महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या प्रक्रियेने आता पन्नाशी गाठायचीच बाकी आहे, देशपातळीवरही शहरीकरणामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. या साऱ्याची खूणगाठ आपण विकास आणि ‘अच्छे दिन’शी घातली असून वाढता विकास आणि महासत्तेचे स्वप्नही त्याच वेळेस आपल्याला खुणावते आहे. पण या साऱ्याच्या पलीकडे असलेले प्रदूषणाने काळवंडलेले आकाश आणि त्याचबरोबर शहरवासीयांमधील आजारांचे वाढते प्रमाण याकडे मात्र हेतुत: दुर्लक्षच होत आहे. या काळवंडलेल्या प्रदूषित आकाशाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेस आणि विकास दरास बसणार आहे, याचाही विसर आपल्याला पडलेला दिसतो. एक माणूस आजारी पडला तरी त्याचा अल्पांशी का होईना फटका अर्थव्यवस्थेला बसतो हा खरे तर कोणालाही थेट लक्षात यावा असा मुद्दा आहे. आपण वास्तव मान्य करायलाही तयार नाही आणि दुसरीकडे हेतुपुरस्सर डोळेझाक सुरूच आहे.  कारण अद्याप आपण पर्यावरणाची होणारी हानी किंवा थेटच बोलायचे तर प्रदूषण आणि त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका याची व्यापक मोजणीच केलेली नाही. आपण केवळ अच्छे दिनच्या बाता करण्यात मश्गूल आहोत. आताच्या भारतीय पिढीला आजारी पाडणारे किंवा भविष्यातील पिढीला जन्मापासूनच व्यंग आणि आजारी बनविणारे ‘अच्छे दिन’ काय उपयोगाचे?

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुमारे पंधरवडाभर चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरामध्ये सर्व व्यवहार ठप्प होण्यासदृश अवस्था निर्माण झाली होती. वायुप्रदूषणाचे प्रमाण एवढे जबरदस्त वाढले होते की, सामान्य नागरिकांना श्वसनासाठी ऑक्सिजनची सिलिंडर्स विकत घ्यावी लागली. खरे तर तो आपल्यासाठी मोठाच धडा होता. चीनला लागलेल्या ठेचेमधून भारताने धडा शिकायला हवा होता. मात्र आपण तो शिकलो नाही. त्यामुळेच आता राजधानी दिल्लीमध्ये वाढलेल्या वायुप्रदूषणानंतर शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सामान्य दिल्लीकरांनाही महत्त्वाचे काम नसेल तर घरामध्येच बसून राहा, असे जाहीररीत्या सांगण्याची वेळ सरकारवर आली. बीजिंगसारखी अगदीच ऑक्सिजन सिलिंडर्स नव्हेत, पण सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या एअर प्युरिफायर्सची खरेदी करण्याची वेळ दिल्लीकरांवर आली आहे. हे स्मार्ट शहरांचे किंवा अच्छे दिनचे लक्षण मुळीच नव्हे!

हे सारे अनियोजित शहरीकरणाचे परिणाम आहेत. वायुप्रदूषण होणार नाही, याची काळजी हा नियोजनाचाच एक भाग असला पाहिजे. मात्र आपल्याकडे प्रदूषण प्रमाणाबाहेर गेले की, त्या वेळेस कायदा करण्याचा विचार आपण करू लागतो. अंमलबजावणीच्या नावाने तर नेहमीच आनंद असतो. हा मुद्दा केवळ सरकारचा नाही तर सर्वाचाच असल्याने वायुप्रदूषणामुळे नेमके काय होते ते सामान्य माणसानेही समजून घेणे आवश्यक आहे.

वायुप्रदूषण हे पार्टक्यिुलेट मॅटरमध्ये मोजले जाते. यालाच घनकण आणि द्रवकणांद्वारे होणारे  प्रदूषण असेही म्हटले जाते. धूळ, घाण, काजळी, धूर हे सारे डोळ्यांनी पाहता येते. पण काही घन व द्रवकण एवढे सूक्ष्म असतात की, त्यांना पाहण्यासाठी साध्या नव्हे तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचाच वापर करावा लागतो. हे मोजण्याचे एकक मायक्रोमीटर आहे. प्रामुख्याने १० मायक्रोमीटरपेक्षा कमी असलेल्या कणांना पीएम१० तर २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी असलेल्या कणांना पीएम२.५ म्हणतात. तुलनात्मकदृष्टय़ा पाहायचे तर आपल्या केसांची जाडी ही साधारणपणे ७० मायक्रोमीटर असते. यावरून हे प्रदूषित कण किती अतिसूक्ष्म असतात ते लक्षात येईल. धुरके (प्रदूषित धुके) वाढते आणि शहरात अंधूक दिसू लागते त्या वेळेस पीएम२.५ सर्वाधिक वाढलेले असते. बांधकाम, इंधनाचे ज्वलन हे दोन सर्वात मोठे प्रदूषणकारी घटक आहेत. चांगले नसलेले व खड्डे असलेले रस्ते हे शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या घटकामध्ये येतात. या प्रदूषित घटकांचा सल्फर डायॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदींशी संयोग होऊन कोणत्याही जिवासाठी धोकादायक अशी पातळी तयार होते. सध्या अशाच धोकादायक पातळीमध्ये भारतातील शहरवासीय राहात आहेत. हे सारे घटक श्वासावाटे आपल्या शरीरात जातात आणि थेट हृदय व फुप्फुसावर परिणाम करतात. काही प्रदूषित घटक तर एवढे अतिसूक्ष्म असतात की, ते थेट आपल्या रक्तात विनाअडथळा पोहोचतात. संशोधकांना असे लक्षात आले आहे की, हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या धमनीवर वायुप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होतो. प्रदूषित कणांचा शिरकाव झाल्याने सर्वप्रथम माणसाचा रक्तदाब वाढतो आणि रक्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेवरच त्याचा परिणाम होतो. परिणामी माणसाला हृदयविकार आणि फुप्फुसांच्या विकाराला सामोरे जावे लागते.

