23 October 2019

News Flash

पर्यटनाची कास!

भारतासारख्या देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे...

जगभरामध्ये सार्वजनिक-खासगी एकत्रीकरणातून पर्यटन सुरू आहे.

भारतासारख्या देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे; तसाच मोठा इतिहासही लाभला आहे. पर्यटनाच्या बाबतीत मुदलातच एवढे भरभरून मिळालेले आहे की, काहीच कमी पडू नये. मात्र वस्तुस्थिती अशी की, ज्यांच्याकडे निसर्गाचा वरदहस्त नाही किंवा म्हणावा तसा इतिहासही नाही, असे छोटेखानी देशही पर्यटनाच्या माध्यमातून मुबलक मिळकत उभी करतात. त्या माध्यमातून त्या देशांमध्ये समृद्धी येते, कारण जे थोडथोडके आहे ते व्यवस्थित सांभाळण्याचे, त्याचे चांगले सादरीकरण करण्याची कल्पकता आणि सातत्य त्यांनी राखलेले दिसते. तिथे येणाऱ्या पर्यटकांकडे ते खऱ्या अर्थाने अतिथी म्हणून पाहतात, त्यांचा आदर करतात, त्यांचे आदरातिथ्य करतात. ‘अतिथी देवो भव’ असे वाक्य लिहून ते खुंटीवर टांगून ठेवण्यात हे देश धन्यता मानत नाहीत. तो शब्दप्रयोग ते सत्यात आणतात.

एरवी पर्यटनाच्या संदर्भात एक शासकीय रड नेहमीच सुरू असते, ती म्हणजे पैसे नाहीत. शासनही त्यातून पुढे सरकायला तयार नाही आणि स्थानिक मंडळीही आपली मानसिकता बदलायला तयार नाही. शासनाने पायाभूत सुविधा पुरविणे आवश्यक असते. जगभरामध्ये सार्वजनिक-खासगी एकत्रीकरणातून पर्यटन सुरू आहे. त्याला अर्थशास्त्राचे उत्तम पाठबळही लाभले आहे. या एकत्रीकरणातून पैशांचा स्रोत सुरू झाला की, स्थानिकांनाही फायदा होतो आणि शासनाला तिथे बारीकसारीक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळालेला असतो, त्यांचे आर्थिक गणित त्यातून सुरू झालेले असते आणि अशा वेळेस मग तीच मंडळी अर्थचक्र फिरत राहील, याची काळजी घेतात. जगभरातील अनेक देशांना पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा महसूल हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत इतर क्षेत्रांपेक्षा मोठा आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या मुदलातील गोष्टी बऱ्याच कमी आहेत. आपल्याकडे अगदी उलट स्थिती आहे. पर्यटन करता येईल, अशा गोष्टी मुबलक उपलब्ध मात्र कल्पकतेची व अंमलबजावणीचीही वानवा. थोडे डोके चालवले तरी भागू शकते पण डोके चालवणार कोण, हाच यक्षप्रश्न आहे. भारतासारख्या देशामध्ये केवळ धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित केले तरी उत्तम महसुलाची सोय होऊ शकते. मात्र राजकारणापलीकडे आपली गणिते जात नाहीत. आपण धर्म राजकारणाला आणून जोडण्यातच धन्यता मानतो. त्या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे आहे. पर्यटन हा ‘लोकप्रभा’च्याही जिव्हाळ्याचाच विषय आहे. त्यामुळे दर खेपेस पुनरुक्ती टाळून वेगळे काही देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो. या खेपेस ‘अभयारण्यांच्या वेगळ्या वाटा’च्या माध्यमातून आम्ही ईशान्य भारतातील जंगलांकडे लक्ष वेधले आहे. एरवी पर्यटनाचा विचार करताना ओडिशाच्या वाटय़ाला दुजाभाव येतो, तो अन्यायही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ‘भव्यदिव्य वास्त’ूमध्ये जगातील प्रमुख पाच ठिकाणे आम्ही खास वाचकांसाठी सादर केली आहेत. यंदा महाकुंभ आहे. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक सोहळा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र भाविक वगळता भारतीय पर्यटकांची असलेली संख्या तशी कमीच असते. याकडे पर्यटनाचा महाकुंभ म्हणूनही पाहणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष वेधण्याचे कामही ‘लोकप्रभा’ करीत आहे. या सर्व प्रयत्नांतून तो अतिथी खरोखरच देव ठरण्याच्या दिशेने पुढे पावले पडोत आणि पर्यटनाची कास पकडून समृद्धीही देशात नांदो, हीच सदिच्छा!पर्यटनाची कास!

First Published on February 22, 2019 1:07 am

Web Title: tour and travel