गेल्या आठवडय़ात, २८-२९ सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोर तळांवर सर्जकिल पद्धतीने हल्ला चढवीत कारवाई केली. तेव्हापासून सुरू झालेला घटनाक्रम प्रस्तुत मथितार्थ लिहितानाही सुरूच आहे. सर्वप्रथम हा सर्जकिल स्ट्राइक नाकारण्याची भूमिकाच पाकिस्तानने रेटून धरली. त्यानंतर युनोमध्ये एक आणि प्रत्यक्षात दुसरीच अशी भूमिकाही घेण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानातील राजकारण आणि लष्कर हे मुळातच दहशतवाद आणि भारतद्वेषावर पोसले गेले आहे. त्यामुळे साहजिकच होते की, पाकिस्तानवर  नामुश्कीची वेळ आली. सर्जकिल स्ट्राइकमुळे नाचक्की झालेले पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्याकडून बदला घेण्याच्या भावनेने हल्ला होणे अपेक्षितच होते. झालेही तसेच, रविवार मध्यरात्री बारामुल्ला येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र लष्कर आणि बीएसएफचे जवान यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. खरे तर या हल्ल्याच्या काही तास आधी पाकिस्तानने एक डाव साधण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा एक प्रयत्न केला होता. त्यांच्या सुरक्षा सल्लागारांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी संपर्क साधला होता. कदाचित हल्ल्यापूर्वी केलेली ती एक वेगळी मोच्रेबांधणी असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेली अनेक वष्रे दहशतवादाचे सातत्याने बळी ठरल्यानंतर एक जोरदार प्रत्युत्तर भारताने दिलेच पाहिजे, असे वाटणाऱ्यांची संख्या वाढत होती. खास करून मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर भारतीयांच्या बाजूने युद्धज्वरामध्ये वाढच झाली होती. प्रत्यक्ष युद्ध तर केवळ अशक्य कोटीतीलच आहे. कारण युद्धाचे भयानक आणि इतरही परिणाम दोन्ही देशांना चांगलेच ठाऊक आहेत. युद्धसदृश हल्ल्याची भावना उरी येथील हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात बहुसंख्येने व्यक्त झाली होती. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी केलेल्या ज्या  भाषणाचा हवाला मंडळी देत होती, त्या भाषणात ‘त्यांनी हल्ले करायचे आणि आम्ही मात्र केवळ प्रेमपत्रेच पाठवायची हे अमान्य’ असल्याचे मोदी तेव्हा म्हणाले होते. पण अर्थात निवडणुकीसाठी केलेली वक्तव्ये आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात भेद असतो, याची कल्पना त्यांनाही पंतप्रधान झाल्यानंतर आलेली असेलच. कारण त्यांचे उरी हल्ल्यानंतरचे भाष्य तसे संयतच होते. मात्र वेळ येताच कारवाई करू, असे सांगत त्यांनी जनभावनेची दखलही घेतली होती. सर्जकिल स्ट्राइक हा जेवढा पाकिस्तानसाठी धक्का होता तेवढाच तो भारतीय जनतेसाठीही धक्काच होता, फरक इतकाच की, तो भारतीयांसाठी आश्चर्याचा धक्का होता. कित्येक वर्षांनंतर भारताने प्रत्यक्ष भूमीवर पाकिस्तानला असा जोरदार धक्का दिला. यादरम्यान दाखविलेली मुत्सद्देगिरीही वाखाणण्याजोगी होती. ही पाकिस्तानविरुद्धची कारवाई नाही तर दहशतवादाविरोधातील कारवाई आहे, शिवाय पाकव्याप्त काश्मीर ही मूळ भारतीय भूमी आहे, अशी  भूमिका होती. त्यामुळेच पाकिस्तानी सन्यावर हल्ला न करताच जवान परतले. मात्र मार्गात आडवे आलेल्या पाकिस्तानी जवानांना त्यांनी कंठस्नान घातले. दहशतवादविरोधातील कारवाई करताना जो आडवा येईल, त्यालाही आडवेच करणार हा संदेश होता त्यामागे. शिवाय हे सर्व करताना ही मूळ भारतीय भूमीच आहे हा संदेशदेखील आपण अप्रत्यक्षपणे दिला, हेही तेवढेच महत्त्वाचे होते. ज्या नेमकेपणाने ही कारवाई करण्यात आली, त्याबद्दल भारतीय लष्कराचे कौतुकच आहे. त्यांनी म्यानमारमध्येही अशाच प्रकारचे सर्जकिल ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले होते. हा सर्जकिल स्ट्राइक पाकिस्तानसाठी गंभीर संदेशच आहे. पण म्हणून आता जरा जरी आगळीक केली तरी थेट युद्धच या भ्रमात कुणीच राहू नये.

