28 February 2021

News Flash

आपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा..

सार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय?

सार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय? एखादे महाविद्यालय किंवा एखादी सामाजिक संस्था, अगदी गेला बाजार एखाद्या ज्ञातीच्या किंवा अमुक नाहीतर तमुक आडनाव असलेल्या कुलोत्पन्नांचा फोफावलेला वटवृक्ष आणि त्याचा ऊहापोह मांडणारा एखादा समारंभ- या असल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून कधी जायचा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवलाय? आमच्या व्यवसायाचा सध्या तो एक अविभाज्य घटक बनलेला आहे. गावोगावी हे असले समारंभ सातत्याने घडत असतात. सुदैवाने या प्रचंड संख्येने फोफावलेल्या समारंभांना मालिकांत काम करणारे कलाकार सध्या उपलब्ध झालेले आहेत. आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्रीय तत्त्वानुसार हे समारंभ अत्यंत जोरात सुरू आहेत. शिवाय या असल्या कार्याला उपस्थित राहणाऱ्या कलावंतांना मानधनाचे ‘लठ्ठ’पासून ‘रोड’पर्यंत सगळ्या आकारांत बसणारे पाकीट दिले जाते. वयपरत्वे आता ‘जाणते’ या गटात अजाणतेपणे वा मुद्दामहून माझा समावेश होत असल्याने मला येणारी आमंत्रणं जरा वेगळ्या स्वरूपाची असतात. बऱ्याचदा वार्षिक समारंभांना पारितोषिके प्रदान करायला मला बोलावणे येते. (‘प्रदान’ हा शब्द माझा नाही; छापील निमंत्रण पत्रिकेत तो असतो.)

साधारण महिना-पंधरा दिवस आधी अत्यंत कमावलेल्या कृत्रिम आवाजात एक फोन येतो. त्यांचा समारंभ किती दिमाखदार रीतीने साजरा होतो याबद्दल सूतोवाच केले जाते. कार्यक्रमासाठी आपली चरणकमले आमच्या शहराला लागली तर प्रभू रामचंद्रांचे चरण चौदा वर्षांच्या वनवासानंतर पुनश्च अयोध्येच्या भूमीवर पडले तेव्हा जसा आनंद अयोध्यावासीयांना झाला होता तसाच आनंद तिथल्या रहिवाशांना त्या विविक्षित दिवशी होणार आहे, असे फोनवर सांगितले जाते. फोन झाल्यावर मी माझी पावले (तो ‘चरणकमल’ म्हणाला होता. मी निदान ‘पावले’ तरी म्हणतो.) आरशात पाहतो. पावलांकडे बघताना फोन करणाऱ्या माणसाच्या गावात कशाला कमळ म्हणत असतील, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कार्यक्रमाला जाताना मी नेहमी आपली पावले दिसणार नाहीत असे बूट पायात  घालून जातो. तर त्या पावलांना ‘चरणकमले’ म्हणणाऱ्या माणसाच्या संभाषणाची भूल पडून तिथे जायला मी तयार होतो. (का नाही जाणार? पैसे मिळणार असतात ना!)जाण्या-येण्याची व्यवस्था काय आणि कशी, याबद्दलची गहन चर्चा पुढच्या तीनेक दिवसांत रंगात येते. प्रवास रेल्वेचा असतो आणि त्यासाठी तिकीट आवश्यक असतं. नेमकं ते मिळत नसतं. मात्र, आपल्याला ‘वेटिंग २८’ वगैरे असलेलं तिकीट पाठवलं जातं. त्याबद्दल पुढचा फोन आल्यावर फोन करणारी व्यक्ती आपली ‘आतमध्ये’ओळख आहे, तेव्हा आयत्या वेळी तिकीट नक्की कन्फर्म होईल असं ठासून सांगते. बऱ्याच वेळेला ते होतंही. पण गाडीत बसेतो तिकिटाच्या परिस्थितीचा निश्चित अंदाज येईपर्यंत माझा जीव वरखाली होत असतो. शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस किंवा रात्र उजाडते. (रात्र उजाडते हे थोडं चुकीचं आहे. रात्र मावळते असं लिहायला हवं होतं. असो! पुढच्या वेळी लक्षात ठेवलं पाहिजे.) आता तिथल्या लोकांचे जणू काही त्या शहरात चोवीस तास दिवसच असतो अशा प्रकारे कुठल्याही वेळी फोन येऊ  लागतात. त्या ठिकाणावर उतरल्यानंतर कोण तुम्हाला आणायला येणार आहे, हे वारंवार सांगितले जाते. ‘स्टेशनवर हजारोंची गर्दी असेल’पासून ते सगळ्यात महाग वाद्यवृंद तिथे माझ्यासाठी स्वागतपर गीत गाणार आहे याची जाणीव करून दिली जाते. शेवटच्या क्षणी एक फोन येतो, त्यात तिथे कार्यक्रम काय असतील याची यादी ऐकवली जाते. मूळ कार्यक्रमाला जोडून अजून एक-दोन कार्यक्रम त्यात कधी कधी सरकवलेले असतात.

