प्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही. काही नाही तरी दोन प्रवास तर करावेच लागतात : जन्म आणि मृत्यूचा. शिवाय आयुष्यात या ना त्या कारणाने आपण प्रवास करतच असतो. नोकरी, गावाला सणासुदीला जाणे, सुट्टीसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे, इ. इ. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध असेल तर साहित्य वा नाटय़संमेलनाच्या ठिकाणी जाणे होते. काही लोकांना तर फिरतीचीच नोकरी असते. त्यांना प्रवास हा अनिवार्यच असतो. मुंबईत राहणाऱ्यांना तर रोज नोकरीसाठी प्रवास करावा लागतो.

परंतु खास मजेदार असतो तो मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही लांबचा प्रवास. त्यांच्या प्रवासात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सगळ्या गोष्टीची धास्ती. समजा, कोणीएक कर्णिक किंवा देशमाने किंवा राऊत किंवा भागवत प्रवासाला निघाले आहेत. (मुद्दामच जोशी, देशपांडे, कुलकर्णी म्हणालो नाही. कारण त्या गरीब बिचाऱ्यांना सगळेच जण उदाहरणादाखल वापरतात. आधीच स्पष्ट करतो- ‘गरीब’ हे विशेषण त्यांच्या आर्थिक परिस्थितीला धरून वापरलेले नाही. हो! उगाच त्यातलाच कोणीतरी कोर्टात बेअब्रूचा खटला दाखल करायचा. अर्थात ‘गरीब’ हे विशेषण त्यांच्या स्वभावाला धरूनही वापरलेले नाहीये. फक्त ते संख्येने जास्त आहेत म्हणून उठसूट कोणीही लिहिताना त्यांच्यावर आपली लेखणी परजून घेतो, त्यासाठी या नावांचा उल्लेख टाळलाय.. हे सगळं स्पष्टीकरण जरा जास्त झालंय, पण हल्ली भावनाबिवना फार दुखावतात म्हणून ही काळजी!) ..तर कर्णिक, देशमाने, इ. इ. प्रवासाला निघाले. प्रवाशांत मराठी प्रवासी पटकन् ओळखता येतो. जो प्रवासातल्या सगळ्या गैरसोयींबद्दल जाब विचारता येत नाही म्हणून आपल्या बायकोवर किंवा मुलांवर खेकसत असतो तो मराठी प्रवासी! एक तर यांचा प्रवासाला जाण्याचा बेत शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नाही. सिमल्याला जायचं ठरतं. बायको बिचारी इथून तिथून गरम कपडे जमवते. आणि एक दिवस नवरा येऊन ‘केरळ’ असं घोषित करतो. आणि मग..

‘‘स्वेटर आणलं मी मागून. आता काय तुमच्यासाठी लुंग्या आणू?’’

‘‘लुंग्या कशाला? मी साध्या शर्ट-पायजम्यात पण रुबाबदार दिसतो.’’

‘‘हो! भारीच रुबाब तुमचा! परवा साडय़ा घ्यायला गेलो तर दुकानदार म्हणाला, बाहेर ड्रायव्हर उभा आहे त्याच्याकडून पाठवतो गाडीत.’’

‘‘त्याला काय कळतंय? तुला अबोली रंग खुलून दिसतो म्हणाला तेव्हाच ओळखलं मी..’’

‘‘का? मी काय सावळी आहे- अबोली रंग न खुलायला?’’

‘‘पंधरा वर्षांनी ओटय़ाचा कडाप्पा मूळ कुठल्या रंगाचा होता हे सांगता येतं? आहे तो रंग आपला म्हणायचा.’’

‘‘नसेन मी शोभत तर जा एकटेच फिरायला.’’

‘‘एकटाच जातो त्याला ‘प्रवासी’ म्हणत नाहीत, ‘संन्यासी’ म्हणतात.’’

‘‘नाही तरी तुमच्या घराण्याला परंपरा आहेच. तुमचे काका का मामा..? कोण हो, मामाच ना? गेले नव्हते घरातून पळून संन्यासी व्हायला? म्हणायला संन्यासी! शेजारणीचा नवरा हातात दांडका घेऊन मारायला आला म्हणून तोंड काळं करावं लागलं. तिच्याकडे बघून चाळे करायचे ना हो ते?’’

‘‘चाळे? अगं! त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त झालं होतं. ते वरच्याशी थेट संवाद साधायचे.’’

