19 October 2018

News Flash

विशेष मथितार्थ : कर्मयोगी दादा

आपण दोघेही मानवतेचेच काम करतो, विचारधारा वेगळ्या असल्या तरी!

ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांची मुलाखत सुरू होती. मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला अचानक लक्षात आले की, नंतरची वेळ वैद्य प. य. खडीवाले यांना दिलेली आहे. वेळेस पोहोचणे आवश्यक आहे. त्याने मृणालताईंना विनंती केली आणि संध्याकाळी परत येतो, असे सांगितले. मृणालताई हसत हसत हो म्हणाल्या आणि त्यांनी सांगितले की, दादांना मी विचारलेय म्हणून आवर्जून सांग. त्या पत्रकाराला आश्चर्यच वाटले, कारण दादा म्हणजेच वैद्य खडीवाले हे पूर्णपणे हिंदूुत्ववादी आणि मृणालताई समाजवादी. ते त्या पत्रकाराने बोलूनही दाखविले, त्यावर मृणालताई म्हणाल्या त्यांना मी जे ओळखते ते खूप वेगळे आहे. दादा हा खूप मोठा आणि चांगला माणूस आहे, विचारधारा कोणतीही का असेना. त्यानंतर मृणालताईंनी एक किस्सा सांगितला. ७०-८०- च्या दशकात मृणालताईंच्या पुण्यातील कार्यालयाला मध्यरात्री आग लागली, पूर्ण कार्यालय जळून खाक झाले. ताई म्हणाल्या, त्या रात्री अडीच-तीन वाजता एक माणूस माझ्याकडे दहा हजार रुपये घेऊन आला आणि म्हणाला, तुमचे काम खूप चांगले आहे, ते थांबता कामा नये. उद्या सकाळी उगवत्या सूर्यासोबत कामाला लागा, त्यासाठी माझ्यासारख्या लहान माणसाकडून ही गंगाजळी. त्या माणसाचे नाव वैद्य खडीवाले. मृणालताई म्हणाल्या, त्यांनी मी म्हटलेही की, अहो आपल्या विचारधारा वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या आहेत. त्यावर ते म्हणाले, आपण दोघेही मानवतेचेच काम करतो, विचारधारा वेगळ्या असल्या तरी! ..अशा या दादांचे जाणे चटका लावून जाणारे होते.

सडेतोड बोलणे हा दादांचा एक महत्त्वाचा गुण. त्यांच्या औषधांच्या कारखान्यातील िभतीवर विविध सामाजिक कार्याना वाहून घेतलेल्या  रा. स्व. संघाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या तसबिरी आहेत. एकदा एका संघस्वयंसेवकानेच त्यांना प्रश्न केला की, यात इंदिरा गांधींची प्रतिमा कशासाठी? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता दादा उत्तरले, त्या पंतप्रधान होत्या हे या देशाचे भाग्य. त्यांचे कार्यकर्तृत्व अफाट होते. नंतर तसे कुणाला फारसे जमले नाही. म्हणून त्यांना ते स्थान आहे. त्यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय हा अपवाद मानावा. दादांचे कार्यकर्तृत्व एवढे अफाट होते की, राजकारणातील विविध पक्षांचे नेते त्यांच्याकडे कोणत्या तरी औषधासाठी आलेले असायचे आणि मग त्यांची कानउघाडणी करणारे दादा लोकांना पाहायला मिळायचे. एकदा एका नेत्याने दादांना सांगून पाहिले की, लोकांसमोर नको, त्यावर दादा म्हणाले, मी लोकांचा माणूस आहे आणि तू लोकनेता. जे व्हायचे ते लोकांसमोरच. घाबरत असशील तर राजकारण सोड! पथ्य न पाळणाऱ्या रुग्णांचीही ते अशीच झाडाझडती घेत असत.

प्रसंगी कठोर वाटणारे हे दादा, मनातून मात्र करुणामयी होते. जणू काही महाकारुणिक बुद्धाचा दुसरा अवतारच. लहान मुलांना झालेल्या वेदना त्यांना पाहवायच्या नाहीत. त्यातून अनाथ मुलांसाठीचे केंद्र उभे राहिले. थॅलेसेमियाच्या रुग्णांचे रक्तावाचून होणारे हाल त्यांना पाहवले नाहीत आणि मग त्यातून पुण्यामध्ये या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारी रक्तपेढी त्यांनी स्वखर्चाने उभी केली. त्यांचे हे काम पाहून अखेरीस राज्य शासनाने थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारा कायदा केला व त्यांच्यासाठी रक्तपेढय़ा अस्तित्वात आल्या. दृष्टिहिनांचे हाल पाहून त्यांनी नेत्रपेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात नेत्रपेढी अस्तित्वात आली आणि गेल्या अनेक वर्षांत सुमारे साडेतीन हजारांहून अधिक दृष्टिहिनांना दृष्टी प्राप्त झाली आहे. दादा हे असे अनोखे कर्मयोगी होते. त्यांनी कमावलेले सारे काही सढळ हस्ते समाजासाठी खर्च केले. वाचनातून माणूस घडतो यावर त्यांचा ठाम विश्वास. अलीकडची पिढी वाचत नाही, कारण त्यांना काही सकस उपलब्ध नाही असे त्यांना वाटत होते. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांसाठी सकस साहित्यनिर्मिती करण्याचा ध्यास त्यांना लागून राहिला होता. पूर्णपणे रंगीत छपाई असलेले ज्ञानभांडार ते लहान मुलांना उपलब्ध करून देण्यात गुंतले होते.

‘लोकप्रभा’-‘लोकसत्ता’वर दादांचे मनापासून प्रेम होते. ‘लोकप्रभा’साठी त्यांनी गेली सहा वर्षे सातत्याने लिखाण केले. रामनाथ गोएंकाजींच्या प्रेमापोटी मी हे सारे करतो, असे सांगून ते ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमांना मात्र येत असत. नानाजी देशमुखांमुळे त्यांचा रामनाथजींशी विशेष स्नेह होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या वतीने पाच वैद्यांचा सन्मान करण्यात आला, त्यात दादांचा समावेश होता. त्या वेळेस राष्ट्रपतींनी एक इच्छा सहज व्यक्त केली. तुम्ही हो म्हणालात तर देशातील गुणवान विद्यार्थ्यांना तुमच्याकडे एक वर्ष शिक्षणासाठी पाठविता येईल. त्यावर दादा म्हणाले, तुम्ही विद्यार्थी पाठवा, त्यांचा खर्च मी करणार! तेव्हापासून देशातील उत्तम विद्यार्थी त्यांच्याकडे येण्यास सुरुवातही झाली. अशा कर्मयोगी दादांचे जाणे पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांचा कर्मयोग आपण सर्वानीच आपापल्या परीने पुढे नेणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरावी!

‘लोकप्रभा’ परिवारातर्फे दादांना भावपूर्ण आदरांजली!

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on January 5, 2018 1:07 am

Web Title: vaidya khadiwale