24 February 2019

News Flash

कणा आणि बाणा

सध्या बदललेल्या बैठय़ा जीवनशैलीमुळे माणसाला अनेक विकारांना सामोरे जावे लागते आहे.

व्यायामादरम्यान वाकलं तरच लवचीक कणा ताठ राहतो.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab
‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा..’ ही कुसुमाग्रजांची कविता पाठीच्या कण्याबरोबरच, त्यासोबत येणाऱ्या लढाऊ बाण्याचंही महत्त्व तेवढंच अधोरेखित करते. पाठीचा कणा हा असा आपल्या बाण्याशी जोडला गेला आहे. म्हणून तर मराठी माणसाचं वर्णन करताना ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा शब्दप्रयोग आवर्जून केला जातो आणि अशा प्रकारचा बाणा दाखविणाऱ्याचं कौतुकही समाजामध्ये केलं जातं. कौतुक म्हणून ते ठीक आहे, पण पाठीचा कणा मोडणे हे काही चांगले लक्षण मुळीच नाही. मुळात माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो, त्यात पाठीच्या कण्याचे अस्तित्व महत्त्वाचं आहे. तो पृष्ठवंशीय प्राणी आहे; पण वस्तुस्थिती अशी की, आपण पृष्ठवंशीय आहोत, याचाच विसर गेल्या काही दशकांमध्ये आपल्याला पडलेला दिसतोय. परिणामी पाठीच्या कण्याच्या समस्यांमध्ये दिवसागणिक मोठय़ा प्रमाणावर वाढ होत चाललेली दिसते. त्यातही अधिक वाईट वाटावं असा भाग म्हणजे ‘पाठ आहे तर दुखणारच’ हा चुकीचा दृष्टिकोन. हा दृष्टिकोनच पाठीच्या कण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीशी थेट जोडलेला आहे.

सध्या बदललेल्या बैठय़ा जीवनशैलीमुळे माणसाला अनेक विकारांना सामोरे जावे लागते आहे. त्यातही जीवनशैलीला नावं ठेवून आपण मोकळे होतो आणि आपलं काय चुकतंय याकडे आपण लक्षच देत नाही. याचा दोष जातो तो आपल्या शिक्षण पद्धतीकडे. कारण शालेय जीवनात आपण शारीरिक शिक्षणाच्या तासाला आजवर कधीच महत्त्व दिलेलं नसतं. आपण ना त्या विषयाला महत्त्व देतो, ना त्या विषयाच्या शिक्षकाला. तो तास म्हणजे इतर ‘महत्त्वाचे विषय’ शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वापरण्याच्या तासिका म्हणून आपण त्या विषयाकडे पाहतो. शारीरिक शिक्षणाची आबाळ हे आपल्या जीवनशैलींविषयक सर्वच विकारांमध्ये वाढ होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे; पण आपण हे लक्षातच घेत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदकांची पाटी कोरी राहाते तेव्हा फक्त आपण पदकांची पोटी कोरी का, अशी चर्चा करतो. अलीकडे त्या पाटीवर काही पदके तरी असतात ही जरा त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट; पण त्यातही असे लक्षात येईल की, पदके मिळविणारे खेळाडू त्यांचा फिटनेस जिवापाड जपतात. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा (फिफा) सुरू आहे. त्यात आता प्रशिक्षक झालेला माजी खेळाडू पाहा, त्यांचा फिटनेस पाहा. अन्यथा आपल्याकडे माजी खेळाडू प्रशिक्षक होतात तेव्हा अनेकांची पोटं सुटलेली असतात. सुटलेली पोटं हे पाठीच्या दुखण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण; पण शालेय जीवनात आपल्याला शरीररचनाशास्त्रही कुणी समजावून सांगत नाही. ते वेळीच कळले तर नंतरचे शारीरिक अपघात आयुष्यात टळू शकतात. आपण केवळ बोलण्यापुरता पाठीचा कणा अधिक वापरतो आणि त्याची काळजी मात्र घेत नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, पाठीच्या कण्याचा थेट संबंध हा आपल्या मनोवृत्तीशी आहे. मन हे याच शरीराच्या कुडीमध्ये वास करते. त्यामुळे शरीर चांगले व सुदृढ; तर मन सक्षम असण्याची शक्यता अधिक. पाठीच्या कण्याबाबतीत बोलायचे तर आता ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा शब्दप्रयोग बदलण्याची वेळ आली आहे, हे लक्षात ठेवायला हवे. व्यायामादरम्यान वाकलं तरच लवचीक कणा ताठ राहतो. म्हणून नवी म्हण स्वीकारू या-

‘वाकेन पण मोडणार नाही!’

First Published on July 13, 2018 1:07 am

Web Title: spinal cord