‘‘वरचा की वरची?’’

‘‘नरकात जाल. त्या अश्राप माणसाला नका निंदू. तुझ्या मावशीचा नवरा गेला मोलकरणीचा हात धरून ते बघा! आणि सांगितलं काय? तर- पददलितांचे अश्रू पुसायला भारतभर जातोय. स्वत:चं नाक पुसलं नाही कधी.’’

‘‘बोला! बोला! गरीब गाय मी.. बोलून घ्या.’’

‘‘तू गाय आणि गरीब? मग मला भिकारीच म्हटलं पाहिजे.’’

मग भांडण, वादावादी वाढत जाते आणि कुठे जायचं ते ठरवायचं राहूनच जातं. शेवटी पाच दिवस असताना तिकिटं काढली जातात. ती आदल्या दिवसापर्यंत ‘मिळाली आहेत की नाहीत’ या स्थितीत असतात. ए. सी.ऐवजी साधी येतात. त्यात पुन्हा  ५, २८, ४३, ५८ अशा विखुरलेल्या सीट्स मिळालेल्या असतात. त्यामुळे प्रवासातला अर्धा वेळ हा सगळ्या डब्याला ‘याला उठव, त्याच्या पाया पड’ यातच जातो. मग साध्या डब्यातून ए. सी. पाहिजे असतो सगळ्यांना.  आणि ए. सी. थ्री टायरच्या डब्यात एकच खालची जागा मिळालेली असते. त्यावरून पुन्हा वादाला रंग चढतो.

‘‘तुम्ही खाली झोपणार? म्हणजे गेलंच सगळं सामान चोरीला!’’

‘‘अगं! लोक प्रवासाला म्हणून गाडीत बसतात.. चोऱ्या करायला नाही.’’

‘‘नाही कसे? आमच्या दादाच्या सगळ्या बॅगा चोरीला नव्हत्या गेल्या? एकूण एक वस्तू साफ.’’

‘‘कोण? तुला कुठे कोण भाऊ  आहे?’’

‘‘माझ्या मामेआत्तेच्या मावशीचा मुलगा.. भगवंतदादा.’’

‘‘कोण कुठला आऊचा काऊ , तो माझा मावसभाऊ ! आणि त्याच्या वस्तू कोण चोरील? फुकट दिल्या तरी नाही कोणी हात लावणार. दोन तुटके कंगवे जो चिकटपट्टीने चिकटवून एक म्हणून वापरतो त्याची बॅग कोण चोरील?’’

‘‘माझ्या दादाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला खटकते. त्याला समाजात जो मान आहे तो नाही तुम्हाला कळत.’’

‘‘कुठला मान? त्याचं नाव घेतलं की लोक माना खाली घालतात. आणि ‘तिकिटं देतो आणून.. घाबरू नका’ असं म्हणाला होता तो. ही अशी आणतात तिकिटं? ए. सी.ची सांगितली होती..’’

‘‘त्याला कामं असतात शेकडो. वेळ नसेल झाला.’’

‘‘सेकंड क्लासची तिकिटं काढायला होता ना वेळ? त्यातच ए. सी.ची काढता आली असती. आणि आता उरलेले पैसे गेलेच.’’

‘‘देईल तो. दोन-चार हजार म्हणजे त्याला किस झाड की पत्ती!’’

‘‘अगं! मग आपली गाडी त्याने विकून दिली त्याचे पैसे त्याच्या कुठल्या त्या झाडाची पत्ती म्हणून आणून द्यायला सांग ना!’’

‘‘त्याच्या मुलीच्या- म्हणजे आपलीच भाची बरं का- तिच्या शिक्षणासाठी उसने घेतलेत त्याने.’’

‘‘मग मागायचे ना?’’

‘‘मागितल्यावर जसे काही तुम्ही देणारच होतात. मामंजींना कवळी करतानासुद्धा काकू.. काकू करत होतात.’’

‘‘बाबा फक्त दूध प्यायचे. त्याला कशाला लागते कवळी? म्हणून मी नको म्हणालो. आणि मी गाडी विकली नसती तर तुझ्या भाचीचं शिक्षण थांबलं असतं का?’’

‘‘काहीतरीच काय बोलता? कुठूनही पैसे उभे केले असते माझ्या भावाने.’’