प्रदूषित कणांना दीर्घकाळ सामोरे जावे लागले की,  परिणामी केवळ माणसाचेच नव्हे तर प्रत्येक सजीवाचे आयुष्यमान कमी होते. वायुप्रदूषण हे कर्करोगासाठीही हे महत्त्वाचे कारण असल्याचे जागतिक स्तरावर आजवर झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये लक्षात आले आहे. युरोपिअन युनियनने केलेल्या पाहणीमध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि स्वित्र्झलड या तीन देशांमध्ये प्रतिवर्षी ४० हजार मृत्यू प्रदूषणामुळे झालेल्या विकाराने होतात असे लक्षात आले आहे. आपल्याकडे तर आपण अद्याप अशा प्रकारची पाहणी अथवा मोजणीच केलेली नाही. आपल्याकडे हा मृत्यूचा आकडा भयानक मोठा असेल अशी भीती आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी काही प्रमाणावर यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. पण खरे तर हे सारे थेट नागरिकांच्या जिवाशी संबंधित असल्याने व्यापक पाहणी सरकारने करायलाच हवी. मात्र सरकारी पातळीवर तर सारे काही सामसूमच आहे.

प्रदूषित घटकांमधील सल्फर आणि मृत्यूचे प्रमाण यामध्येही थेट संबंध लक्षात आला आहे. पीएम२.५ वाढला की, मृत्यूचे प्रमाणही वाढते, हे वास्तव आहे. या अंकातील कव्हरस्टोरी व सोबतची आकडेवारी वाचल्यानंतर असे लक्षात येईल की, आपल्याकडे दिवाळीच्या आसपास शहरांमधील पीएम२.५मध्ये धोकादायक वाढ झाली आहे. शिवाय आपण सध्या केवळ प्रदूषणाचे प्रमाण मोजतोय त्याच्याशी संबंधित विकारग्रस्त आणि मृत्यू यांची संख्या मोजण्यास सुरुवातही केलेली नाही. उपाययोजनांपासून तर आपण कोसो दूर आहोत.

सतत वाहतुकीशी संबंध असलेल्यांना वायुप्रदूषणाचा धोका सर्वाधिक आहे. केवळ माणसावर नव्हे तर प्राण्यांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. जिथे आपल्याला माणसाचे काही पडलेले नाही तिथे प्राण्यांबाबत काय बोलणार? नव्या संशोधनात लक्षात आले आहे की मनुष्यप्राण्यांच्या मेंदूवरही याचा गंभीर परिणाम होतो आणि मानसिक व शारीरिक विकारांना सुरुवात होते. अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढल्याचे आपल्याकडेही लक्षात आले आहे. नव्या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे प्रदूषण आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवत आहोत. वायुप्रदूषणामुळे भावी पिढीच्या डीएनएमध्ये विकृती निर्माण होत असून व्यंग अधिक असलेली पिढी जन्मास येते आहे. आपण केलेल्या प्रदूषणाची फळे त्यांना भोगावी लागणे अन्यायकारक तर आहेच, पण ते व्यंग त्यांना आयुष्यभर वागवावे लागणार हे त्याहून अधिक वाईट आहे.

आíथक सुबत्ता व्यक्तीपासून देशापर्यंत सर्वानाच हवी आहे. पण त्या दिशेने जाताना आपलेच भविष्य काळवंडणार नाही याची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा भौतिक पातळीवर आपण स्मार्ट काय अतिस्मार्टही असू, पण शारीरिक आणि प्राथमिक आरोग्याच्या पातळीवरही स्वस्थता व स्वास्थ्य नसेल तर तो स्मार्टनेस काय कामाचा? आपल्या आजूबाजूला जे काही सुरू आहे, त्यातील त्रुटी दाखविण्याचे काम माध्यमे करतात. एनडीटीव्हीवरील एकदिवसीय बंदीच्या निमित्ताने सरकारने आधीच तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आता वायुप्रदूषणाकडे वेळीच लक्ष न देणे म्हणजे तोंड दाबलेल्या अवस्थेनंतर नाकही दाबण्याचाच प्रकार असणार आहे.. धोक्याची घंटा वेळीच ऐकायला हवी!

vinayak-signature