16 November 2019

News Flash

केमिकल लोचा

आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे मूलतत्त्व जाणून घेणे म्हणजे विज्ञान.

विज्ञानाचा बागुलबुवा उभा न करता त्याकडे पाहण्याची आपली नजर बदलणे गरजेचे आहे.  

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
विज्ञान-तंत्रज्ञान हे शब्द ऐकले तरी, आपल्याकडे सामान्य माणसे धसका घेतल्यासारखे वागतात. खरे तर या विज्ञान-तंत्रज्ञानाने आपले म्हणजेच मानवाचे जीवन सुखकर करण्याचेच काम केले आहे. मात्र आपण त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. आपण विज्ञान जेवढे अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू तेवढे आपलेच जीवन अधिक चांगले होणार आहे, हे लक्षातच घेत नाही. कुतूहल हेच या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुळाशी आहे. आणि विज्ञान म्हणजे परग्रहावरची गोष्ट नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे मूलतत्त्व जाणून घेणे म्हणजे विज्ञान. मात्र ते ज्या पद्धतीने शिकवले जाते, त्यामुळे आपल्याला त्याची धडकी भरत असावी.

वैज्ञानिक पद्धतीचाच अवलंब करायचा तर शिक्षण हे ज्ञात म्हणजेच माहीत असलेल्या गोष्टींकडून अज्ञात म्हणजेच माहीत नसलेल्या गोष्टींच्या किंवा तत्त्वांच्या दिशेने जाणारे असायला हवे. शालेय जीवनात आधी व्याख्या शिकवली जाते आणि नंतर त्याची उदाहरणे सांगितली जातात. शिक्षण नेमके उलटे असायला हवे. कारण उदाहरणे सर्वानाच सर्वसाधारणपणे माहीत असतात फक्त त्यामागे कोणते रासायनिक किंवा वैज्ञानिक तत्त्व काम करते ते आपल्याला माहीत नसते. त्यामुळे विज्ञानाचा बागुलबुवा उभा न करता त्याकडे पाहण्याची आपली नजर बदलणे गरजेचे आहे.

सध्या सुरू असलेला आठवडा दोन कारणांसाठी महत्त्वाचा आहे. त्यातील पहिले कारण म्हणजे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शाळेत असताना आपण रसायनशास्त्रामध्ये मेंडेलीवची आवर्तसारणी अभ्यासलेली असते. ही आवर्तसारणी १७ फेब्रुवारी १८६९ रोजी अस्तित्वात आली. तिला यंदा तब्बल १५० वर्षे पूर्ण झाली. रसायनशास्त्राच्या संदर्भात बोलायचे तर हे अतिशय मोलाचे असे काम होते. त्यामुळे नंतर आलेल्या रसायनतज्ज्ञांचे काम खूप सोपे झाले, एवढे मूलभूत असे हे काम होते. त्यामुळे विज्ञान दिनाच्या पाश्र्वभूमीवर त्याची दखल घेणे क्रमप्राप्तच ठरते. आपले आयुष्य अगदी आपली जीवनिर्मितीची प्रक्रिया यामध्येही रसायन विज्ञान आहेच दडलेले. ज्या शरीराचा वापर आपण आपल्या सर्व कृतींसाठी करतो त्यामध्येही निसर्गाने एक रासायनिक संतुलन साधलेले असतेच. ते बिघडले की आपल्या शरीरामध्ये विकारांना सुरुवात होते. अगदी आपण कसे वागतो हेही या शरीरातील रासायनिक अशा संतुलनावरच अवलंबून असते. म्हणून तर एखादी व्यक्ती विचित्र वागू लागली की झटकन कुणी तरी म्हणते केमिकल लोचा आहे, म्हणजेच त्याच्या किंवा तिच्या शरीरातील रासायनिक संतुलन बिघडलेले आहे. आपल्या शरीराला जे लागू आहे तेच आपल्या स्वयंपाकघरातही लागू आहे. सर्वाधिक रसायनशास्त्र तर आपण स्वयंपाकघरातच वापरतो. रसायनशास्त्र तर गृहिणींना सर्वाधिक जवळचे आहे. कारण त्यांना रसायनशास्त्राची जाण नसेल तर स्वयंपाक उत्तम होणारच नाही. फक्त त्या स्वयंपाक सवयीने करतात आणि रसायनशास्त्राच्या अंगाने त्याकडे फारसे पाहत नाहीत एवढाच काय तो फरक. मुळात काय तर आपण अजाणतेपणी रसायनशास्त्र सातत्याने दैनंदिन आयुष्यात वापरतच असतो.