रात्रभर प्रवास करून जेव्हा पहाटे पहाटे मी त्या गावी पोहोचतो तेव्हा तिथे न्यायला येणाऱ्या हजारोंची गर्दी पंधरा-वीसवर आलेली असते. रेल्वेची शिट्टी हाच वाद्यवृंद समजून मी पुढे होतो. कोणीतरी एक माणूस पुढे होऊन हातात एक केविलवाणा गुच्छ ठेवतो. मग त्या आलेल्या पंधरा माणसांची आपसात चर्चा होऊन एका गाडीत मी आणि भलत्याच गाडीत माझी बॅग अशी विभागणी होते. गाडीत बसल्यानंतर मांडीवर ठेवलेल्या गुच्छातून पाणी गळायला लागते. कारण गुच्छ आदल्या रात्रीच आणून फ्रिजमध्ये ठेवलेला असतो. गाडीत संबंधित संस्थेविषयी सगळी माहिती माझ्या कानात ओतली जाते. माझा जीव चहाच्या कपासाठी कासावीस झालेला असतो. उतरायचे ठिकाण येता येत नाही आणि माहिती सांगणाऱ्याची माहिती संपता संपत नाही. यदाकदाचित माहिती संपलीच तर तो माणूस स्वत:ची माहिती सांगायला सुरुवात करतो. गाडी चालवणाऱ्याची झालेली झोपमोड आणि त्यामुळे त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या नेमक्या भावना त्याच्या डोळ्यातून नको तितक्या स्पष्टपणे दिसत राहतात. म्हणूनच वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येकाच्या आईविषयीच्या भावना त्याच्या शब्दांतून व्यक्त होत असतात. शेवटी एकदाचे हॉटेल येते. मी पटकन् जाऊन आपल्या खोलीत उरलेली झोप घ्यायचा विचार करत असतो; पण आलेल्या लोकांचा उत्साह उफाडय़ाचा असतो. माझ्याआधी तिथे आलेल्या प्रमुख पाहुण्यांची यादी मला ऐकवली जाते. ती ऐकताना त्यांच्या तुलनेत यंदा कमअस्सल पाहुणा लाभलाय, हे का कुणास ठाऊक; पण मला त्यांच्या बोलण्यातून दिसतंय असं मला सतत वाटत राहतं. सकाळी खायला काय मागवायचे याबद्दल त्यांच्यात चर्चा होते. माझे मत जाणून घ्यावेसे कुणालाच वाटत नाही. खूप चर्चेनंतर पोहेच मागवले जातात. खाणे उरकते आणि सगळे अचानक पांगतात. जाताना कार्यक्रमाला कधी जायचे आहे आणि कोण न्यायला येणार, ते पुन्हा एकदा सांगितले जाते. जाता जाता ‘तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो साहेब!’ असं फोनवर सांगणाऱ्या माणसाचा ‘थोडी तुमची माहिती मिळेल का?’ हा प्रश्न पोह्यचा घास घशात अडकवून जातो. हल्ली काही वर्ष मी माहितीचा कागद बरोबर घेऊनच जातो. तो त्याच्या हातात ठेवतो. न वाचताच तो घडय़ा घालायची स्पर्धा असल्यासारखा त्या कागदाच्या अगणित घडय़ा घालून मागच्या खिशात कोंबतो. माझी तीस-बत्तीस वर्षांची (चोख पैसे घेऊन केलेली) रंगभूमीची सेवा पुढच्या खिशात ठेवायच्याही लायकीची नाही की काय, हा विचार मनातून जाता जात नाही. मी अंघोळ वगैरे उरकून घेतो. एखादा चहा अजून प्यावा आणि स्थानिक वर्तमानपत्रे चाळावीत आणि अलगद थोडी झोप काढावी असा बेत आखतो. तितक्यात खोलीतला फोन वाजतो. शहर मोठे असल्यास तिथल्या एफ. एम.