खरे तर लष्कराचे जेवढे कौतुक करण्यात आले तेवढेच कौतुक दाखविलेल्या मुत्सद्देगिरीबद्दल भारतीय मुलकी अधिकाऱ्यांचेही व्हायला हवे. कारण त्यांच्या चालींमुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडण्यात भारताला यश आले आणि पाकिस्तानविरोधात जनमत तयार झाले. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साधून भारताने वरचष्मा राखला. यातील मुत्सद्देगिरीतील यश खूप महत्त्वाचे आहे, कारण तिथे अनेकदा आपल्याला अपयशच अधिक आले आहे. या खेपेस मात्र तसे घडले नाही. युनोमध्ये काश्मीर-प्रश्न उपस्थित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आपण हाणून पाडला. त्याचप्रमाणे सार्क परिषदेस अनुपस्थित राहण्याचा घेतलेला निर्णय आणि भारतापाठोपाठ नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांनीही अंग काढून घेतल्याने परिषदच पुढे ढकलण्याची पाकिस्तानवर आलेली नामुश्की हे भारतीय मुत्सद्देगिरीचेच यश होते.

त्याहीआधी सिंधू कराराचा प्रश्न उपस्थित करून त्या पातळीवरही भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. करार नाकारणे भारताला शक्य नाही, पण आपल्या बाजूला उपलब्ध असलेले पाणी पूर्णपणे वापरणे ही भारताची चांगली चाल होती. भारताचे यश अधोरेखित झाले ते चीनने पाकिस्तानच्या बाजूने चाल खेळल्यानंतर. सर्वप्रथम चीनने ब्रह्मपुत्रेवर बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा मुद्दा उकरून काढला. भारताला मिळणाऱ्या पाण्यावर त्याचा परिणाम होणार आहे. दुसरीकडे मसूद अझहर याला दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव चीनने तांत्रिक कारणांवरून पुढे ढकलला आहे. चीनचे हे दोन्ही निर्णय भारताविरोधात असले तरी ते भारतीय मुत्सद्देगिरीचे यशच अधिक अधोरेखित करतात.

