X

तिबेटचे त्रांगडे!

तिबेटी जनतेसाठी दलाई लामा म्हणजे सर्वेसर्वा.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

तिबेटी जनतेसाठी दलाई लामा म्हणजे सर्वेसर्वा. सध्याच्या १४ व्या लामांचे नेतृत्व हे तिबेटी जनतेने राजकीय व धार्मिक नेतृत्व म्हणूून स्वीकारले आहे. दलाई लामांनंतर तिबेटी जनता सर्वाधिक मानते ती कर्माप्पा यांना. कर्माप्पा आणि दलाई लामा ही नावे नसून ती बिरुदे आहेत. दलाई लामा याचा अर्थ ‘शहाणपणाचा सागर’. दलाई लामा हे तिबेटी परंपरेतील सर्वोच्च गुरू मानले जातात. तसाच मान कर्माप्पा यांनाही आहे. तिबेटमध्ये चीन सरकारने सुरू केलेल्या अनन्वित अत्याचारांनंतर विद्यमान १४ वे दलाई लामा यांनी १९५९ साली भारतात आश्रय घेतला, इथूनच ते तिबेटचे विजनवासातील सरकार चालवतात. दलाई लामा यांनी तिबेट सोडल्यानंतर तिथे असलेल्या १६ व्या कर्माप्पांकडे चीन सरकारने धार्मिक अधिकार बहाल केले होते. त्यांच्या निधनानंतर १७ वे कर्माप्पा ओग्येन त्रिन्ले दोर्जे यांची निवड झाली. १९९९ सालच्या अखेरीस त्यांनीही तिबेट सोडून भारतात आश्रय घेतला. चीन सरकारच्या दडपशाहीमुळे हे पाऊल उचलले, असे कर्माप्पा यांनी त्या वेळेस सांगितले होते. त्यांनी दलाई लामा यांची भारतात भेट घेतली आणि त्यांची मान्यताही मिळवली. ते ज्या तिबेटी काग्यू परंपरेमधून आले आहेत त्यांचा सर्वात महत्त्वाचा मठ भारतात सिक्किम येथे रुमटेक या ठिकाणी आहे. सध्या या कर्माप्पांच्या संदर्भातच वाद सुरू आहेत. या वादांचा भारताशी थेट संबंध आहे, म्हणूनच तिबेट, त्या संदर्भातील भारताची भूमिका आणि चीन हा त्रिकोण आपण समजून घेतला पाहिजे.

तिबेटी संस्कृतीची नाळ भारतातील बौद्ध धर्माशी जोडलेली आहे. ही आताची बाब नाही तर त्याचे पुरावे आपल्याला थेट पाचव्या-सहाव्या शतकापासून मिळतात. नवव्या-दहाव्या शतकानंतर भारतामध्ये ऱ्हास झालेले आणि मुस्लीम आक्रमणानंतर संपुष्टात आलेले बौद्ध तत्त्वज्ञान जपले ते याच तिबेटने. मूळ बौद्ध तत्त्वज्ञान सातव्या शतकापासून ते १५ व्या शतकापर्यंत तिबेटी भाषेत अनुवादित करून जतन करण्यात आले. आज हे ग्रंथ भारतीय भूमीवर नाहीत. त्यामुळे आता बौद्ध तत्त्वज्ञान आपण तिबेटी भाषेतून परत एकदा संस्कृतमध्ये आणण्याचे काम करीत आहोत. त्या प्रकल्पाला आता सुरुवात झाली आहे.

भौगोलिकदृष्टय़ा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिबेट हा बफर झोन आहे. म्हणजे चीन आणि भारत यांच्यामधील त्रयस्थ प्रदेश. मात्र आता हा प्रदेश चीनने पूर्णपणे काबीज केला असून संरक्षणाच्या दृष्टीने हा खूप मोठा धोका आहे. तिबेटी बौद्ध भिक्खू आणि जनतेवर चीनने अनन्वित अत्याचार केले. सध्या तिबेटी जनता ‘स्वतंत्र तिबेट’साठी लढा देते आहे. दलाई लामांनी भारतात घेतलेला आश्रय ही चीनसाठीची मोठीच अडचण आहे. दलाई लामा तत्त्वज्ञानाच्या नवमांडणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे पाठीराखे जगभर आहेत. त्यांना टाळणे चीनला अशक्य आहे. मात्र त्यांचेही आता वय झाले आहे. त्यांच्यानंतर कोण, हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. अशा वेळेस त्यांच्यानंतरचे नेतृत्व म्हणून चीन सरकार १७ व्या कर्माप्पांकडे पाहते आहे, असे संरक्षण आणि मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील अनेकांना वाटते आहे. किंबहुना म्हणूनच २००० साली कर्माप्पांचे भारतात येणे यासाठी त्यांनी स्वत: चीन सरकारची दहशत असे कारण दिलेले असले तरी ते चीन सरकारचे हस्तकच आहेत, असा आरोप आहे. किंबहुना म्हणूनच दलाई लामा यांनी त्यांना आश्रय व मान्यता दिलेली असली तरी भारत सरकार मात्र त्यांच्या बाबतीत ताकही फुंकूनच पिते आहे.

