहरवासी असलेल्या भारतीयांनी तर हेही प्रमाण ओलांडले असून तिथे हे प्रमाण ६० टक्क्यांच्या आसपास आहे. प्रत्यक्ष हे सर्वेक्षण केवळ २०१३ पर्यंतचीच माहिती देते. त्यावेळेस शहरातील असंसर्गजन्य मृत्युचे प्रमाण हे ५७ टक्क्यांवर होते. ज्या वेगात ही वाढ होते आहे, त्यावरून आजमितीस ते ६० टक्के असायला हवे असे जनगणना आयुक्तालयास वाटते. ही वस्तुस्थिती केवळ धक्कादायकच आहे.

आकडेवारी असे सांगते की, २००४-०६ या कालावधीत असंसर्गजन्य विकारांनी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४५.४% वरून २०१०-१३ साली ती ४९.९% ( म्हणजेच ५० %) पर्यंत पोहोचली.  त्यातही शहरामध्ये हे प्रमाण ५७% आहे.  दुसरीकडे संसर्गजन्य विकारांच्या मृत्युदरांमध्ये मात्र १० टक्क्यांनी घट झाली आहे. २००४-०६मध्ये असलेले ३६.७% हे मृत्युचे प्रमाण २७.७% पर्यंत खाली आले आहे.  विविध घटनांमध्ये जखमी होऊन त्यातच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण १०.४% वरून १०.७% वर गेले आहे. तर इतर प्रकारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे ७.६% वरून १२.४% वर गेले आहे. असंसर्गजन्य विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हृदयविकाराचे प्रमाण १९.९% वरून २३.३% पर्यंत वाढले आहे.  त्याला जोड मिळाली आहे ती रक्तदाब आणि मधुमेह या दोघांची, जे मानवाच्या बदललेल्या जीवनशैलीशी संबंधित विकार आहेत.

या बदललेल्या आणि शहरी प्रभाव असलेल्या जीवनशैलीनेच भारतीयांचा घात केलेला दिसतो. एकिकडे देशातील शहरीकरणाचे प्रमाण वाढते आहे.  महाराष्ट्रातील शहरीकरण आता पन्नाशी गाठते आहे आणि देशाची वाटचालही आता त्याच दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरी आणि निमशहरी भागांची वाढ वेगात झालेली दिसेल. पण त्याचबरोबर शहरीकरणाच्या वाढणाऱ्या प्रमाणाबरोबर शहरातील वाढत्या मृत्यूदराचे प्रमाण ही मात्र धोक्याची घंटा असणार आहे. सर्वसाधारणपणे खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खाणे (रस्त्यावरील किंवा मग मद्याचे प्रमाण अधिक असलेले पिझ्झा, बर्गरआदी) व्यायामाचा पूर्ण अभाव, त्यामुळे सुटलेले पोट, शरीरातील मेदाचे वाढलेले प्रमाण ही सारी कारणे या वाढत्या मृत्यूंच्या मुळाशी आहेत.

शहरातील कामाचा व्याप, त्याचे ताण-तणाव हे या साऱ्याच्या मुळाशी आहेत, असे म्हटले जाते.  वैद्यक किंवा फिटनेस तज्ज्ञ सतत सांगतात की, ताण टाळता येत नाहीत पण तणाव टाळता येतात.  त्यावर व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा उतारा आहे. पण शहरामध्ये व्यायामासाठी वेळ आहे कुणाला?  अशी अवस्था आहे. दूर डोंबिवली- कल्याण किंवा विरार- पालघरला राहायचे आणि मग नोकरीसाठी बोरिबंदर किंवा चर्चगेट गाठायचे. मुंबईकरांचे अध्रे आयुष्य शहरातील या प्रवासातच जाते, असे गंमतीत म्हटले जाते.  ते पूर्ण नसले तरी अर्धसत्य नक्कीच आहे. पण मग या स्थितीला जबाबदार कोण?  व्यायाम न करणारी मंडळी म्हणजेच शहरवासीयांच्या स्वतच्या आयुष्याचे चुकलेले गणित की,  सरकारचे चुकलेले शहरनियोजन?  अधिक चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येक जण आज शहराच्या दिशेने धाव घेतो आहे.  मग आपली गावे स्मार्ट करावीत आणि शहरांकडे येणारे लोंढे थांबवावेत, असे आपल्याला का नाही वाटत? असलेल्या शहरांना स्मार्ट करणे किंवा मग नवीन स्मार्ट शहरांची उभारणी करणे असा स्मार्ट शहरांचा महत्त्वाकांक्षी असा महाप्रकल्पच केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्या स्मार्ट शहरांमध्ये, स्मार्ट नागरिकांच्या किमान आरोग्यदायी जीवनाचा विचार केलेला आहे का?  की, आपण फक्त उपकरणांच्या बाबतीत स्मार्ट होणार आहोत? सर्वत्र सुरक्षिततेची हमी देणारे शेकडोंच्या संख्येने असणारे सीसीटीव्ही हे कदाचित सुरक्षित जीवनाची हमी देणारे असले तरी ते आरोग्यदायी जीवनाची हमी निश्चितच देत नाहीत. शिवाय केवळ हिरव्या जागा म्हणजेच सुंदर बागबगिचे असून चालणार नाही. तर त्यात जाण्यासाठी त्या स्मार्टशहरवासीयांना वेळही असायला हवा. म्हणजेच कामाची जागा व घर यातील अंतर कमी तरी असायला हवे किंवा मग अंतर अधिक असेल तर त्या जाण्या- येण्याचा ताण तरी त्याच्या डोक्यावर राहणार नाही, हे पाहावे लागेल.  शहरे स्मार्ट करणे हा रोगाच्या लक्षणांवर उपचार करण्याचा प्रकार आहे.  या सर्वावर मुळातून विचार केला तर लक्षात येईल की, शहरे स्मार्ट करण्याबरोबरच गावेही स्मार्ट केली तर कदाचित आपण रोगाच्या मुळावर उपचार केलेला असेल. मग शहरांकडे येणारे लोंढेही थांबतील आणि शहरवासीयांच्या आरोग्य आणि सोयीसुविधांकडे लक्षही व्यवस्थित पुरविता येईल.  अन्यथा एका बाजूला आधुनिक विज्ञानामुळे मानवाचे जीवनमान उंचावलेले आणि वाढलेलेही असेल पण दुसरीकडे शहरवासीयांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूदरातही त्याच प्रमाणात वाढ झालेली असेल, हे मात्र दुर्दैव असेल. ते टाळायचे असेल तर सध्या घणाणणारी धोक्याची घंटा वेळीच ऐकून पावले उचलायला हवीत !
vinayak-signature
विनायक परब –  vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab