18 July 2019

News Flash

एन्काऊंटर

अवनीच्या या एन्काऊंटरमध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत.

प्राणिवर्तनशास्त्र असे सांगते की, सर्वसाधारणपणे बिबळ्या असो, वाघ किंवा अगदी अगडबंब असलेला हत्तीदेखील, हे प्राणी माणसाला घाबरतात.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
साधारणपणे ९० चे दशक हे एन्काऊंटर्स अर्थात पोलीस चकमकींसाठी गाजलेले होते. पोलीस चकमक ही तशी नेहमीचीच झालेली होती. त्यानंतर पोलिसांवर खोटी चकमक घडवून आणत असल्याचा आरोप झाला. त्याची न्यायालयीन चौकशीही पार पडली. सर्वच चकमकींचा तपशील साधारणपणे सारखाच असायचा. अमुकतमुक नाव असलेला गुंड हा नामचीन असून अनेक गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. सुरुवातीस त्याला स्वत:हून पोलिसांच्या हवाली करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर त्याला इशारा देण्यात आला. मात्र तो न जुमानता त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. अखेरीस पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये तो गुंड ठार झाला. काही वृत्तांमध्ये तो रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित व्हायचे, तर काही ठिकाणी उपचारादरम्यान मृत एवढाच काय तो फरक. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे अवनी नावाच्या वाघिणीचे वन खात्याने खासगी शार्प शूटरच्या मदतीने घडवून आणलेले एन्काऊंटर!

एन्काऊंटर म्हणण्याचे कारण म्हणजे इथेही वन खात्याने केलेल्या बतावणीनुसार वाघिणीने त्यांच्या टीमच्या दिशेने झेप घेतली आणि स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये ती मृत झाली. तिला गोळी घालण्यापूर्वी कायदेशीरदृष्टय़ा सर्व आवश्यक त्या गोष्टी पार पाडण्यात आल्या होत्या. म्हणजे तिला बेशुद्ध करण्यासाठी डार्टही डागण्यात आला होता. मात्र त्यात यश आले नाही वगैरे. कारण ही अट सर्वोच्च न्यायालयानेच घातलेली होती. फक्त वन खाते तिला ‘‘आता स्वत:ला आमच्या हवाली कर’’ एवढे सांगू शकत नव्हते आणि बिचाऱ्या तिला यांची भाषा ती काय कळणार? एवढाच काय तो फरक. गोळ्या घातल्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच ती मृत झालेली होती. अगदी पोलिसांच्या एन्काऊंटरला शोभेल आणि तसेच्या तसे लागू होईल असेच हे वर्णन. फरक इतकाच की, इथे नामचीन गुंडाऐवजी एक वाघीण होती, जिला १० महिन्यांचे दोन बछडेही आहेत. या एन्काऊंटरनंतर यापूर्वी भेदरलेल्या गावांमध्ये म्हणे दिवाळी साजरी करण्यात आली. ..पण पुन्हा हल्ला झाला तर..

प्राणिमित्रांनी या घटनेनंतर देशभरात रान उठवले ते आवश्यकच होते. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असली तरी ती परवानगी म्हणजे मनुष्य-प्राणी संघर्ष टाळण्यात वन खात्याला आलेले सपशेल अपयशच आहे, यात शंकाच नाही. महत्त्वाचे म्हणजे ज्या वाघिणीने १३ जणांचा बळी घेतल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला त्यातील फार तर पाचच मृत्यू थेट तिच्यामुळे झाल्याचा संशय आहे. हे मृत्यूही तिच्याचमुळे झाले होते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा थेट सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही. साधारणपणे प्राण्यांच्या विष्ठेचे विश्लेषण केले की, त्यांनी नेमके काय खाल्ले आहे याचा अंदाज येतो. अवनीच्या बाबतीत तेराच्या तेरा हल्ल्यांनंतरचे विष्ठेचे विश्लेषण उपलब्ध नाही. म्हणूनच पाच हल्ले तिच्याकडून झाले असावेत, असे विधान करण्यात आले. हे एन्काऊंटर तसे तुलनेने सोपे होते, असे वन खात्याला व वन आणि पर्यावरणमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाटू शकते, कारण वाघ काही जाब विचारायला येणार नाहीत; पण प्राणिमित्रांनी मात्र वन खात्याला धारेवर धरले. अखेरीस केंद्राची एक व राज्याची दुसरी अशा दोन चौकशी समित्यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवाय याला एन्काऊंटर म्हणण्याचे आणखीही एक महत्त्वाचे कारण आहे. अवनीचा शवविच्छेदन अहवाल ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रकाशात आणला आहे. या अहवालामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे जी हे एन्काऊंटरच होते याकडेच निर्देश करणारी आहे. शवविच्छेदन अहवाल हा न्यायवैद्यकशास्त्रावर आधारलेला असतो. हा अहवाल कुणाचाही मृत्यू नेमका कशा प्रकारे झाला, यावर शास्त्रीयदृष्टय़ा प्रकाश टाकतो आणि हा अहवाल न्यायालयामध्ये पुरावा म्हणूनदेखील वापरला जातो. केवळ त्यावर आधारून एखाद्याला न्यायालय शिक्षा ठोठावते एवढे अनन्यसाधारण महत्त्व या अहवालाला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने या अहवालातील माहिती उघडकीस आणली असून त्यानुसार अवनीवर गोळी झाडण्यात आली त्या वेळेस ती हल्ला करत नव्हती, तर किंबहुना ती माघारी जात होती, असे लक्षात आले आहे. तिला गोळी ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने लागली आहे, त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तिने हल्ला केला म्हणून स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला हे विधान त्यामुळे शुद्ध बनाव ठरते.