आता भारतासमोर आव्हान आहे ते पाकिस्तान आणि चीन या दोघांचीही विविध पातळ्यांवर कोंडी करण्याचे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने वेगवेगळी पावले एकाच वेळेस वेगवेगळ्या पातळ्यांवर उचलावी लागतील. त्याचप्रमाणे चीनचीही कोंडी करावी लागेल. जोपर्यंत या दोन्ही देशांची कोंडी आíथक पातळीवर होणार नाही, तोवर त्यांच्यावर फारसा कोणताही परिणाम होणार नाही. सद्य:परिस्थितीत परकीय गंगाजळी सर्वाधिक असणारा चीन हा महत्त्वाचा देश आहे. त्यांचे स्वप्न आहे महासत्ता होण्याचे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या अर्थव्यवस्थेला अनेक धक्के बसले असून त्याचा थेट फटका चीनला बसला आहे. त्यामुळे आता त्यांनी व्यापारावर लक्ष केंद्रित केले असून केवळ अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहेत. या प्रयत्नांना खीळ बसेल असे बदल आपल्या ध्येयधोरणात केल्यास त्याची गंभीर दखल घेणे चीनला भाग पडेल. चीनचा सुमारे ८० टक्क्यांहून अधिक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. त्यामुळे त्यांच्या सागरी सत्तेला आव्हान निर्माण होणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत सरकारला या दोन्ही देशांशी विविध पातळ्यांवर लढा द्यावा लागणार आहे. त्यातील बहुतांश लढा हा प्रत्यक्ष रणभूमीवर न होता तो मुत्सद्देगिरीच्या मार्गाने द्यावा लागेल. पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेणे हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग आहे. चीनविरोधात खेळी करतानाही आग्नेय आशियातील लहान-मोठे देश आपल्यासोबत राखणे आणि त्यांतही त्यांना अप्रत्यक्षपणे चीनविरोधात उभे करण्याचे कामही करावे लागेल. ज्या ब्रह्मपुत्रेच्या मुद्दय़ावरून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न चीनने केला, तीच ब्रह्मपुत्रा बांगलादेशासाठी भारतापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. कारण त्यांच्यासाठी तर ती जीवनरेखा आहे. त्यामुळे बांगलादेश आपल्यासोबत राहिला तर त्याचा फटका चीनला बसू शकतो. कारण बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांचा वापर स्वत:च्या व्यापारी फायद्यासाठी करून घेण्यात चीनला सर्वाधिक रस आहे. त्यामुळे चीनची व्यापारी कोंडी करणे त्याच वेळेस त्यांच्या सागरी महत्त्वाकांक्षेलाही आळा घालून आपले सागरी बळ वाढविणे, हा महत्त्वाचा उपाय असू शकतो.

हे सारे करीत असताना गेल्या अनेक वर्षांमध्ये भारत अमेरिकेच्या अधिक जवळ आणि दुर्बळ झालेला पूर्वापार मित्र असलेल्या रशियापासून दूर जातो आहे. त्याच वेळेस रशिया, चीन आणि पाकिस्तान यांची मत्री वाढीस लागली आहे. हा त्रिकोण भारतासाठी तापदायक ठरू शकतो. त्यामुळे याही बाबतीत भारताला अधिक सावध राहावे लागणार आहे. पूर्वापार मित्र असलेल्या रशियाला किमान चीन आणि पाकिस्तानसोबत जाण्यापासून रोखणे हे महत्त्वाचे असणार आहे.

आता तर युरोपलाही दहशतवादाचे चटके सातत्याने अनुभवावे लागत आहेत. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये पाकिस्तानविरोधात वातावरणनिर्मिती करणेही आंतरराष्ट्रीय स्तरावर तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. सध्या आपण एका वेगळ्याच मानसिकतेत वापरतो आहोत. दसऱ्यापूर्वी आपण सीमोल्लंघन साजरे केल्याचे अनेकांना वाटते आहे. भारताला मुत्सद्देगिरी आणि सर्जकिल स्ट्राइकमुळे मिळालेले यश यामुळे सामान्यांमध्ये युद्धज्वर वाढला आहे. त्या आगीत तेल ओतण्याचेच काम प्रसारमाध्यमे विशेषत: दृक्श्राव्य माध्यमे करीत आहेत. सतत विषय २४ तास चघळत राहणे व टीआरपी कायम ठेवणे हा त्यांचा व्यवसाय आहे, हे ध्यानात ठेवायलाच हवे. विवेकापासून फारकत घेणाऱ्या प्रसारमाध्यमांपासून मुत्सद्देगिरीसंदर्भातील निर्णय घेणाऱ्यांनीही स्वत:ला वेगळे ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, जे दिसते आहे तेच वास्तव अशी समजूत झाल्यास निर्णय चुकण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सध्या मिळालेल्या यशाने हुरळून जाण्यात अर्थ नाही. मुत्सद्देगिरीचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे होत असते. ते आपल्याच दिशेने सातत्याने झुकणे सर्वाधिक महत्त्वाचे असेल त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. वेळ आहे ती अष्टावधानी राहण्याची आणि समर्थ रामदास यांनी सांगितल्यानुसार ‘सावधपण सर्वविषयी’ हे लक्षात ठेवण्याची!
vinayak-signature
विनायक परब –
vinayak.parab@expressindia.com, @vinayakparab