कर्माप्पा आताच चर्चेत येण्याचे कारण म्हणजे गेल्या शनिवारी त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून त्यांच्यावर घालण्यात आलेल्या र्निबधांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. आपल्याला राजकारणात रस नाही, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. गेल्या मे महिन्यात ते न्यू यॉर्कला गेले. त्यांच्या कार्यक्रमावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय बारकाईने नजर ठेवून आहे. त्यांना भारतात लवकर परतण्याविषयी विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी ती जुमानलेली नाही. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये १८९३ साली नोव्हेंबर महिन्यात केलेले भाषण विशेष गाजले होते. त्याचा सोहळा अलीकडे प्रति वर्षी साजरा केला जातो. आता या सोहळ्यानंतरच आपण परतू, अशी भूमिका कर्माप्पांनी घेतली आहे. काही ना काही कारण पुढे करून ते विदेशातील वास्तव्य वाढवीत असतात, असे लक्षात आले आहे. तर दुसरीकडे दलाई लामा मात्र पूर्णपणे भारत सरकारच्या सर्व विनंत्या मान्य करताना दिसतात. त्यामुळे कर्माप्पांबद्दलचा संशय अधिक बळावत चालला आहे. हा सारा गुंता समजून घेण्यासाठी आधी दलाई लामा यांच्या संदर्भातील पाश्र्वभूमीही समजून घ्यायला हवी.

दलाई लामा आणि बौद्ध तत्त्वज्ञान लोकप्रिय ठरले ते दोन महायुद्धांच्या पाश्र्वभूमीवर. दोन महायुद्धांनंतर जगाने युद्धाचा धसका घेतला होता आणि खासकरून युरोप-अमेरिका शांतीच्या शोधात होते. अशा वेळेस त्यांना शांती व अिहसेच्या मार्गाने जाणारे तत्त्वज्ञान दलाई लामा यांनी लक्षात आणून दिले. त्या आधी तिबेट नावाचा देश या जगात अस्तित्वात आहे, याचीही फारशी कल्पना अनेकांना नव्हती. मात्र दलाई लामांनी जगभर भ्रमंती करून त्याची जाणीव जगाला करून दिली. चीनच्या तिबेटमधील दहशतीविरोधात जागतिक पातळीवर जाणीवजागृती करणे हा त्यामागचा उद्देश होता. एका बाजूस हे सारे होत असताना दुसरीकडे रशिया विघटनाच्या उंबरठय़ावर उभी होती. त्या वेळेस महासत्ता असलेल्या अमेरिकेला दूरदृष्टीने चीन हा भविष्यातील स्पर्धक आहे, हे पुरते लक्षात आले होते. रशियाची काळजी करण्याचे कारणच विघटनानंतर फारसे राहिले नव्हते. त्या वेळेस अमेरिकेने आपला मोहरा चीनकडे वळवला आणि दलाई लामा यांचे कार्य पुढे करून चाल खेळण्यास सुरुवात केली. १९८९ साली दलाई लामा यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल पुरस्कारामागे अमेरिकेने केलेली मोर्चेबांधणी प्रामुख्याने कारणीभूत होती. या पुरस्कारानंतर त्यांचे नाव व कार्यकर्तृत्व जगभरात पोहोचले. चीन सरकारच्या दुखऱ्या नसेवर अमेरिकेने नेमके बोट ठेवले होते. अर्थात हे सारे आरोप दलाई लामा यांना ठाऊक नसते तरच नवल. एका मुलाखतीत ते म्हणालेही की, कोणाचा काय उद्देश आहे याच्याशी माझे देणे-घेणे नाही. मी हे सारे करतो ते बौद्ध तत्त्वज्ञान आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी. माझा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे! त्यामुळे मी त्याची का चिंता करावी!

दलाई लामा यांचा दुसरा विशेष म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये कडवटपणा नाही आणि असलेली सौम्यता हीदेखील प्रसंगी धारदार असते. आमची करुणा म्हणजे आमच्यातील कमतरता नव्हे, कारण ती आमच्याकडे असलेल्या धैर्यामधून आलेली आहे. जो धैर्याने बलशाली असतो त्यानेच दाखविलेल्या करुणेला अधिक अर्थ असतो. या व अशा अनेक विधानांनी त्यांनी तरुणांच्या मनात अंगार फुलवले. त्यावर चीन सरकारकडे कोणताच उपाय सध्या तरी नाही. पण चीन सरकारचे लक्ष दलाई लामांनंतरच्या तिबेटकडे आहे. चीनला त्यांची भूमिका पुढे नेणाऱ्या विचारांचे धार्मिक नेतृत्व नंतर थेट तिबेटमध्ये हवे आहे, त्यासाठी ते कर्माप्पांवर लक्ष ठेवून आहे.

तिबेट स्वतंत्र असणे ही संरक्षणाच्या दृष्टीने भारतासाठी मोठीच जमेची बाजू असणार आहे. खरे तर १९५४ साली अशी तिबेटबाबत भूमिका घेण्याची आलेली संधी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी घालविली. त्यामुळे आता आपण तिबेटी जनतेला आश्रय दिलेला असला तरी पूर्णपणे त्यांची बाजू घेणे आपल्याला आजही कठीण जाते. म्हणून तर चीनने व्यापारावरील र्निबधांची धमकी दिल्यानंतर आपण दलाई लामांचा अरुणाचलमधील दौरा रद्द केला. १७ वे कर्माप्पा अवघे ३३ वर्षांचे आणि प्रभावशाली नेतृत्व आहे. त्यांनाही न दुखावता त्यांच्या मनीचे किंवा चीनच्या मनीचे जाणून त्यानुसार भारत सरकारला आपली शहाणपणाची खेळी खेळावी लागणार आहे, त्यावर भविष्यातील भारत-चीन संबंध अवलंबून असतील!

First Published on: August 31, 2018 1:08 am