चॅनेलच्या माणसाला आपली ‘चॅनेल विजिट’ हवी असते. मात्र, हे सगळं त्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार हवे असते. म्हणजे झोपेचे खोबरे ठरलेले. मला दुपारच्या जागरणाचा अंमळ त्रास होतो म्हणून मी नकार द्यायचा प्रयत्न करतो. तरी ते गाडी पाठवतो म्हणतात. तुम्ही या व्यवसायाकडे कसे आलात? तुमचे आदर्श कोण? भूमिकेत झोकून देता का? तरुणांना काय मार्गदर्शन कराल? या छापाची ती मुलाखत असते. आणि ती रात्री ऐकवली जाणार असते. त्या रात्री जेव्हा मी मार्गदर्शन करत असतो तेव्हा प्रत्यक्षात तरुणवर्ग न सांगण्याच्या ठिकाणी मजा करण्यात मग्न असतो. त्यामुळे अनेक वेळेला माझे बहुमोल मार्गदर्शन वाया गेलेले आहे. त्या सगळ्या भेटींचे सोपस्कार उरकेपर्यंत दुपार उलटून गेलेली असते. ‘‘हॉटेलवर जेवन घेऊन घ्या..’’ अशा सकाळी दिल्या गेलेल्या सूचनेनुसार मी ‘जेवन घेऊन घेतो.’ कार्यक्रम साडेसातचा असल्यामुळे निदान दोन तास विश्रांती घ्यावी असं ठरवून ‘‘इथे का आलो आणि आता परत कसा जाणार?’’ या विवंचनेत उरलेला वेळ काढतो. तितक्यात सकाळच्या लोकांपैकी काही व्यक्ती हजर होतात. त्यांच्या हातात दहशत वाटावी इतक्या जाडीचा एक अल्बम असतो. मागल्या काही वर्षांत ज्यांची चरणकमले त्या शहराला लागून गेली त्या मान्यवरांचे फोटो त्यात असतात. प्रत्येकाच्या डोळ्यांत अनावर झालेली झोप त्यात लख्ख दिसून येते. इतरही काही यावेळी हजर असतात. त्यांची ओळख करून दिली जाते. ठिबक सिंचन पाइपचा मालक, कुठल्यातरी जिल्हा बँकेचा पदाधिकारी, एखादा शोरूमचा मालक (होणाऱ्या कार्यक्रमाला त्याचे पैसे लागलेले असतात.) असे कोणीतरी. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत; पण पूर्वी यातले सगळे शरद पवार यांचे उजवे हात असायचे. त्यांना उजवे हात तरी किती आहेत?

मग पुन्हा एकदा चहापान होते आणि आम्ही सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला निघतो. जाताना त्या नवीन व्यक्तींपैकी कुणाच्या तरी गाडीतून जायची सोय झालेली असते. जाण्याच्या प्रवासात ती व्यक्ती ‘आपले’ या शहरात काय काय मालकीचे आहे याची माहिती पुरवत असते. ‘आपले’ असं म्हणून तो माणूस मलाही त्याच्या आर्थिक समृद्धीत सामावून घेतो. मीही त्या काल्पनिक श्रीमंतीत काही काळ रममाण होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो.

यानंतर कार्यक्रम कसा पार पडला आणि माझे काय झाले याची उत्सुकता तुम्हाला असेल. पण आपलीच निर्भर्त्सना आपण किती करावी, नाही का? नाहीतर सांगतो पुढच्या भागात..!

संजय मोने

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 3:19 am

Web Title: actor sanjay mone articles in marathi on unforgettable experience in his life part 3
Next Stories
1 रेल्वेचं दळणवळण
2 तिसऱ्या घंटेची हुरहूर
Just Now!
X