अवनीच्या या एन्काऊंटरमध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत. ते समजून घेण्यासाठी प्राणिशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्रातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. मनुष्य आणि प्राणी हा संघर्ष काही केवळ आधुनिक युगातच सुरू आहे असे नाही. मात्र आधुनिक काळामध्ये तो वाढला आहे. त्याचे महत्त्वाचे कारणही माणसाशीच संबंधित आहे, कारण माणसाने जंगलांवर अतिक्रमण केले आहे. प्राण्यांनी भक्ष्यशोधार्थ जंगलाबाहेर येण्याचे कारणही माणसाशीच संबंधित आहे, कारण आपणच जंगले आक्रसत चाललो आहोत. प्राणी पूर्वी जसे वागत होते, तसेच वागत आहेत. त्यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. मात्र स्वार्थापोटी माणसाच्या वर्तनात अनेक बदल झाले आहेत, ज्यामुळे प्राण्यांवर संक्रांत आली आहे.

प्राणिवर्तनशास्त्र असे सांगते की, सर्वसाधारणपणे बिबळ्या असो, वाघ किंवा अगदी अगडबंब असलेला हत्तीदेखील, हे प्राणी माणसाला घाबरतात. बिबळ्या हा तर माणसाला सर्वाधिक घाबरणारा प्राणी आहे. मग बिबळ्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त येते तेव्हा नेमके काय झालेले असते? याचाही संशोधनात्मक अभ्यास झाला आणि असे लक्षात आले की, सर्वच्या सर्व हल्ले हे बसलेल्या अवस्थेतील माणसांवर झाले आहेत. ही मंडळी नैसर्गिक विधीसाठी बसलेली असतात. त्या वेळेस लहान मुले किंवा बसलेल्या अवस्थेतील मंडळी म्हणजे लहान प्राणीच असावा असे त्याला वाटते आणि मग हल्ला होतो. हे आता शास्त्रीय अभ्यासाद्वारे पुरते सिद्ध झाले आहे. हे लक्षात आल्यानंतर जंगलाच्या आजूूबाजूला असलेल्या वस्तींमध्ये जनशिक्षण हाती घेण्यात आले आणि काळजी घेणाऱ्या सूचना नागरिकांना जारी झाल्या. त्याचा फायदा झाला आणि बिबळ्याचे हल्लेही कमी झाले.

वाघाच्या बाबतीत मात्र गोष्ट थोडी वेगळी आहे. हादेखील माणसाला घाबरणाराच प्राणी आहे. व्याघ्रसफारीमधील वाघ मात्र थोडे वेगळे व्यक्त होतात. संपूर्ण प्राण्यांच्या अन्नसाखळीमध्ये वाघ हा पिरॅमिडच्या सर्वात वरच्या टोकाला असलेला प्राणी आहे. याची त्याला स्वत:लाही कल्पना आहे. त्याच्यावर हल्ला करणारा दुसरा मोठा प्राणी अस्तित्वात नाही. शिवाय त्याला व्याघ्रसफारीमध्ये लोकांची, पर्यटकांची सवय झालेली असते. त्यामुळे तो रस्त्यावर थेट समोरच बसलेला दिसतो; पण मोकळ्या जंगलामध्ये मात्र वाघ दिसत नाही. कारण सफारीमधील वाघासारखे त्याचे वर्तन नसते. तिथे तो माणसाला घाबरणारा वन्यजीवच असतो. त्यामुळे तिथे त्याचा शोधच घ्यावा लागतो, सहज नजरेस पडत नाही.

हे लक्षात घेता अवनीवर अन्याय झाला आहे, हे सहज लक्षात येईल. आपण तिला समजूनच घेतलेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिला गोळ्या घालण्यात आलेल्या असल्या तरी हे आदेश खासगी व्यक्तीला तिला गोळ्या घालण्याची परवानगी देत नाहीत. त्यासाठी शासकीय किंवा लष्करी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वापर होणे गरजेचे होते. यापूर्वी काही वर्षांपूर्वी झालेल्या अशाच प्रकरणामध्ये कमांडोंची अधिकृत मदत घेण्यात आली होती. मात्र या खेपेस खासगी व्यक्तीला हे अधिकार बहाल करण्यात आले, कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे नाही.

या देशाला इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय संवेदनशील पंतप्रधान लाभल्या. त्यांच्याचमुळे तर या देशात व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला. महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षांशी सुरू असलेली चर्चा थांबवितानाही माझ्या देशात एका वाघाचा मृत्यू झाला आहे, ही माझ्यासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाची घटना आहे, असे सांगण्याचे धैर्य त्यांनी दाखविले होते. त्याच देशामध्ये अवनीला जेरबंद करण्याचे पुरेसे प्रयत्न न करताच शासकीय निर्णयाने गोळ्या घातल्या जाव्यात, यासारखे दुसरे दुर्दैव नाही! हे तर एन्काऊंटर होते थेट!

First Published on November 16, 2018 1:03 am

Web Title: tigress avni killing