22 January 2020

News Flash

नापाक चीन

चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एक आहेत.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीनने चौथ्यांदा परत ‘खो’ घातला. या खेपेस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर प्रस्ताव आल्यानंतर चीन त्याला विरोध करणार नाही, अशी भाबडी आशा अनेक जण राखून होते. मात्र चिनी कारवायांवर लक्ष ठेवून असलेल्यांना ते अपेक्षितच होते. जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटलेल्या  एवढय़ा मोठय़ा दहशतवादी हल्ल्यानंतरही चीन असे कसे करू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचे उत्तर आपण सजग नागरिक म्हणून समजून घ्यायला हवे. चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एक आहेत. यातील पाकिस्तानचे कारण धार्मिक आणि भूराजकीय आहे. तर चीनला भारत प्रबळ राष्ट्र होणे ही त्यांच्या वैश्विक सत्ताकारणातील प्रमुख अडचण वाटते. याला सध्या भारताचा मित्र असलेल्या अमेरिकेचाही एक स्वतंत्र कोन आहे. चीनला लवकरात लवकर महासत्ता व्हायचे आहे. त्यामुळे ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ ही चाणक्यनीती चीन व पाकिस्तान राबवत आहेत.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनने पाकिस्तानमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीन- पाकिस्तान कॉरिडॉर हा त्यातील महत्त्वाचा मार्ग. ग्वादार ते काराकोरम पर्वतरांगांपर्यंत निर्माण केलेला बहुपदरी महामार्ग चीनच्या विकासाबरोबरच भारताची अडचण करणारा आहे. हा मार्ग भारतासाठी सामरिकदृष्टय़ा धोकादायक आहे. म्हणूनच भारत सरकारने या मार्गबांधणीवर आक्षेप नोंदविला होता. या मार्गावर कार्यरत असलेल्या चिनी नागरिकांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी चीनला पाकिस्तानची मदत गरजेची आहे, खास करून पाकिस्तानी लष्कराची. मसूद अझरसंदर्भात पाकिस्तानची तळी चीनने उचलून धरली नाही तर त्याचे परिणाम या महामार्गावर केलेल्या गुंतवणुकीला पोहोचणाऱ्या धोक्याच्या रूपाने चीनला भोगावे लागतील, ते परवडणारे नाही. मसूद अझर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाला तर या मार्गावर असलेल्या चीनच्या आस्थापनांवर तालिबानी दहशतवाद्यांचे हल्ले वाढतील, त्या अवस्थेत पाकिस्तानी लष्करही तिकडे दुर्लक्ष करेल आणि चीनला त्याचे थेट परिणाम भोगावे लागतील.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका बाजूला मसूद अझरच्या दहशतवादाला  चीन अभय देत आहे, असे चित्र असले तरी त्यांच्या शिंगझियांग प्रांतामध्ये मात्र इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी डोके वर काढले आहे. त्यांना ठेचून काढण्याचे धोरण सध्या चीन राबवते आहे. मध्यंतरी या प्रांतात झालेल्या दहशतवाही हल्ल्यांनंतर चीनने थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून, ‘त्यांना आवरा’ असे सुनावले होते. सध्या तर या प्रांतामध्ये आरोग्य शिबिरे घेण्याच्या निमित्ताने मुस्लिमांचे डीएनए संकलित करून त्याचा डेटाबेस करण्याची छुपी मोहीम चीन राबवते आहे. अशा अवस्थेत मसूद अझरला अभय दिले नाही तर या प्रांतामध्ये मूलतत्त्ववाद्यांचे दहशतवाही हल्ले वाढतील आणि ते चीनच्या विकासाआड येईल, असे चीनला वाटते. या मुद्दय़ांमुळेच चीनने चौथ्यांदा हा प्रस्ताव सहा महिन्यांसाठी पुढे ढकलला. आता गरज आहे ती चीनचा नापाक इरादा समजून घेऊन भारताने आपली रणनीती बदलण्याची!

First Published on March 22, 2019 1:05 am

Web Title: why is china shielding terrorist masood azhar
Next Stories
1 धुळवड
2 मळभ
3 पर्यटनाची कास!
Just Now!
X