18 January 2018

News Flash

अंतराळझेप!

माणसाला अगदी त्याच्या अस्तित्वापासून अनेक प्रश्न सातत्याने पडताहेत.

विनायक परब | Updated: September 22, 2017 1:07 AM

सूर्यमालेतील सहावा ग्रह असलेल्या शनीबद्दल लोकमनात खूप उत्सुकता आणि त्याच वेळेस भीतीही दडलेली आहे. आकर्षण आहे ते त्याच्याभोवती असलेल्या अनेक कडय़ांचे पण ज्योतिषामधील शनीमात्र साडेसातीच्या नावाने सामान्यजनांना घाबरवीत असतो. वृत्ती धार्मिक असली तर मंडळी आध्यात्मिकतेकडे वळतात आणि तर्कवादी असली तरी विज्ञानाकडे.

माणसाला अगदी त्याच्या अस्तित्वापासून अनेक प्रश्न सातत्याने पडताहेत. त्याचा शोध तो त्याच्या परीने घेतच होता. अश्मयुगामध्येही त्याला प्रश्न पडतच होते. पण विचार करायला फारसा वेळ नव्हता. मात्र शेतीचा शोध लागल्यानंतर तो स्थिर झाला आणि इथेच त्याला विचार करायला वेळ मिळाला. मग मी कोण, इथे कसा आलो इथपासून सुरू झालेला तो प्रश्नप्रवास मग बाहेर अंतराळात असलेल्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असू शकते काय? मुळात पृथ्वीवर जीवसृष्टी आली कुठून इथपर्यंत पोहोचला. गेल्या शतकात तर माणसाने अंतराळात संदेश पाठवून परग्रहवासीयांचा शोध घेण्यासही सुरुवात केली आणि यामध्येही कधी ना कधी आपल्याला यश येईलच, असे त्याला सातत्याने वाटतेही आहे. सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूबरोबरच लालेलाल असलेल्या मंगळाबद्दल, प्रेमगीतांमध्ये येणाऱ्या शुक्राबद्दलही त्याला आकर्षण होतेच. पण सभोवती असलेल्या आगळ्यावेगळ्या कडय़ांमुळे शनीबद्दलचे आकर्षण अंमळ अधिकच होते.

दुसऱ्या क्रमांकाचा मोठा वजनी ग्रह असलेला शनी बहुतांश वायुरूपातीलच आहे, अशी शास्त्रज्ञांची धारणा होती. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावे लागणारे भले मोठ्ठे अंतर संशोधनामध्ये मोठीच अडचण ठरत होते. मोठय़ा दुर्बणिींमधून त्याचे निरीक्षण करणे शक्य होते, पण त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर मिळणाऱ्या अचूक नोंदी आणि निरीक्षणे खूप काही देऊन जाणार, याची संशोधकांना खात्री होती.

शनीवर जीवसृष्टी असण्याबाबत संशोधकांमध्ये मतभेद असले तरी एका मोठय़ा गटाला तशी शक्यता अधिक वाटत होती. अभ्यास करायचा तर उपग्रह पाठविण्याला दुसरा पर्याय नव्हता. म्हणूनच कॅसिनीची योजना आखण्यात आली. शनीच्या कडय़ांबद्दल जगभरातील वैज्ञानिकांना आकर्षण होतेच. त्यामुळेच या मोहिमेत त्याचा अधिक अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. त्याची कडी ही दगड-बर्फ आदींपासून तयार झाली आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास होणे आवश्यक होते. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इटालियन स्पेस एजन्सीने कॅसिनी धाडण्याचा निर्णय १९९७ साली प्रत्यक्षात आणला. शनी जसा कडय़ांबाबतीत आकर्षण ठरला होता, तसेच आकर्षण त्याच्या ६२ चंद्रांबाबतही होते. यातील सर्वात मोठा चंद्र असलेल्या टायटनवर जीवसृष्टीच्या शक्यतेचा पडताळा वैज्ञानिकांना या मोहिमेत घ्यायचा होता.

तब्बल सात वर्षांच्या प्रवासानंतर २००४ साली कॅसिनी शनीच्या जवळ पोहोचले.

यानंतर तब्बल ४.९ अब्ज मलाचा प्रवास पूर्ण करून अलीकडेच १५ सप्टेंबर २०१७ रोजी या यानाने शनीच्या वातावरणात प्रवेश केला आणि आगीच्या ज्वाळांमध्ये त्याचा शेवट झाला. हा निर्णय पृथ्वीवरील संशोधकांनी अतिशय जाणीवपूर्वक घेतलेला  होता. गेल्या २० वर्षांच्या प्रवासात आणि १३ वष्रे शनीला प्रदक्षिणा घालताना तिथे असलेल्या जीवसृष्टीच्या शक्यता लक्षात आल्या होत्या. त्यामुळे हे यान शनीच्या एखाद्या उपग्रहावर धडकले असते तर पृथ्वीवरील बाबींशी आलेल्या संपर्कानंतर तेथील वातावरण दूषित झाले असते, हेच नेमके जगभरच्या वैज्ञानिकांना टाळायचे होते, त्यासाठीच त्यांनी ते अशा प्रकारे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.

कॅसिनी हे यान म्हणजे एक बहुउद्देशीय अशी प्रयोगशाळाच होती. त्यावरच्या विविध यंत्रणा शनीच्या परिसरातील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या होत्या. या यंत्रणेमध्ये कॅमेऱ्याचाही समावेश होता. कॅसिनीने टिपलेल्या माहितीच्या माध्यमातून शनीच्या पृष्ठभागाची प्रत्यक्ष चित्रे वैज्ञानिकांनी साकारली आहेत. याच प्रयोगामध्ये शनीच्या ध्रुवावरील हरिकेन वादळही संशोधकांना अनुभवता आले. शनीच्या वातावरणातील विविध कण, अवकाशधूळ, चुंबकीय क्षेत्र आदींचा अभ्यास या यंत्रणांमार्फत करण्यात आला. शनीच्या सात चंद्रांचा शोध, त्याचप्रमाणे टायटन या चंद्रावर सापडलेला मिथेनचा समुद्र, नद्या, तळी हे कॅसिनीमुळे लागलेले महत्त्वाचे शोध आहेत.