या रसायनशास्त्राला नेमक्या शास्त्रीय पद्धतीमध्ये बांधण्याचे काम मेंडेलीवने केले. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणू वस्तुमानाच्या चढच्या क्रमाने मांडत एक कोष्टक तयार केले. हे उभे आणि आडवे असे कोष्टक होते. हे कोष्टक म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण होते. मेंडेलीवने केलेल्या सारणीला आता १५० वर्षांचा कालखंड लोटला. त्यामध्ये काळानुरूप बदलही करण्यात आले आणि आता सुधारित आवर्तसारणी सर्वत्र वापरली जाते. मानवी उत्क्रांतीचा चार्ल्स डार्विन याचा शोध किंवा जॉर्ज मेंडेल याने जनुकशास्त्रात केलेले काम जेवढे महत्त्वाचे आणि मूलभूत होते तेवढेच महत्त्व मेंडेलीवच्या कामाला रसायनशास्त्रामध्ये आहे. किंबहुना म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाने २०१९ हे वर्ष आवर्तसारणीचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

ही अशी मूलद्रव्यांची वर्गवारी करणारा मेंडेलीव हा काही पहिलाच नव्हता. अंटोनी लाव्होइजीअर याने १७८९ साली तसा पहिला प्रयत्न केला. त्यानंतर जॉन न्यूलॅण्ड्स यानेही प्रयत्न केले. मात्र मेंडेलीवचे काम हे मात्र आजवर म्हणजे २१ व्या शतकापर्यंत मार्गदर्शक ठरते आहे. मूलद्रव्यांच्या आण्विक वजनानुसार त्यांची मांडणी केली तर त्यातून त्यांच्या गुणधर्माचे नेमकेपण लक्षात येते, हे मेंडेलीवच्या लक्षात आले. त्याने ही आवर्तसारणी तयार केली त्या वेळेस जगाला केवळ ६३ मूलद्रव्ये माहीत होती. त्यांचे वर्गीकरण त्याने या सारणीमध्ये बसवले. रासायनिक गुणधर्म लक्षात घेऊन चार मूलद्रव्यांची जागा त्याने रिकामी सोडली होती. मात्र त्यांच्या गुणधर्माचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांचा शोध नंतरच्या काळात लागला. त्याचा अंदाज खरा ठरला. अ‍ॅल्युमिनिअम, बोरॉन, सिलिकॉन आणि  मँगेनीज ही ती मूलद्रव्ये होत. आज आवर्तसारणीमध्ये एकूण ११८ मूलद्रव्ये आहेत.

त्यानंतर आलेल्या मोसेलीने त्या आवर्तसारणीत एक महत्त्वाचा बदल केला. त्याने आण्विक वजनाच्या ऐवजी अणुअंकाचा वापर केला. त्यामुळे मेंडेलीवच्या सारणीमधील काही त्रुटी दूर झाल्या. अर्थात मेंडेलीवच्या काळात केवळ अणूचे वजन हीच संकल्पना अस्तित्वात होती. त्यामुळे जसजसे पुढे अधिक शोध लागत गेले आणि नव्या संकल्पना जन्माला आल्या तसतसे आवर्तसारणीत बदल होत गेले. आज ही आवर्तसारणीच जगभरातील अनेक शोधांच्या मुळाशी आहे. मेंडेलीवचे नोबेल अगदी थोडक्यात हुकले. पण त्याने फारसा फरक पडला नाही, कारण त्यानंतर शोधल्या गेलेल्या एका मूलद्रव्यालाच त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. मेंडेलीवच्या या शोधाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण जनसामान्यांनीही आता रसायनशास्त्र व्यवस्थित समजून घेणे ही त्याला खऱ्या अर्थाने वाहिलेली आदरांजली असेल. महत्त्वाचे म्हणजे त्याच्यासाठी नाही तर किमान आपल्यासाठी तरी म्हणजे आपल्या आयुष्यात केमिकल लोचा होऊन काही गडबड उडू नये किंवा आपण विकारांना बळी पडू नये यासाठी तरी या विज्ञान दिनाच्या निमित्ताने रसायनशास्त्र समजून घ्यायलाच हवे!

First Published on February 15, 2019 1:06 am

Web Title: science and technology 2