‘‘हो! जे उभे झाले त्यात आडवा झालो ना पण मी!’’

‘‘अहो! फार कर्तबगार आहे माझा भाऊ . लाथ मारील तिथे पाणी काढील.’’

‘‘हे मात्र बरोबर बोललीस. तो लाथ मारतो आणि पाणी माझ्या डोळ्यातून येतं.’’

..हे असे संवाद होईपर्यंत तिकीट चेकर आलेला असतो. तो नेमका पद्मनाभन् वगैरे असतो. मग त्याच्याशी बोलताना सुरुवात इंग्रजीत होते. संभाषण जसजसं वाढत जातं तसं जो बोलतो त्यालाही ते कळेनासं होतं आणि ऐकणाऱ्यालाही. मग दोघंही आपल्या अपंग हिंदीत ते पुढं रेटतात. त्यात असं लक्षात येतं की, रात्री बारानंतर प्रवासाला सुरुवात झाली की तिकीट पुढच्या दिवशीचं काढावं लागतं. नेमकी यांची तिकिटं रेल्वेच्या नियमाप्रमाणे आदल्या दिवशीची असतात. त्यावरून मग कौटुंबिक नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो.

‘‘बघा! अक्कल बघा! साधं काळ-वेळेचं आकलन नाही अन् रेल्वेची तिकिटं काढायला निघालेत.’’

‘‘एवढं होतं तर तुम्ही काढायची होतीत!’’

‘‘मीच काढणार होतो. आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये ते काळसेकर राहतात, ते आहेत ना रेल्वेत? तूच म्हणालीस, त्यांना नका सांगू!’’

‘‘बरोबरच आहे. तुम्ही जाणार नेमके ते घरात नसताना. त्यांच्या बायकोबरोबर बोलायला तेवढंच कारण. आणि तीसुद्धा मेली अशी घोळून घोळून बोलते!’’

‘‘उगाच काय? तिला जरा फुलाबिलांची आवड आहे आणि माझा ‘बॉटनी’ विषय होता बी. एस्सी.ला.. म्हणून जरा गप्पा मारतो आम्ही, इतकंच.’’

‘‘तेच ते. आम्ही कितीही पारिजातक लावला तरी फुलं समोरच्याच घरात पडणार.’’

‘‘तू सांग मला.. आपण घरात लावू फुलं. नको कोण म्हणतंय?’’

‘‘मागे एकदा सांगितलं होतं. काय झालं त्याचं?’’

‘‘काय झालं? निवडूंग लावू या म्हणालीस. दिला होता ना आणून?’’

‘‘पण नंतर तुम्हीच उपटून टाकलात ना तो?’’

‘‘मग! नुसता असता तर काही बोललो नसतो. ऑफिसातले लोक घरी आले तेव्हा त्याची भजी करून खायला घातलीस, म्हणून फेकून दिला तो. आमच्या साहेबांची जीभ सोलून निघाली.’’

‘‘मग ती काळसेकर काय तुम्हाला कापसाचे पॅटिस खायला घालते की काय?’’

‘‘काहीतरी बोलू नकोस. गरीब आहे बिचारी ती.’’

‘‘होक्का! तुमच्या पुरुषांची ही नेहमीची ट्रिक आहे. एखादीला ‘गरीब आहे बिचारी’ म्हणायचं म्हणजे काय? तर, बाकी कुणी नका लक्ष देऊ.. मी आहे इथे बसलेला- असा अर्थ असतो त्याचा.’’

हे सगळं होऊन मग ती तिकिटांची भानगड पैसेबिसे देऊन मिटवली जाते. तितक्यात मुलांना भुका लागतात. त्यांच्यावरच्या अन्यायाला ते स्वत:च वाचा फोडतात. मग अजून दोन-चारशे रुपये देऊन अन्याय मिटवला जातो. या सगळ्या प्रकारात जबर आर्थिक नुकसान झाल्यामुळे नवरा गप्प बसतो. गाडीही पाच-पन्नास किलोमीटर पुढे आलेली असते. कशी कुणास ठाऊक, पण जागेची सोयसुद्धा झालेली असते. मग कधीतरी इच्छित स्थळी गाडी पोचते. सर्व कुटुंब उतरते आणि आपल्या ट्रिपला प्रारंभ करते. अर्थात ट्रिप कशी पार पडते, ते सांगायला नकोच.

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com