संशोधकांना सर्वाधिक जिज्ञासा होती ती जीवसृष्टीबाबत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी अमिनो अ‍ॅसिड्स, कार्बन महत्त्वाचे असतात. त्याशिवाय इथे जीवसृष्टी अस्तित्वातच येऊ शकत नाही. शनीच्या कॅसिनी मोहिमेने आता अंतराळातील जीवसृष्टीबाबत एक नवीन शक्यता समोर आणली आहे. टायटनवरील मिथेनच्या नद्या, समुद्र याचा अभ्यास करताना तिथे जीवसृष्टीची शक्यता संशोधकांच्या लक्षात आली. त्याची अधिकृत घोषणाही ‘नासा’ने यापूर्वीच केली आहे. ही शक्यता पूर्णपणे नवीन आणि आगामी काळातील संशोधनाला वेगळी दिशा देणारी आहे.

या मोहिमेचा उल्लेख कॅसिनी असाच सर्वत्र होत असला तरी या मोहिमेत हायगन्स ही कॅसिनीची एक महत्त्वाची जोडीदार होती. या हायगन्स अंतराळकुपीने याच मोहिमेमध्ये टायटनवर प्रत्यक्ष स्थिरावून अंतराळ प्रयोगशाळेचे काम तिथेच केले. या कुपीने केवळ अडीच तासच काम केले पण त्या कामानेही टायटन आणि शनीसंदर्भात संशोधकांना नवीन दालनच खुले केले आहे.

टायटनप्रमाणेच एन्सेलाडस हा शनीचा आणखी एक महत्त्वाचा उपग्रह. या उपग्रहाच्या बाजूने जाताना कॅसिनीने नोंदविलेली निरीक्षणे पुन्हा अशीच कलाटणी देणारी ठरली. कॅसिनीने पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये एन्सेलाडसचा पृष्ठभाग चमकताना आणि त्याच्या पृष्ठभागातून पाण्याचे फवारे बाहेर फेकले जात असल्याचे दृश्य चित्रित झाले होते. पुन्हा एकदा यामुळे संशोधकांचे डोळे विस्फारले गेले आणि आणखी एक नवा उलगडा झाला. हे पाण्याचे फवारे खारट असून त्यात बर्फाच्या अंशाचाही समावेश असावा. हाच बर्फाचा अंश पुन्हा एकदा वातावरणातून खाली येत पृष्ठभागावर विसावतो तेव्हा त्याचे एक आवरण तयार होते. हेच आवरण कॅसिनीने टिपलेल्या छायाचित्रात चमकत होते. हा शोध पुन्हा एकदा संशोधकांना जीवसृष्टी अस्तित्वात असण्याच्या शक्यतेला पुष्टी देणारा ठरला. त्या बर्फाच्या आवरणाखाली किंवा मिथेनच्या नद्यांमध्ये तळाला जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली आहे.

या शोधाची तुलना आपल्याला भारताच्या चांद्रयान मोहिमेशीही करता येईल. चांद्रयान मोहिमेमध्येही एक महत्त्वाचे उद्दिष्ट हे पाण्याचे अस्तित्व आणि जीवसृष्टीचे अस्तित्व शोधणे हेच होते. चांद्रयान मोहिमेत विवरामध्ये गोठलेल्या बर्फाच्या रूपात पाण्याचा अंश सापडला. जीवसृष्टीचे थेट अस्तित्व चंद्रावर सापडले नसले तरी बर्फ सापडणे हे जीवसृष्टीच्या अस्तित्वाला पुष्टी देणारे होते. फक्त फरक इतकाच की चंद्राचा पृष्ठभाग आणि शनीचा पृष्ठभाग यामध्ये महदंतर आहे. शिवाय शनीचे आपल्यापासूनचे अंतरही अधिक आहे. मात्र त्याच्या भोवती असलेल्या कडय़ांमुळे त्याच्या संदर्भातील शक्यताही इतर ग्रहांपेक्षा खचितच अधिक आहेत.

या अंतराळयानाचा अखेरचा प्रवासही तेवढाच रोचक होता. त्याचा निर्णय अतिशय जाणीवपूर्वक घेण्यात आला आणि अखेरच्या प्रवासाला यंदाच्या एप्रिल महिन्यात सुरुवात झाली. त्यासाठी त्याची मार्गक्रमणा ही कधी शनीच्या विविध कडय़ांमधून तर कधी शनी आणि त्याच्या भोवती असलेली कडी यांच्यामधून करण्यात आली. यामध्ये अंतराळधुळीबाबत कॅसिनीने नोंदविलेली निरीक्षणे भविष्यात खूप महत्त्वाची ठरणार आहेत. कारण आजवर शनीचे आणि त्याच्या कडय़ांचे एवढय़ा जवळून चित्रणच झालेले नाही. त्यामुळे नव्या शक्यतांचे एक महादालनच खुले होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी आपल्यापासून १.२ दशकोटी किलोमीटर्स अंतरावर आहे. एवढय़ा लांबवरचा असा यशस्वी प्रवास आजवर मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही यानाने केलेला नाही. त्यामुळे कॅसिनी ही मानवी बुद्धिमत्तेची अंतराळझेपच ठरली आहे!

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

First Published on September 22, 2017 1:07 am

Web Title: space research
  1. No Comments.